प्रा. डॉ. द. ता. भोसले
सखाराम त्याचे नाव : गावातल्या एका मवाली आणि गुंड माणसाच्या दारुभट्टीवर गावठी दारू तयार करण्याच्या कामावर नोकरीला : चांगला पैसा मिळायचा आणि पोटभर प्यायला मिळायची. चार पैसे कमी पडले, की हा कडक मालात पाणी मिसळायचा. तोंडाला दारूचा वास आणि अंगाला अत्तराचा वास, असे छान दिवस चालले असतानाच पोलिसांची दारुभट्टीवर धाड पडली आणि त्याला त्यात शिक्षा झाली. मूळ मालकाने स्वत:वर किटाळ येऊ दिले नाही. मधल्या काळात दोन वर्षांच्या लेकराला पाठीमागे ठेऊन त्याच्या बायकोने जगाचा निरोप घेतला.
तुरुंगातून सुटून आल्यावर, या सखारामाला कुणी कामावर ठेवेना. कोणी जवळ करीना. किरकोळ मोलमजुरी करीत आणि हमाली करीत, त्याने काही दिवस तसेच रेटले; पण स्वत:चे हाल आणि त्यातही लेकराचे हाल त्याला पाहावेनात आणि त्याने पुन्हा स्वतंत्रपणेच दारूचा धंदासुरू केला. पोराला शाळेतही घातले आणि सरकारी अधिकारी व गावातले पुढारी यांना हाताशी धरून म्हणजे ठराविक हप्ते देण्याचे कबूल करून, बघता-बघता या धंद्यात बस्तान बसविले. पूर्वी पोटाला भाकरी मिळत नव्हती. आता त्याबरोबर तूप-साखर खाऊ लागला.
आपल्या वाढणार्या धंद्याला मदत व्हावी, या विचाराने, तरुणपणाची मस्ती अनावर होऊ लागल्याने आणि चार भाकरी थापायला स्वत:चे माणूस मिळावे, म्हणून या सखारामाने गावावरून ओवाळून टाकायच्या लायकीची एक ‘धेन्वा’ बायको म्हणून घरात आणली. आपल्या पोरालाही ती सांभाळेल. लळा लावेल असाही त्याचा हेतू होता; पण रात्रीची सुखशय्या सोडली, तर त्याची ही बायको एखाद्या फाटलेल्या वस्त्रासारखीच होती. फाटलेले वस्त्र ना थंडीपासून संरक्षण करते ना उन्हापासून वाचवते ना लज्जारक्षण करते, ना देहाचे सौंदर्य वाढविते. तशीच त्याची ही रखमा नावाची बायको होती. ही रखमा नवर्यापेक्षाही अवगुणांनी काकणभर वरचढच होती. नवरा दुपारनंतर ‘प्यायचा’. हिला सकाळी-सकाळी ग्लासभर घेतल्याशिवाय उभं राहता येत नव्हते. चांगली झिंग आल्याशिवाय स्वयंपाक करता येत नव्हता. दिवसभर तर्र्र अवस्थेत असायची. अनेकदा तर या सावत्र पोराला काम केले नाही, तर -बडवायची. आईविना हे पोर. तिसरी-चौथीत शिकणारे; पण भांडी घासणे, झाडलोट करणे, सरपण गोळा करणे, आपली झोपडी सारवणे व दारूच्या ट्यूब गिर्हाईकांना पोहोचवणे असली अघोरी कामे करीत होते. कामाला उशीर झाला, की ही रखमा काठीने त्याचे शरीर काळे-निळे करायची. अनेकदा शाळेऐवजी घरच्या कामासाठी डांबून ठेवायची. नवरा भट्टीवर गेल्यावर, एकदा तिने शिक्षा म्हणून त्याचे हात-पाय बांधून त्याला दारू पाजली आणि त्या नशेत त्याला दिवसभर राबवून घेतले. शिवाय, एकाच खोलीत सारा संसार, स्वयंपाक त्याच खोलीत. रात्री झोपायचे त्याच अपुर्या जागेत. रात्री हा दिनेश पोरगा शाळेचा अभ्यास करायचा. बराच वेळ जागायचा. मात्र, या दोघांना त्याच्या समोर कामक्रीडा करता येईना. शरीरसुख घेता येईना. तेव्हा सखारामने एक युक्ती केली. त्याला रात्री जेवतानाच कडक दारू पाजली. त्याबरोबर हा दिनेश तासाभरातच लोळागोळा व्हायचा. बसल्या जागीच झोपायचा. दारूच्या नशेत मुडद्यासारखा पडायचा आणि मग हे दोघे रात्री उशीरपर्यंत रंग खेळायचे. दंग व्हायचे.
त्यांची ही युक्ती त्यांना उपयोगी पडली खरी; पण अकरा वर्षांच्या या दिनेशला त्याची सवयच लागली नव्हे, दारूचे व्यसनच लागले. रोजच तो सकाळी पिऊन घरातली कामे करायचा आणि तोंडाला वास असलेल्या स्थितीतच शाळेला जायचा. शाळेतली पोरं त्याला ‘वासमार्या’ म्हणून चिडवायची. त्याची नक्कल करायची. त्याला रडवायची. त्याला आपल्यात घ्यायला टाळायची. वर्गातही सर शिकवत असताना त्याला काही समजायचे नाही. उमजायचे नाही. वर्गात सरांनी प्रश्न विचारल्यावर, तर थरथरल्या देहाने उभा राहायचा आणि गप्प व्हायचा. ‘‘दिनेश ल्येका, तू दारू घेतली की काय? असा गप्प-गप्प का राहतो?’’ असे सरांनी विचारताच निम्म्या वर्गाने ओरडून सांगितले, ‘‘सर, खरंच यानं दारू घेतली आहे. हा रोज दारू पिऊनच शाळेला येतो. बघा तर त्याच्या तोंडाला वास येतोय.’’ खात्री करून घेण्यासाठी वर्गशिक्षक त्याच्याजवळ गेले. अतिघेतलेल्या दारूमुळे त्याचं सारं शरीर बधीर झालं होतं. थरथरत होतं. पाठीवर प्रेमानं थोपटत शिक्षक त्याला म्हणाले, ‘‘दिनेश एवढा चांगला व हुशार मुलगा तू. हा घाणेरडा नाद कसा काय लागला तुला. आणि या कोवळ्या वयात पुन्हा?’’ डबडबलेल्या डोळ्यांनी दिनेश म्हणाला, ‘‘सर, मला सांगायला खूप लाज वाटते; पण माझे आईबाप दारूचा धंदा करतात. दारू गाळतात. दारू विकतात. या असल्या कामासाठी मला राबवितात. मी अभ्यासाला बसलो की आई शिव्या देते. मारते. ती माझी सख्खी आई नाही. सावत्र आहे. ती मला सकाळी दारू पाजते व घरातली सगळी कामे करून घेते. बाप रात्री मला दारू पाजतो आणि तो बायकोबरोबर मजा मारतो. दोघेही पिऊन गोंधळ घालतात. दोघांनी मला या घाणेरड्या व्यसनात अडकविले. आता त्याची मलाही सवयच झाली आहे. सर, खरोखर सांगतो, मला हे घर जेलसारखे वाटते. त्यापासून कुठेतरी दूर पळून जावेसे वाटते; पण जाणार कुठे? नातेवाईक ठाऊक नाहीत व असले, तरी ते सांभाळतील याची खात्री नाही. सर, मला खूप शिकायचे आहे. तुमच्यासारखे मलाही सर व्हायचे आहे. चांगली नोकरी करायची आहे. माझी काहीतरी दुसरीकडे सोय करा. मी तुमचे आयुष्यभर उपकार विसरणार नाही. माझी कुठंही सोय करा. तिथली धुणी-भांडीसुद्धा मी करीन. नाहीतरी घरी आता तेच करतोय.’’ एवढे बोलून तो ढसाढसा रडू लागला. रडता-रडता मटकन खाली बसला. त्याला हुंदका आवरता येईना. सारा वर्ग चकित झाला. त्याची ही कहाणी ऐकून व्यथित झाला. मुलांच्याही डोळ्यांत पाणी दाटले. वर्गशिक्षकाचे अंत:करणही करुणेने दाटून आले. त्यांच्या मनात आले, आपल्याच पोराच्या वयाचा हा. काय-काय भोगावं लागलं याला. आपणच याची सोय करावी. आपणच याला दत्तक घ्यावे. बायकोला नीट समजावून सांगू! तिलाही पटेल सारे आणि त्याचे डोळे पुसत सर म्हणाले, ‘‘दिनेश, मी करतो काहीतरी व्यवस्था. नाहीच कुठे सोय झाली, तर मी तुला माझ्या घरी नेतो. माझ्या प्रभाकरबरोबर दुसरा मुलगा म्हणून तुला सांभाळतो. काही दिवस थांब. हेडसरांच्या कानावर घालून काढू काहीतरी मार्ग. फक्त काही दिवस थांब.’’
आणि आठ दिवसांतच वर्गातील मुलांनी सरांना सांगितले, ‘‘सर, दिनेश खूप आजारी आहे. त्याला सरकारी दवाखान्यात टाकले आहे. आईबाप फारसे लक्ष देत नाहीत. दारूच्या व्यसनानं त्याचं लिव्हर पार बाद झालंय म्हणे. त्याचं काही खरं नाही. आम्ही भेटून आलो त्याला.’’
आणि चारच दिवसांनी या मुलांनी सरांना दाटलेल्या अंत:करणाने सांगितले, ‘‘सर, आपला दिनेश सकाळीच मरण पावला. त्याचा बळी दारूनं आणि त्याच्या आईबापानं घेतला.’’
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक असून, मराठी भाषा, लोकसंस्कृती यांचे ज्येष्ठ अभ्यासक व
नवृत्त प्राचार्य आहेत.)