सुरेश खरे
प्रिय स्मिता ...
उजाडता उजाडता भल्या सकाळी कुणाचा फोन आला, की मी दचकतो. ‘तुम्हाला कळलं का,?’ हा प्रश्न विचारला की काळजाचा ठोका चुकतो. सुधीरनं पुण्याहून फोन करून बातमी सांगितली, ‘स्मिता गेली.’ तुझी प्रकृती ठीक नव्हती, हे माहीत होतं; पण म्हणून..! मनात भावनांचा कल्लोळ उठला. तू इतक्या लवकर जायला नको होतंस; पण ‘लवकर’, ‘उशिरा’ हे आपले हिशेब असतात. नियतीला ते मंजूर नसतात. नाटकातल्या तिसर्या अंकाचा पडदा केव्हा पडणार, हे आपल्याला नेमकं माहीत असतं; पण आपल्या आयुष्याच्या अंकाचा पडदा केव्हा पडणार असतो हे आपल्याला कधीच कळत नाही. माणूस जातं आणि मग आठवणींचं मोहोळ जागं होतं.
‘दूरदर्शन’च्या पडद्यावर बातम्या देताना तुझा प्रसन्न चेहरा पाहत होतो; पण आपली ओळख नव्हती. माझ्या एका ‘गर्जया’त तुला विनायक चासकरनं घेतली. ती आपली पहिली ओळख. तुझा मनमोकळा स्वभाव आणि सहज अभिनय मला भावला. माझ्या ‘काचेचा चंद्र’ च्या पुनरुज्जीवित प्रयोगात तुला मी नायिकेच्या भूमिकेसाठी दिग्दर्शन केल्याचं आठवतं. तुझ्या वाट्याला, ‘तू फक्त हो म्हण’ सारखी अनेक चांगली नाटकं आणि चांगल्या भूमिका आल्या. प्रत्येक भूमिका तू जीव ओतून मनापासून केलीस. अर्थात, त्यात नवल काहीच नव्हतं. एखादी गोष्ट हातात घेतली, की त्यासाठी आपल्या कुवतीप्रमाणे शंभर टक्के योगदान द्यायचं हे तुझ्या रक्तातच होतं. ‘आपल्या कुवतीप्रमाणे’ हे शब्द तुझेच आहेत. तू म्हणायचीस, ‘माझ्या र्मयादा मला माहीत आहेत. त्यामुळे मला शंभर टक्के योगदान देणं भाग आहे. तरच मी त्या ओलांडू शकेन.’ स्मिता, ‘र्मयादा कुणाला नसतात; पण तसं किती कलावंत कबूल करतात?’
माझ्या ‘तिची कथाच वेगळी’ या लता नार्वेकरांच्या चिंतामणी या संस्थेनं रंगमंचावर आणलेल्या नाटकात तू नायिकेच्या भूमिकेत नाही, तर सहकलाकाराच्या भूमिकेत होतीस. तू जेव्हा ती भूमिका करतेय असं मला कळलं तेव्हा मला आनंद झाला; पण जरासं आश्चर्यही वाटलं. कारण, तशी ती दुय्यम भूमिका होती. तुला विचारलं, तर तू म्हणालीस, ‘एखाद्या भूमिकेला कथानकात महत्त्वाचं स्थान असेल, अभिनयाला वाव असेल, तर ती नायिकेची नसली तरी महत्त्वाची ठरते.’ मला तुझ्या अनेक आवडलेल्या भूमिकांपैकी ती एक होती.
तू आणि मी माझ्या ‘काचेचा चंद्र’, ‘शततारका’, ‘एका घरात होती’, ‘असूनी नाथ मी अनाथ’, ‘तूच माझी राणी’ आणि ‘मला उत्तर हवंय’ अशा सहा नाटकांच्या विभिन्न स्वरूपाच्या नायिकांच्या प्रवेशांच्या अभिवाचनाचा (त्या वेळी) अभिनव असलेला ‘या स्मृतीच्या गंधकोषी’ हा कार्यक्रम करीत असू. डोंबिवलीच्या एका प्रयोगात तुझ्या ‘मला उत्तर हवंय’ या नाटकातल्या प्रवेशाला मिळालेला ‘वन्स मोअर’ ही तुझ्या वाचिक अभिनयाला मिळालेली दाद होती. त्यानंतर गेल्या पाच-सहा वर्षांत आपण नाटक आणि कथांच्या अभिवाचनाचे किती कार्यक्रम केले त्याला गणती नाही. माझ्या अनेक कार्यक्रमांत कित्येकदा तुला न विचारता, गृहीत धरून मी कार्यक्रम ठरवून, नंतर तुला कळवीत असे. पण, तुझ्या तोंडून चुकूनही कधी नाराजीचा शब्द आला नाही. तुला एका तारीख दिली आणि तू स्वीकारलीस, की मी अगदी निर्धास्त असे.
तू निर्मिती केलेले चित्रपट आणि मालिका हा एक स्वतंत्र अध्याय आहे. ‘कळत-नकळत’, ‘चौकट राजा’, ‘सवत माझी लाडकी’, ‘सातच्या आत घरात’,
‘तू तिथं मी’ अशा एकापेक्षा एक सरस, आशयसंपन्न चित्रपटांची निर्मिती तू केलीस. तुझं वाचन किती होतं, मला माहीत नाही; पण तुझी साहित्याची जाण मात्र चांगली होती. काही चित्रपटांचं दिग्दर्शनही तू केलंस. तुझे जवळपास सगळेच चित्रपट कमी-अधिक प्रमाणात गाजले. तुझा एक चित्रपट मला बरा नाही वाटला. मी तुला तसं सांगितलंही. मला वाटलं तू नाराज होशील.
पण, तू हसत हसत म्हणालीस, ‘‘हात्तिच्या, एवढंच ना? मला तरी कुठं तो बरा वाटलाय!’’ नवीन नवीन आव्हानं स्वीकारायचा तुला छंद नव्हता, तर व्यसनच होतं. पण, कोणत्याच माध्यमात तू डोळे मिटून उडी घेतली नाहीस. त्या क्षेत्राची पूर्ण माहिती घेऊनच तू पुढे पाऊल टाकायचीस. कधी अमाप यश मिळवलंस, तर कधी अपयशही पदरात घेतलंस. प्रसंगी कर्जही डोक्यावर घेतलंस. पण तू इतकी बिनधास्त की म्हणायचीस, ‘कर्ज उशाशी घेतल्याशिवाय मला शांत झोपच येत नाही.’ जे चित्रपटांचं तेच मालिकांचं. ‘अवंतिका’ला जी अफाट लोकप्रियता मिळाली, तिच्यात कथानकाच्या बरोबरीनं किंबहुना अधिकच तुझ्या कलाकारांच्या निवडीचा वाटा होता. तुझ्या कोणत्याच चित्रपटासाठी किंवा मालिकेसाठी मी लेखन केलं नाही. एकदा तू मला विचारलं होतंस, ‘मालिकेकरिता लिहिणार का?’ मी तुला सांगितलं, ‘माझा तो पिंड नाही’. तू तेव्हा काहीच बोलली नाहीस. पण, नंतर अगदी अलीकडे एका विषय निघाला, तेव्हा तू म्हणालीस, ‘तुम्ही तेव्हा नाही म्हणालात.’ म्हणालात, ‘माझा पिंड नाही. पण, लिहिलंच नाही तर तो आपला पिंड नाही हे समजणार कसं?’ तुझं म्हणणं खरं होतं. पण, हे तेव्हा का नाही बोललीस? कदाचित मी लिहिलंही असतं.
आमचा ‘मिश्कीली’चा अमेरिकेचा अडीच महिन्यांचा दौरा ठरला. आशालताला येता येणार नव्हतं. तुला विचारलं आणि तू तयार झालीस. नव्यानं तालमी घेऊन आपण तो प्रयोग बसवला. तू, मी, सुधीर गाडगीळ आणि स्वरूप खोपकर. अडीच महिन्यांत पंचवीस शहरांत पंचवीस प्रयोग केले. खूप भटकलो, उभी आडवी अमेरिका पालथी घातली. ते दिवस खरोखर सोनेरी होते. अमेरिकेच्या प्रयोगाच्या आधी आपला कोल्हापूरला प्रयोग होता. कोल्हापूरला रात्री जाताना आपल्या टॅक्सीवर दरोडेखोरांनी हल्ला केला. सुधीर आणि स्वरूप सुदैवाने बचावले. पण, तुला आणि मला मार पडला. पण, त्याही परिस्थितीत आपण कोल्हापूर आणि इचलकरंजी असे दोन प्रयोग केले. दरोडेखोरांना तोंड देताना तू आणि स्वरूप, दोघींनीही दाखवलेलं धाडस अतुलनीय होतं. दरोडेखोरांशी प्रतिकार करताना मी हिंदीत बोलत होतो, त्याची टिंगल करायची एकही संधी तू सोडली नाहीस.
स्मिता, तझ्याशी असं बरंच काही बोलायचं होतं; पण आपल्याला कधी निवांतपणे भेटायला वेळच मिळाला नाही. बरंच काही सांगायचं राहूनच गेलं. आता खूप उशीर झालाय. मला माहीत आहे, तुझ्यापर्यंत हे पोहोचणार नाहीये. तरीही लिहिलंय. राहून राहून मनात येतं, तू इतक्या लवकर जायला नको होतंस.
तुझा स्नेहांकित,
सुरेश