शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

ताम्रपत्राने दिली इतिहासाला कलाटणी

By admin | Updated: June 17, 2016 17:54 IST

हाती असलेली माहिती आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारावर इतिहास लिहिला जातो आणि तो ग्राह्यही धरला जातो. कधी तरी अचानक वेगळाच पुरावा समोर येतो आणि आजवर ग्राह्य मानलेल्या इतिहासाला धक्का बसतो. ज्येष्ठ नाणेसंग्रहक रघुवीर पै यांच्याकडील दुर्मिळ ताम्रपटामुळे हर्षवर्धन आणि पुलकेशी यांच्यातील लढाईचा कालखंड निश्चित करणे सोपे झाले आहे,

डॉ. पांडुरंग फळदेसाई(गोवास्थित लेखक लोकसंस्कृतीचे अभ्यासक आहेत.)

सर्वमान्य इतिहासालादेखील कधी आणि कशी कलाटणी मिळेल याचा नेम नसतो. त्याचे मूळ कारण असते संशोधन. खरे तर संशोधन ही निरंतर चालणारी प्रक्रिया असते. इंग्रजीत त्यास ‘रि-सर्च’ म्हणतात. त्यात शोधून मिळविलेल्या माहितीची दाखल्या-पुराव्यांच्या साह्याने पडताळणी करून पाहायची असते. त्या पडताळणीमधून जे बाहेर पडते ते ऐतिहासिक सत्य मानले जाते.विश्वात सतत घटना घडत असतात. कालांतराने त्या घटनांचा इतिहास बनतो. मात्र, आपल्याकडे राजकीय घडामोडींनाच इतिहास म्हणायची प्रथा पडली ती आपल्या शैक्षणिक अभ्यासक्रमामधून. बालपणापासून म्हणजेच आपल्या शालेय जीवनापासून आपण इतिहास शिकतो तो राजकीय घडामोडींचा. नेमकेपणाने सांगायचे तर लढाया, बंड आणि क्रांतीचा; परंतु या घटनांची संगतवार माहिती मिळविण्याची साधनेदेखील अनेकवेळा तुटपुंजी असतात.

 

मग हाती लागलेल्या एखाद्या साधनाच्या आधारावर आपण इतिहास लिहितो. तो इतिहास ग्राह्य धरला जातो; परंतु कधी तरी अचानक आपल्यासमोर वेगळा पुरावा येतो आणि आजवर ग्राह्य मानलेल्या इतिहासाला धक्का बसतो. घटनांची माहिती अधिक ठळकपणे आणि नेमकेपणाने समोर येते. अशीच एक घटना अलीकडील काळात म्हणजे मागील दोन महिन्यांत घडली. काणकोण (गोवा) येथील ज्येष्ठ नाणेसंग्रहक रघुवीर पै हे त्या घटनेला कारणीभूत ठरले. त्यांच्याकडे असलेल्या संग्रहात दुर्मीळ नाणी आहेत. त्या नाण्यांच्या आधारावर अनेक राजवटींचा काळ निर्धारित करता येतो; परंतु त्यांच्याकडील संग्रहात असा एक ताम्रपट आहे की ज्याच्या आधारावर कनौजचा सम्राट हर्षवर्धन आणि बदामीच्या चालुक्य नृपती पुलकेशी-द्वितीय यांच्यामध्ये झालेल्या लढाईचा आणि पुलकेशीच्या विजयाचा तो भक्कम पुरावा आहे.

 

आजवर त्यांच्या लढाईचा काळ नेमकेपणाने कळत नव्हता. तो आता निश्चित करण्यासाठी या ताम्रपटाची प्रचंड मदत झाली आहे. पुण्याच्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंडळाचे निबंधक डॉ. श्रीनंद बापट आणि इतिहासाचे अभ्यासक प्रदीप सोहनी यांनी रघुवीर पै यांच्या मुंबईतील संग्रहामधून हा ताम्रपट घेऊन त्याची माहिती पुण्यात १६ एप्रिल २०१६ रोजी डॉ. प्रभा जोशी स्मृती व्याख्यानमालेत जाहीर केली. या ताम्रपटात २२ सें.मी. बाय ५.८ सें.मी. आकाराची तीन ताम्रपत्रे असून, त्यात ब्राह्मी लिपीत संस्कृत भाषेतील मजकूर कोरण्यात आला आहे. बागलकोटच्या (कर्नाटक) चालुक्यवंशीय पुलकेशीने आपल्या नवव्या राज्यवर्षातील वैशाख पौर्णिमेला असणाऱ्या चंद्रग्रहणाच्या दिवशी म्हणजे बुधवार, दि. ४ एप्रिल इ.स. ६१९ रोजी हा ताम्रपट देण्यात आला आहे.

 

महाराष्ट्राच्या औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणजवळील ब्राह्मणवटवीय म्हणजे आताचे ब्राह्मणगाव आणि वडवाळी या दोन गावांतील पन्नास निवर्तने इतकी जमीन या ताम्रपटाद्वारे कौशिक गोत्रातील नागशर्मा या वेदवेदांगातील विद्वानाला दान देण्यात आली आहे. म्हणजे ४ एप्रिल ६१९ चा हा ताम्रपट म्हणजे एक दानपत्र आहे; परंतु त्या ताम्रपटाच्या आधाराने हर्षवर्धन आणि पुलकेशी यांच्यातील महत्त्वपूर्ण अशी लढाई केव्हा झाली याचा कालखंड निश्चित करणे सोपे झाले आहे, असे डॉ. बाबट आणि सोहनी यांचे मत आहे. आजवरच्या इतिहासात दक्षिण आणि उत्तर भारताच्या सम्राटांमधील ही महत्त्वपूर्ण लढाई इ.स. ६१२ ते ६३४ या बावीस वर्षांच्या काळात कधी तरी झाली असावी असे मानण्यात येत होते; परंतु या ताम्रपटाच्या आधारावर ही लढाई ६१८-६१९ च्या हिवाळ्यात म्हणजे नोव्हेंबर ते एप्रिल या सहा महिन्यांच्या कालावधीत झाली असा निष्कर्ष निघतो. म्हणजे बावीस वर्षांची संदिग्धता जाऊन आता तो काळ फक्त सहा महिन्यांवर आला आहे.

 

या लढाईसंबंधीचे काही मुद्देदेखील अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. पहिली गोष्ट म्हणजे ही लढाई नर्मदेच्या काठावर झाली. त्यावरून नर्मदा नदी ही दक्षिण भारत आणि उत्तर भारताच्या सत्ताधिशांची सीमा होती. ती सीमा पुढे मोगल सत्तेपर्यंत चालू होती. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कनौजचा बलाढ्य सम्राट हर्षवर्धन याचा पराभव दक्षिणेच्या चालुक्य सम्राट पुलकेशीने (द्वितीय) केला. हर्षवर्धनाला उत्तरापथेश्वर म्हणजे बलाढ्य सम्राट मानले जात होते; परंतु ह्युयानत्संगच्या निरीक्षणानुसार त्याच्या राज्यातील आर्थिक स्थिती चांगली नव्हती व राज्य दुष्काळग्रस्त होते. इतिहासतज्ज्ञ पद्मश्री म. के. ढवळीकर यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा स्पष्ट केला आहे. तो म्हणजे, पुलकेशीचा राज्याभिषेक नेमका कोणत्या वर्षी झाला याबद्दल संदिग्धता होती. या ताम्रपटाच्या आधारे तो राज्याभिषेक इ. स. ६१०-६११ च्या हिवाळ्यात झाला असावा, या निष्कर्षाला पुष्टी मिळते.

 

पुलकेशीने हर्षवर्धनाचा पराभव करून तो परत येताना गोदावरी नदीच्या काठी त्याने हे भूदान केले, असा उल्लेख या ताम्रपटात मिळतो. रघुवीर पै यांच्या संग्रहातील या ताम्रपटाने अशा प्रकारे अनेक ऐतिहासिक घटनांचा उलगडा केला आहे. त्याचे कौतुक म्हणून आणि ऐतिहासिक दस्तऐवज जपून ठेवण्याबद्दलची पै यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंडळातर्फे त्यांचा औचित्यपूर्ण सत्कार करण्यात आला. हा सत्कार ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ पद्मश्री म. के. ढवळीकर यांच्या हस्ते व्याख्यानमालेच्या वेळी करण्यात आला. एका गोमंतपुत्राच्या संग्रहातील दस्तावेजामुळे आजवरच्या चालुक्यांचा इतिहासाला नेमकेपणाची कलाटणी मिळाली याबद्दल इतिहासप्रेमींना निश्चितच आनंद होईल.