- शेखर जोशी
आपल्याच माणसांशी संवादासाठी आजकाल ‘फेसबुक’. ‘व्हॉट्सअँप’ लागते.. हे आजचे युवा जग.
पण ‘आम्ही आधुनिकतेचे शिलेदार आहोत. आमचे विचार तुमच्यासारखे ऑर्थोडॉक्स नाहीत..’ असं म्हणत म्हणत युवा मंडळी वयाने मोठी होतात.. प्रत्येक दोन पिढय़ांत अशाच काहीशा संवादाच्या फैरी वर्षानुवर्षे झडल्या असाव्यात. एका पिढीकडे वयामुळे गोळा झालेली अनुभवाची शिदोरी, तर उगवत्या पिढीकडे जग उलथवून टाकण्याचे आव्हान पेलण्याची धडाडी.. मानवाने आपल्या सर्जनशीलतेने भौतिक समृद्धीच्या वाटेवर मजल-दरमजल करीत आपल्या पावलांचे ठसे उमटवायला सुरुवात केली. हळूहळू वैचारिक स्थित्यंतर होऊ लागले. पिढी दर पिढी नवीन सामाजिक विचारधारेचा उदय होत गेला. विचार, मानसिकता आणि कृती ऐहिकतेकडे झुकू लागल्या. मूल्ये बदलत जाऊ लागली. संस्कारांची शिदोरी आजकाल फार तर तारुण्यावस्थेपर्यंतच टिकते. अशा वयात ‘स्व-विचार’ आणि त्यातून ‘स्व-निर्णय’ असा प्रवास सुरू होतो. समवयस्कांच्या विचारांचा प्रभाव पडण्याचा हाच काळ. यातच भर म्हणजे जगातील घडामोडींचा व उलथापालथीचा प्रभाव व्यक्ती-व्यक्तीवर, समाजावर आणि संस्कृतींवर वाढू लागतो. वास्तव असे की, जगात कोणत्याही काळात शैशव, तारुण्य आणि प्रौढत्व एकत्रच नांदत असते. त्यामुळे एकाच वेळी, एकाच ठिकाणी या तीनही वयोगटांतल्या तीन विचारधारा एकत्र वाहत असतात. त्यामुळेच या बदलाला एक सामाजिक, सार्वजनिक आणि पर्यायाने जागतिक संदर्भ मिळत जातो. खरे तर संस्कृती आणि मूल्ये सोबतीला घेऊन माणूस आणि समाजमन घडत असते. दोन पिढय़ांमधे मूल्यांची रस्सीखेच सुरू होते. तरुण पिढीला हा सामना म्हणजे ज्येष्ठांनी जणू नव्या दमाच्या पिढीच्या अस्तित्वावरीलच नव्हे, तर स्वातंत्र्यावर घातलेला घाला असावा, असे वाटू लागते. मोठय़ांविषयी तेढ निर्माण होते.. आदर उणावतो. कारण आता अवघ्या जगातील जगण्याचे संदर्भ बदललेले असतात. वास्तविक पाहता मूल्ये व आदर्श ही चिरंतन असतात.. शाश्वत असतात. नव्हे, ती असावीच लागतात. मूल्यांच्या भक्कम पायावर घर, देश, समाज आणि देशाची बांधणी होत असते.
काळाच्या ओघात जो देश, समाज आपली संस्कृती वा मूल्ये विसरतो, अशा देशांतील मनामनांत विस्कटलेल्या आत्मकेंद्रित विचारांची रुजवात होऊ लागते. तसे पहिले तर या पृथ्वीतलावर माणूस फार अलीकडे अस्तित्वात आला.. तरीही मानवाने सातत्याने बदल घडवत आपली उन्नती केली. त्यामुळेच विश्वोन्नतीचा खरा अर्थ म्हणजे या वसुंधरेवरील प्रत्येक जीव शतकानुशतके आनंदी कसा राहू शकेल याचा विचार करत राहणं हा होय. यासाठी आदश्रांची, मूल्यांची ‘वैश्विकते’ची कावड जगातील प्रत्येक पिढीने खांद्यावर वाहणे, हाच एकमेव ध्यास माणसाला असणे प्राधान्याचे ठरते. यासाठी येणार्या प्रत्येक पिढीने उगवत्या पिढीला अखंड ‘विश्वबंधुत्व’ तत्त्वाची शिकवण द्यावीच लागेल. तरच या वसुंधरेवर भिन्न संस्कृती आनंदात नांदतील. म्हणूनच ‘वैश्विक मना’ची जडणघडण करणे आणि प्रत्येक मनाने तळमळीने ‘वैश्विक भान’ जपत पुढे जात राहणे हे सर्वांत महत्त्वाचे मूल्य ठरते. असा विचार करणे म्हणजे मानवी मूल्यांची बैठक पक्की करणे होय. ‘सर्व विश्वाचे मंगल होवो..जीवांचे मैत्र वाढो’ अशी प्रार्थना ज्ञानेश्वरांनी आपल्या पसायदानात केली. त्यांना अशाच विश्वव्यापी मूल्यांच्या जपणुकीची अपेक्षा असावी. अशीच इच्छा जगातील सगळ्या संतश्रेष्ठ महात्म्यांनी वेळोवेळी व्यक्त केली आहे. काळाच्या बदलत्या संदर्भात कुठे-कुठे मूल्यांच्या चौकटीला तडे जात राहिले.. आपण काहीतरी नवीन करतोय या आवेशात जगभरातील प्रत्येक पिढी या चौकटीला आपल्या परीने सैल करत राहिली. शतकानुशतके हे होत राहिले आहे. आज दिसणारी आदश्रांची, मूल्यांची हेळसांड ही गेल्या शतकात झपाट्याने झालेल्या विज्ञान-तंत्रज्ञानाची किमया आहे की काय, असे वाटू लागते. जसजशी समृद्धी वाढत जाते तसतशी मूल्यांची घसरण होते.. हा इतिहास आणि वर्तमानदेखील आहे. ऐहिकतेच्या दुनियेत माणूस आपल्या परिघापुरता उरला.. आदश्रांची प्रत्येकाची त्रिज्या वेगळी.. आवाका वेगळा.. प्रत्येक मनाने दिलेली मान्यता वेगळी. यातून पोकळी निर्माण होते. औपचारिकता उदयाला येते. आणि आता तर साध्या शेजारधर्माचे पालन हे देखील आज नावापुरते शिल्लक राहिलेले! हे स्थित्यंतर घडले कधी, का व कसे?
विसाव्या शतकात जगातील पुढारलेल्या राष्ट्रांच्या आधुनिकतेचे गोडवे जगभरात दुमदुमू लागले. संपर्काची नवनवी साधने उपलब्ध होऊ लागली. प्रगत देशांतील कुटुंबव्यवस्था आणि परस्परांतील संबंध यांची वर्णने मग पुस्तकातून जगभर पोहोचू लागली. त्यापाठोपाठ पाश्चात्य चित्रपट निर्मात्यांनी त्या-त्या काळातील तेथील समाजमानस आणि व्यक्तिगत आयुष्यातील बारकावे आणि संघर्ष यांचे रजतपटावर दिलखेचक दर्शन घडवून जगभरातील प्रेक्षकांच्या आणि मुख्यत्वे युवकांच्या मनोबदलाच्या प्रक्रियेत खूपच भर घातली, हे नि:संशय. चित्रपटांत आणि अलीकडे आपल्याकडील दूरचित्रवाणी वाहिन्यांनी अवास्तव कथानकांच्या माध्यमातून दाखवताना आदश्रांशी घेतलेली फारकतही जणू राजमान्य होऊ लागली. पात्रांच्या परस्परसंबंधांच्या खोट्या व भ्रामक दर्शनामधून समाजमन बहकले किंवा चुकीच्या दिशेने न गेले तरच नवल.. काळाच्या ओघात वैचारिकता बदलत जाते ती अशी.
खरं तर हे विचार मनात यायला कारणही तसंच घडलं. काही कामानिमित्त एका शाळेत जाण्याचा योग आला. शाळा मला अपरिचित. पण त्या शाळेची इमारत, मैदानावरून वर्गात रांगेत चाललेली, युनिफॉर्ममधली मुलं बघून मी स्मरणरंजनात बुडून गेलो. अधीक्षकांच्या खोलीत मी बसून राहिलो होतो. थोड्याच वेळात आपल्यासोबत दोन मुलींची तक्रार घेऊन एक टीचर दाखल झाल्या. त्यांनी अधीक्षकांच्या कानांवर घडलेला प्रकार घातला. मुली आठव्या इयत्तेतील असाव्यात, असा कयास मी बांधला. खोली तशी छोटीशी असल्याने काहीही न करता सारे संभाषण माझ्या कानांवर पडत होते. ‘‘या मुली तपकीर ओढून मुद्दाम शिंका काढून वर्गाला त्रास देण्याचा उद्योग करत होत्या..’’ बाईंनी आपली तक्रार नोंदवली. शिक्षकांचे हे वाक्य ऐकून अधीक्षक बाईंनी त्या दोघींना चांगलेच फैलावर घ्यायला सुरुवात केली. दोघींनी इतक्या सबबी सांगितल्या, की ज्याचं नाव ते. इतक्यात हेडबाईंनी बोलावल्याने अधीक्षक बाई आणि त्या टीचर निघून गेल्या. आता त्या खोलीत फक्त दोघी मुली आणि मी एवढेच काय ते उरलो होतो. त्या मुलींच्या निरागस चेहर्याकडे पाहून त्यांनी असं काही केलं असेल, असे सांगूनही खरं वाटलं नसतं. त्या दोघी आता काय करतात हे मी पाहू लागलो. त्या दोघींतल्या चेहर्यावरून अधिक निष्पाप वाटणार्या मुलीने खिशातून ती वादग्रस्त तपकिरीची डबी काढली आणि कचर्याची टोपली शोधून आपल्याजवळचा पुरावा नष्ट केला.. विजयाचे स्मित त्यांच्या चेहर्यावर उमटले.. आणि आजकालचे क्रिकेटपटू प्रतिस्पर्धी टीमच्या खेळाडूची विकेट पडल्यावर हात उंचावून एकमेकांना टाळी देतात, तसे त्यांनी एकमेकींचे कौतुक केले! त्यांच्या या बेसुमार अभिनयाने मी पुरता चक्रावून गेलो.. आपल्याला कुणीतरी वयाने मोठी व्यक्ती बघतेय, टीचर आल्यावर हे गृहस्थ (म्हणजे मी) त्यांना हा उपद्व्याप सांगतील. या भीतीचा लवलेशदेखील त्यांच्या चेहर्यावर दिसत नव्हता. त्या मुलींची ती कृती माझ्या विचारांच्या आवाक्यात बसणे अशक्य होते. मनातली मूल्यांची चौकट त्यानंतर बराच काळ थरथरत राहिली. माझं काम झालं आणि मी तेथून काढता पाय घेतला. नंतर तिथे काय झालं, याचे फार तर कल्पनाचित्र मी रंगवू शकत होतो. अशा अनेक प्रसंगांची अव्याहत मालिका जगभरात अखंडपणे वाढत्या भाजणीनुसार सुरूच राहिली असणार यात शंका नाही.
आजची पिढी फास्ट नव्हे, सुपरफास्ट आहे. असावीदेखील. त्यात गैर काहीच नाही. पण घरातील निर्णय सर्वांनी मिळून घ्यायचा असतो, आपल्याला आलेला अनुभव शेअर करायचा असतो.. हे विचार अभावाने मनात येतात. वडीलधार्यांशी तुटक संवाद सुरू होतो. पूर्वीच्या ‘कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे..’ या ओळींऐवजी ‘आय डोन्ट केअर’ हे शब्द ओठांवर येतात. मस्ती तीच.. शब्द नवे. शिक्षण, स्पर्धा, नोकरी..पैसा, भाकरीच्या गोलात युवा मंडळी फिरत राहतात.
हे करताना यशस्वी होण्याचा शॉर्टकट शोधला जातो. नोकरी मिळवण्यासाठी हात ओले करणे यात किंवा यांसारख्या अनेक प्रसंगांत आपले वागणे गैर आहे असे वाटेनासे होते.. सगळेच तर करतात; मग मी का नाही तसे करायचे? स्वार्थ आणि फक्त स्वार्थ असा पोसला जातो.. पैसा द्यायचा असेल तर तो खूप मिळवावा लागतो. मग कोणत्याही मार्गाने तो मिळवण्याचे पर्याय अवलंबले जातात. असे प्रसंग सभोवताली घडताना पाहून सच्छील आणि सुशील मनात उद्वेगाचे पडघम घुमू लागतात.. दुर्दैवाने अशांची संख्या रोडावू लागते.
‘मी कुणीतरी वेगळा आहे’, हे सिद्ध करायचा चकवा मनाला भुरळ पडतो.. ‘मला हवं ते मिळालं नाही, तर ते मी ओरबाडून घेईन’ अशी मनोवृत्ती घडत जाते. समाजात स्वार्थापोटी चाललेली नीतिमूल्यांची लज्जास्पद पायमल्ली.. अरेरावी, मुस्कटदाबी, शिरजोरी.. पिळवणूक, गलिच्छ राजकारण.. पैशाची धुंदी, फसवा डामडौल, नुसता देखावा, उसना आव.. भ्रामक भपका.. पदोपदी दिसू लागते. हे सारं पाहिल्यावर ‘तळमळे अवघी प्रजा.. उत्सवी मग्न राजा’ हे बोल मला आठवतात! दुसर्याला दु:खात लोटून आपण ऐश करायची.. ‘लिव्ह लाइफ किंग साइझ!’ प्रत्येकाला असा राजा व्हायचंय, घरात, घराबाहेर.. चौकात, गावात..नीतिमूल्यांची पायमल्ली होतच राहते.
‘आम्हाला आमची मते आहेत. आमच्या मनगटात ताकद आहे.. आम्हाला शिकवू नका.. आमचे भविष्य आमच्या हाती आहे.. आम्हाला जसे वाटते तसे आम्ही वागू’, असा रोखठोक विचार ऐकू यायला लागतो. या विचारांचा उगम कसा होतो, याचे कोडे उलगडत जाते.. मतलबी विचारांचे वारे हळूहळू सर्वदूर पसरले जातात. भविष्याची दिशा धूसर होत जाते..
गोलाकार गिरकी घेत कालचक्र फिरत राहतं.. चेहरे बदलतात.. या प्रवासात काळ पुढे जात असतो. कालयंत्रातील वाळू रिती होतच असते.. लाटा येतात.. लाटा उसळतात.. लाटा फेसाळतात..पण या लाटा नीतिमूल्यांच्या विस्तीर्ण किनार्याशी येऊन कधीतरी विसावायला हव्याच. यासाठी मनाचा किनारा जपायला हवा. काळाच्या अथांगतेत माणुसकीचे गलबत शाबूत ठेवायचा निरलस प्रयत्न आता करू या.. मूल्यांची चौकट पुन्हा घट्ट बांधण्याची गरज आज कधी नव्हे इतकी आवश्यक झाली आहे..!
(लेखक व्यवस्थापन सल्लागार आहेत.)