- विश्राम ढोले
देशातील धार्मिक वातावरण पुन्हा एकदा गढूळ होत चालले आहे. देव आणि धर्माच्या नावाखाली विद्वेष आणि हिंसा वाढत आहे. ही परिस्थिती काही पहिल्यांदाच येत आहे, असे नाही. वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्यात आपल्या आणि इतरांच्या देवाचे आणि धर्माचे काय करायचे हे काही आजचेच प्रश्न आहेत असे नाही. या प्रश्नांवर हिंसेच्या मार्गाने उत्तर लादण्याचे प्रयत्न आजचेच आहेत, असेही नाही. मात्र हेही खरेच की, श्रद्धा आणि धर्माच्या प्रश्नावर विद्वेष किंवा हिंसेव्यतिरिक्त उत्तरे शोधण्याचे प्रयत्नही तितकेच जुने आहेत. असे प्रयत्न सातत्याने करणा:या व्यवस्थांमध्ये हिंदी चित्रपटांचा समावेश नक्कीच करावा लागेल. आणि अर्थातच चित्रपटगीतांचाही. सगळ्यांच्याच श्रद्धांना एकाच वेळी आणि सारख्याच आदराने सामावून घेत जगण्याचा संदेश चित्रपट आणि त्यातील गाण्यांनी सातत्याने दिला आहे.
‘हम दोनो’ (1961) मधील ‘अल्ला तेरो नाम, ईश्वर तेरो नाम’ हे गाणो त्यातील मेरूमणी. खरंतर ‘हम दोनो’ हा काही सामाजिक-धार्मिक विषयावरील चित्रपट नाही. तो टिपिकल देव आनंद छापाचा मसाला चित्रपट आहे. ज्या प्रसंगाच्या संदर्भात हे गाणो येते तो प्रसंगही काही फार वेगळा वगैरे नाही. भिन्न श्रद्धांचा काही संघर्ष उडाला आहे आणि त्यासंदर्भात हे गाणो येते असेही नाही. लढाईवर गेलेल्या पतीच्या रक्षणासाठी पत्नीने केलेली प्रार्थना इतक्या साध्या संदर्भात हे गाणो येते. पण प्रसंग, चित्रीकरण, अभिनय अशी कोणतीच चमकदार पाश्र्वभूमी नसतानाही हे गाणो अफाट लोकप्रिय झाले. आजही आहे. लताच्या सर्वोत्तम गाण्यांमध्ये त्याची गणना होते. लताचा आवाज आणि जयदेव यांची उत्कृष्ट संगीतरचना हे या गाण्याच्या लोकप्रियतेचे एक मोठे कारण आहे हे नक्कीच. पण तेवढेच नाही. साहिर लुधियानवींच्या साध्याच पण मार्मिक शब्दकळेतून साकारलेला आणि धर्माच्या संकुचित व्याख्येपलीकडे जाणारा समावेशक भक्तीचा, ईश्वरशरणतेचा संदेश हेही या गाण्याच्या सार्वकालिक लोकप्रियतेचे तितकेच महत्त्वाचे कारण आहे. ‘नाव अल्ला असल्याने किंवा ईश्वर असल्याने काही फरक पडत नाही, या नावांना धारण करणारे सारतत्त्व एकच आहे’ असे अतिशय शांत आश्वासक सुरात सांगत हे गाणो त्याच्याकडे सन्मतीची- शुद्ध मतीची- मागणी करते. दुबळ्यांना बळ देतानाच बलवानांना त्यांचे बळ चांगल्या कामासाठी वापरण्याचे ज्ञान दे असे म्हणत हे गाणो ज्ञान आणि शक्ती, ज्ञान आणि कृती यांच्यात पडत जाणा:या फरकाकडेही आपले लक्ष वेधते. हा भेद मिटविण्याचे साकडे त्या नियंत्रक ईश्वरी तत्त्वाला घालते. हे साकडे थेट सर्वे भद्रांणी पश्यन्तूशी नाते सांगते. धार्मिक चौकटीबाहेर जाऊन शुद्ध मानवीय स्वरूपात मागितलेलं हे मागणं आधुनिक पण सश्रद्ध मनाला भावते. म्हणूनच अल्ला तेरो नाम हे फक्त चित्रपटगीत राहत नाही, तर आधुनिक जगात वावरू पाहणा:या सश्रद्धाची ती धर्मनिरपेक्ष प्रार्थना बनते.
अल्ला तेरो नाम ही प्रार्थना इतकी लोकप्रिय झाली की स्वत: साहिरलाही त्या ओळीचा आधार घेऊन आणखी एक गीत रचण्याचा मोह आवरला नाही. हम दोनो नंतर नऊ वर्षांनी आलेल्या नया रास्ता (1970) या चित्रपटात हे गाणो आहे. ‘ईश्वर अल्ला तेरे नाम, सब को सन्मती दे भगवान’ असा मुखडा घेऊन येणारे हे गाणो गायलेय रफीने. ‘जनम का कोई तोल नही, करम से है सब की पहचान. सब को सन्मती दे भगवान’ असे सांगत हे गाणो ईश्वरी शक्तीपुढे जात-धर्माच्या भेदांना काहीच स्थान नाही असे स्पष्ट करते. अल्ला तेरो नाममधील संदेशाचाच अधिक लौकिक पातळीवर विस्तार करते.
लोकप्रियता, सौंदर्यमूल्य आणि संदेश अशा सा:या निकषांवर अल्ला तेरो नाम हे कल्ट गाणो ठरते. पण धर्मनिरपेक्ष सश्रद्धतेचा संदेश देणारी इतरही काही गाणी बरीच गाजली. ‘दो आँखे बारा हाथ’ (1957) मधील ‘ए मालिक तेरे बंदे हम’ किंवा ‘सीमा’ (1955) मधील ‘तू प्यार का सागर है..’ ही त्याची ठळक उदाहरणो. या दोन्ही गाण्यांमध्ये एक समान धागा आहे. ही गाणी म्हणजे परिघावरच्या व्यक्तींनी केलेली प्रार्थना आहे. ‘ए मालिक तेरे बंदे हम’ मध्ये सच्चाईच्या मार्गाने चालण्याची आणि वाईटाचा मोह सोडण्याची शक्ती दे अशी प्रार्थना करणारे कैदी आहेत, तर ‘तू प्यार का सागर है’ मध्ये ईश्वरी कृपेचा एक क्षण तरी वाटय़ाला येऊ दे ही विनवणी लौकिक जगात प्रेमाला पारखे झालेल्या वंचितांसाठी करण्यात आली आहे. एकेकाळी हिंसेचा मार्ग अवलंबणारे कैदी ‘वो बुराई करे, हम भलाई करे, नहीं बदले की हो कामना’ अशी प्रार्थना करतात, तर जगाची उपेक्षा, अवहेलना वाटय़ाला आलेल्या आणि जीवन-मृत्यूच्या सीमेवर रेंगाळणा:या परित्यक्ता ‘कानो में जरा कह दे, की जाए कौन दिशा से हम’ अशी प्रश्नार्थक विनंती करतात. यातील महत्त्वाचा भाग असा की, ही प्रार्थना किंवा विनवणी जिला केली आहे ती शक्ती कोणा एका धार्मिक संदर्भात येत नाही. मालिक- बंदा, तू-हम अशा धर्मनिरपेक्ष शब्दांच्या कोंदणात येते. ‘हम को मन की शक्ती देना’ (गुड्डी- 1971) किंवा ‘तुम आशा विश्वास हमारे’ (सुबह- 1983 आणि लाल सलाम 2002) हीदेखील याच सेक्युलर प्रार्थना या जातकुळीतील गाणी. ‘काबुलीवाला’ (1961) मधील ‘गंगा आए कहाँ से, गंगा जाए कहाँ रे’ हे गाणो तर नदीच्या रूपकातून आदिम सांस्कृतिक श्रद्धाच व्यक्त करते.
प्रचलित धर्मांच्या आणि त्यातील दैवतांच्या संदर्भापलीकडे जाणा:या मानवी स्खलनशीलतेवर मात करण्याची शक्ती देण्याची विनवणी करणा:या आणि लौकिक जगाशी घट्ट नाते जोडलेल्या या आधुनिक प्रार्थना देऊन हिंदी चित्रपटांनी एक महत्त्वपूर्ण काम केले आहे. परंपरा आणि आधुनिकतेतील एका धारदार संघर्षाला त्यांनी एका समन्वयाचे रूप दिले आहे. धार्मिकता, दैववाद, कर्मकांड यांच्या आश्रयाने व्यक्त होणारी पारंपरिक श्रद्धा आधुनिकतेला रु चत नाही. कारण गुढावरील आणि पारलौकिकावरील श्रद्धेपेक्षा आधुनिकता लौकिकावर आणि मानवीय कृती व विवेकावर अधिक विश्वास ठेवते. अशावेळी वर्षानुवर्षे परंपरेने सिद्ध केलेल्या आणि अजूनही लाखोंच्या मनात जाग्या असलेल्या श्रद्धांचे, सश्रद्धतेतून साकारणा:या क्रियाशीलतेचे, आशावादाचे आधुनिक होताना काय करायचे हा एक मोठाच प्रश्न होता. एकोणविसाव्या शतकातील प्रबोधन काळापासून विविध धुरिणांनी त्यांच्या त्यांच्या परीने या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यातून साकारलेली एक समन्वयवादी समजच या हिंदी गाण्यांमधून पॉप्युलर पातळीवर व्यक्त होते, असे म्हणता येते. एका अर्थाने परंपरेने दिलेल्या गुढवादी श्रद्धांचे, भक्तिभावाचे, शरणभावाचे या गाण्यांनी आधुनिकीकरण केले. त्यांना कोणत्याही एका विशिष्ट अशा धर्माच्या कोंदणात न ठेवता सर्वांनाच खुले राहील अशा शब्दकळेच्या रूपात मांडले आणि सूर आणि तालाच्या साह्याने लाखो लोकांच्या मनात आणि गळ्यात प्रस्थापित केले. ही थोडे अतिशयोक्त असले तरी असे म्हणता येते की, भक्ती चळवळीने किंवा सुफी संप्रदायाने केलेल्या कामाचा आधुनिक विस्तार या गाण्यांनी केला.
याचा अर्थ असा नाही की हिंदी चित्रपटांमध्ये हिंदू किंवा इस्लामच्या प्रस्थापित धार्मिकतेसंदर्भात येणारी गाणीच नाहीत. देवदेवतांची गुणगान गाणारी चिकार गाणी आहेत. अगदी राम-कृष्णांपासून ते संतोषीमातेपर्यंत अनेक हिंदू देव-देवतांवर गाणी आहेत. त्यातील बरीच गाजलीही. अल्ला, अली, पैगंबर यांचे आणि इस्लाममधील तत्त्वांचे संदर्भ देणारीही गाणी बरीच आहेत. शीख आणि बौद्धधर्मीय संदर्भातही काही गाणी आहेत. भारतासारख्या धार्मिक पारंपरिक देशात असे चित्रपट किंवा गाणी संख्येने बरीच असणार यात नवल नाही. आणि काही गैरही नाही. पण या प्रस्थापित चौकटीच्या बाहेर जाऊन जुन्या श्रद्धांना आधुनिकतेच्या अंगणात प्रयत्नपूर्वक रुजविण्याचा, त्यांच्यातील मानवीय आवाहन कायम ठेवून धर्मातीत बनविण्याचा हा प्रयत्न ऐतिहासिक म्हटला पाहिजे. वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्यात आपल्या आणि दुस:यांच्या श्रद्धांचे काय करायचे या आपल्यासारख्याला छळणा:या प्रश्नांचे काहीएक व्यवस्थापन करण्याचा हा ऐतिहासिक प्रयत्न आहे. आज हा प्रश्न अधिक उग्र स्वरूपात छळत असताना ‘अल्ला तेरो नाम, ईश्वर तेरो नाम’चे महत्त्व म्हणून अधिकच वाढते. आणि त्यातील ‘सब को सन्मती दे भगवान’ या प्रार्थनेचे समकालीन औचित्यही अधिकच जाणवते..
(लेखक माध्यम, तंत्रज्ञान आणि संस्कृती
या विषयाचे अभ्यासक आहेत.)
vishramdhole@gmail.com