रूपाली मुधोळकरचैतन्य ताम्हाणे या तरुण दिग्दर्शकाने साकारलेल्या ‘कोर्ट’ या मराठी चित्रपटाला सवरेत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. - प्रदर्शनापूर्वीच तब्बल अठरा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारांवर आपले नाव कोरणा:या या चित्रपटाचे नावही तोर्पयत कुणी ऐकले नव्हते. येत्या 17 एप्रिलला प्रदर्शित होऊ घातलेल्या या चित्रपटातून एक नवा ‘नायक’ येतो आहे : अभिनयाची कुठलीही पाश्र्वभूमी नसताना पडद्यावर जादू करणा:या नागपूरच्या वीरा साथीदार यांच्याशी हा संवाद!
---------------नारायण कांबळे आणि त्याच्यावरचा कोर्टातील खटला, या कथानकाभोवती फिरणारा चित्रपट : कोर्ट! देशपातळीवरील सवरेत्कृष्ट ठरून राट्रीय पुरस्कार पटकावणारा मराठी चित्रपट! मुंबईत गिरणी कामगार असलेल्या नारायणची एके दिवशी नोकरी जाते आणि मग पोटापाण्यासाठी तो लोकशाहीर म्हणून काम करू लागतो. पण लोकशाहीर म्हणून जगताना तो ‘आरोपी’ ठरतो. त्याचेच गाणो ऐकून एका स्वच्छता कर्मचा:याने आत्महत्त्या केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात येतो आणि नारायणवर खटला भरतो. खटला सुरू असताना दोन्ही वकिलांचा कोर्टातील युक्तिवाद, कोर्टाची काम करण्याची पद्धत असे एकंदर कोर्टाचे कामकाज हे या चित्रपटाचे कथासूत्र आणि नारायण कांबळे हा या कथासूत्रचा सूत्रधार. हा कथानायक आणि तो साकारणारा अभिनेता यांचे आयुष्य परस्परांपासून फार वेगळे नाही.आयुष्यात पहिल्यांदा चित्रपटात भूमिका, ती थेट नायकाची आणि गाजावाजा एकदम जगभरात असे सारे साधलेल्या या चळवळ्या कलावंताचे नाव वीरा साथीदार. शिक्षण अर्धवट सोडलेला हमालाचा एक मुलगा! आयुष्याच्या उमेदीच्या वर्षात गुरे राखणारा, पुढे कुठल्याशा कारखान्यात राबणारा, जगण्या-मरण्याच्या संघर्षात प्रस्थापित व्यवस्थेचे दाहक चटके सोसणारा आणि यानंतर याच व्यवस्थेविरुद्ध उभा ठाकणारा! वीरा साथीदार हे त्याचे नाव. वीरा साथीदार नावाचा हा चळवळ्या अचानक ‘कोर्ट’ या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटाचा नायक बनतो. एका रात्रीत प्रकाशझोतात येतो. डोळे दिपवून टाकणा:या ग्लॅमरस सिनेसृष्टीचा एक भाग बनतो. सगळेच अद्भुत!कॉम्रेड याचा अर्थ साथीदार. पुढे हेच नाव धारण करून वीरा यांची वाटचाल सुरू झाली आणि या वाटचालीत व्यवस्थेशी चार हात करताना ‘चळवळ्या’ हा शिक्का कधी त्यांच्या माथी बसला, हे त्यांनाही कळले नाही. कवी, लेखक, गायक, पत्रकार, ‘रिपब्लिकन पँथर्स’ या संघटनेचा कार्यकर्ता, ‘विद्रोही’ या मासिकाचे संपादक आणि आता प्रदर्शनापूर्वीच गाजलेल्या ‘कोर्ट’ या चित्रपटाचा नायक असा सगळा वीरा यांचा संघर्षमय प्रवास. ‘कोर्ट’ या सिनेमाचा नायक नारायण कांबळे आणि वीरा यांच्या संघर्षाची कथा जणू सारखीच आहे.अभिनयाची कुठलीही पाश्र्वभूमी नसताना वीरांकडे ही भूमिका चालत आली. आपल्या हातून काही तरी ‘भव्यदिव्य’ घडणार आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर एक अभिनेता म्हणून आपण नावारूपास येणार, हे तोर्पयत वीरा यांच्या ध्यानीमनीही नव्हते. पण नियतीने ती संधी त्यांना दिली आणि एका हमालाच्या मुलाने (वीरा यांना असे म्हणवून घेण्यात कुठलाही कमीपणा वाटत नाही) या संधीचे सोने केले. पण हे करताना या ‘सोनेरी’ आभेने दिपून न जाता, इतरांचे आयुष्य ‘सोनेरी’ करण्याचे भान त्यांनी राखले. चैतन्य ताम्हाणो या तरुण दिग्दर्शकाच्या कल्पनेतून साकारलेली ‘नारायण कांबळे’ ही व्यक्तिरेखा वीरा यांनी पडद्यावर अशी काही जिवंत केली, की अभिनयाच्या क्षेत्रत ते नवखे आहेत, हे सांगूनही कुणाला खरे वाटणार नाही. ‘कोर्टा’त खटल्याला सामोरे गेलेल्या नारायण कांबळेने आपल्या तत्त्वांशी तडजोड केली नाही. वीरा यांच्या आयुष्यातही तडजोड या शब्दाला थारा नाही. पोटासाठी वीरा यांनी मोलमजुरी केली, गुरे वाहिली. तत्त्वांसाठी ‘दमन’कारी व्यवस्थेचे फटके ङोलले. गरिबीचे चटके सोसले, पण तत्त्वांची कास सोडली नाही.‘कोर्ट’ चित्रपटातील नायकाच्या भूमिकेसाठी वीरा यांना चैतन्य ताम्हाणो यांचे बोलवणो आले तेव्हा वीरा यांना आपली निवड होईल, असे वाटले नव्हते. तशी अपेक्षाही त्यांना नव्हतीच. पण वीरा भेटायला गेले आणि त्यांच्या नकळत कॅमेरे ऑन झाले. नकळत घेतलेल्या या ‘ऑडिशन’मध्ये वीरा पास झाले. मला हवा तो नायक मिळाला, हे वाक्य ऐकून वीरा थकले, पण चैतन्य त्यांची प्रशंसा करताना थकले नाहीत, इतका त्यांचा त्यावेळचा अभिनय नैसर्गिक होता. या दरम्यान वीरांच्या काही चळवळ्या मित्रंनी त्यांना चित्रपट न स्वीकारण्याचा सल्ला दिला. एकदा अभिनयात पडलास की चळवळीपासून तुटशील, असे सांगून त्यांच्या अनेक मित्रंनी त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न केले. पण वीरा ठाम होते. ग्लॅमरस जग त्यांना खुणावत होते असे नव्हे, तर या संधीमुळे नुकसान नाही तर चळवळीचा फायदाच होईल, यावर वीरा यांचा ठाम विश्वास होता. चळवळीबद्दल प्रामाणिक असाल तर कुणीही तिच्यापासून तुम्हाला तोडू शकत नाही, हा विचार त्यामागे होता. चळवळीसाठी वेळ नाही, पण आपल्या मानधनातील निम्मी रक्कम म्हणूनच त्यांनी चळवळीला वाहिली. चित्रपट, अभिनय हे माङो करिअर नाही, तर ते माङो ‘माध्यम’ आहे. भविष्यात संधी चालून आल्या तर मी नक्की स्वीकारीन; पण त्यामागे धावणार नाही, असे वीरा सांगतात. दिग्दर्शकाने दिलेल्या रेल्चेच्या फस्र्ट क्लासच्या तिकिटावर दिल्ली ते मुंबई प्रवास करताना त्यांचा एक स्वानुभव त्यांच्या या शब्दांची साक्ष देणारा आहे. रेल्वेच्या फस्र्ट क्लासच्या डब्यात बसल्यावर सर्वप्रथम त्यांच्या डोक्यात कुठला विचार आला असेल तर तो म्हणजे समाजातील पराकोटीच्या विसंगतीचा. काही लोक मोलमजुरी करतात. वीतभर पोटासाठी रक्ताचे पाणी करतात. याउलट काही जण दररोज राजेशाही थाटात प्रवास करतात. आज आपणही त्यातलेच, हे शल्य त्यांना बोचू लागले. माणसामाणसाच्या जगण्यातील ही पराकोटीची विसंगती त्यांना आतून पोखरून गेली. दहावी नापास झाल्यावर मी गुरेढोरे चारणार, हे त्यांनी आपल्या आई-वडिलांना सांगून टाकले होते. हा मठ्ठपणा नव्हता, तर हमालाचे पोर शिकूच शकत नाही हा व्यवस्थेने त्यांच्यावर लादलेला न्यूनगंड शिरजोर ठरला होता. पोरगा गुरे चारतो, हे बापाला पाहवत नव्हते. ते लेकामागे तगादा लावायचे; इतका की एक दिवस बापाची ही ‘कटकट’ सहन न झाल्यामुळेच वीरा नागपुरात आले. नागपुरातील जोगीनगर भागात राहायला लागले. - 50 वर्षापूर्वीची ही वस्ती म्हणजे गरिबांची-मजुरांची हमालपट्टी. या वस्तीत वीरा रमले. सहा रुपये रोजीने एका कारखान्यात कामाला लागले. त्यांच्यासोबतचे मित्र शिकून सवरून मोठे झाले आणि दूर गेले. मग वीरांना चित्रपट पाहायचे वेड लागले, इतके की उपाशी राहून त्यांनी एकामागोमाग एक चित्रपट बघितले. नंतर एक दिवस मॅक्ङिाम गॉर्कीचे ‘आई’ हे पुस्तक वाचण्यात आले आणि वीरा बदलले. इतके की चित्रपट पाहण्याचे वेड जाऊन वाचनाच्या वेडाने त्यांना झपाटले. यानंतर काही दिवस पत्रकारितेच्या जगात त्यांनी मुशागिरी केली. या दरम्यान मुंबईतील गिरणी कामगारांचा संप सुरू झाला आणि वीरा आपसुक या चळवळीत ओढले गेले. पुढे चळवळ हेच त्यांचे आयुष्य झाले.- ‘कोर्ट’ या चित्रपटातील नारायण कांबळे आणि ‘आयुष्याच्या कोर्टा’तील वीरा हे भविष्यात कुठल्या रूपात जिवंत राहतील? संवेदनाहीन होत चाललेल्या समाजात कसा तग धरून राहतील? या प्रश्नांवर वीरा प्रसन्न हसतात. ‘‘नारायण कांबळे प्रेक्षकांच्या मनातून पुसला जाईल, वीरा साथीदार हयात नसेल; पण जग सोडून निघून जाताना ताठ मानेने जगलो आणि सच्चेपणाने सच्चेपणासाठी लढलो, याचे समाधान या दोघांच्याही चेह:यावर असेल.. ’’- ते सांगतात आणि मग गप्प होतात!सच्चेपणा.. आणि रात्रीची शांत झोप!- अचानक वाट्याला आला तो सिनेमातला नायकच, आणि त्याहीपेक्षा धक्का बसला तो थेट मिळालेल्या राट्रीय पुरस्काराने!हमालाच्या पोटी जन्मलेल्या या लेकाचे अवघे आयुष्य तसे संघर्षातच सरले आजवर. आजही वीरा साथीदार दोन खोल्यांच्या भाडय़ाच्या घरात राहतात. एका राट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटाचा नायक म्हणून लोक जिथे जातील तिथे त्यांना गराडा घालतात; पण वीरा आजही तेच आहेत. ‘‘माङया आयुष्यात या ग्लॅमरमुळे फारसा फरक पडेल असे मला वाटत नाही’’, असे ते ठामपणो सांगतात. ‘‘ सच्चेपणा आणि रात्रीची शांत झोप हीच माझी संपत्ती आहे. यापेक्षा मला कशाचाच लोभ नाही. माङया बायकोने मला मजुरी करून पोसले, तिलाही संपत्तीचा मोह नाही’’, असे सांगताना वीरा यांची छाती अभिमानाने भरून येते. मग ते सहज गुणगुणतात.तिचे पाहून गा हाल..येती काळजाला कळाऊन्हा पावसात राबे माझी सावळी मंजुळा..(लेखिका ‘लोकमत’च्या नागपूर आवृत्तीत वरिष्ठ उपसंपादक आहेत)