शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

फडावरची ये - जा

By admin | Updated: January 31, 2015 18:37 IST

पश्‍चिम महाराष्ट्रातल्या तमाशाच्या फडांवर फेरफटका मारला तर समजतं ते हे, की पिढय़ान्पिढय़ा फडावर नाचणार्‍या ‘कलावंतिणी’च्या घरातल्या तरुण मुली फडाची रेघ ओलांडून, बुकं शिकून बाहेरच्या जगात डॉक्टर-इंजिनिअर व्हायला निघाल्या आहेत.

 सचिन जवळकोटे

(लेखक ‘लोकमत’च्या सातारा आवृत्तीचे प्रमुख आहेत.)

 
पश्‍चिम महाराष्ट्रातल्या तमाशाच्या फडांवर फेरफटका मारला तर समजतं ते हे, की पिढय़ान्पिढय़ा फडावर नाचणार्‍या ‘कलावंतिणी’च्या घरातल्या तरुण मुली फडाची रेघ ओलांडून, बुकं शिकून बाहेरच्या जगात डॉक्टर-इंजिनिअर व्हायला निघाल्या आहेत. .आणि फडाबाहेरच्या मध्यमवर्गीय घरातल्या उच्चशिक्षित तरुणींची पावलं पारंपरिक लावणी नृत्याचा खासा बाज आत्मसात करण्याच्या ओढीनं घुंगरू बांधून ‘या रावजी. बसा भावजी’च्या अदा   शिकण्यासाठी पारंपरिक फडांकडे वळू लागली आहेत.
 
'लावणी’ म्हटलं म्हणजे  घुंगरांच्या छणछणाटाबरोबर बेहोश झालेला एक माहोलच उभा राहातो नजरेसमोर आणि त्या माहोलाशी जोडलेली संस्कृतीही.
खरं तर केवढी स्थित्यंतरं पाहिली या कलेनं. चापूनचोपून नेसलेल्या नऊवारीतल्या खानदानी शृंगारातलं हे फडकतं प्रकरण मराठी इश्कबाजीत फार जुनं. घुंगरांच्या बोलाबरोबरच्या मादक शब्दात अध्यात्माची वाट शोधू पाहणारं.
पुढे फडातल्या कलावंतिणीच्या पोरीनं ढोलकीच्या तालावर नाचावं. तक्क्यावर रेललेल्या गावच्या पाटलानं मिशा पिळत तिला दाद देतादेता रुपयेपैशात तिच्या शरीराचं मोल करावं हे चित्र रुजवलं ते कोल्हापूरच्या मातीत तयार झालेल्या मराठी सिनेमानं. नंतर ‘लोककले’ची कनात लावून सिनेमातल्या उडत्या द्वर्थी गाण्यांवर गावोगाव नाचणारी छचोर आणि मादक लावणी ‘बार’ उडवू लागली. थेटरातल्या गैरप्रकारांनी भलती बदनाम झाली.
या रानोमाळ झालेल्या कलेची हरवली प्रतिष्ठा पुन्हा कमावली आणि पांढरपेशा रसिकांसमोर घायाळ करणारी लावणी मोठय़ा दिमाखात पेश केली ती सुरेखा पुणेकर यांच्या पिढीतल्या कलावतींनी.
- आणि आता तर एक नवीच वाट या घुंगरांना खुणावते आहे.
‘नुसत्या भुवया उंचावून अन् बोटं हवेत फिरवून अंगभर नऊवारीतही लावणीतली मादकता पेश करता येते. त्यासाठी उघडी पाठ दाखविण्याची गरजही नाही,’ हे सुरेखाबाईंनी सिद्ध केलं. चांगल्या घरची मंडळी कुटुंबासहित ‘लावणी शो’ पहायला नाट्यगृहात धडकू लागली आणि सारा माहोलच बदलला. महाराष्ट्र थिएटर मालक संघटनेच्या अध्यक्ष केशरबाई ऊर्फ नानी घाडगेंच्या भाषेत सांगायचं तर ‘कधीकाळचा बैलगाडीतला जलसा हळूहळू नाट्यगृहातला शो बनल्यामुळं या कलेची क्रेझ वाढली.’
पैसा आला, प्रतिष्ठा आली, बाहेरच्या जगाची दारं उघडली आणि जन्मल्यापासून फडावरच नाचणार्‍या बायांनी आपल्या मुलींच्या पायात घुंगरू बांधण्याऐवजी त्यांच्या हाती पेन-पेन्सिल  देण्याचा चंग बांधला. नानी सांगतात,  ‘आमच्याकडे नाचणार्‍या बहुतांश बाया अडाणी. त्यांच्या मुली मात्र शिकल्या बघा. सरकारी शिक्षण मोफत झालं. वह्या, पुस्तकं  सहज मिळू लागली. थेटरात वाजले की बारा म्हणणार्‍या आम्हा बायांची पोरं आता शाळेत वन टू हण्ड्रेड म्हणू लागलीत.’
आईच्या पाठिंब्यावर कलावंतिणींच्या पोरी शिकत गेल्या. खुद्द केशरबाईंची नात पल्लवी  कॉम्प्युटर इंजिनिअर झाली. माढा तालुक्यातल्या मुसळेंची किरण डेप्युटी कलेक्टर झाली तर बाश्रीची कविता पोलीस अधिकारी! सुरेखा कोरडेचे ‘घुंगरू’ही पोलीस भरतीच्या दिशेने गेले. शेकडोजणी पुण्या-मुंबईत नोकरीला लागल्या. त्यामुळे संगीतबारीतील तरुण नर्तकींचा ओघ गेल्या काही वर्षांत प्रचंड प्रमाणात कमी झाला.
पुणे-बेंगलोर हायवेवरच्या ‘पिंजरा’चे मालक विजयबापू यादव सांगत होते. ‘महाराष्ट्रात सध्या तमाशाची छप्पन थिएटर्स आहेत. सर्वाधिक संख्या पुणे-सोलापूर जिल्ह्यांत. दर श्रावणात नव्या पाटर्य़ांसोबत आमचा करार ठरतो. पूर्वी दोन-चार थिएटरांना भेटी दिल्या तरी चांगले कलाकार मिळायचे; पण आता, दहा-बारा ठिकाणी हेलपाटे मारावे लागतात. शिकलेल्या तरुण पोरी इकडं यायलाच तयार नाहीत. खूप विचित्र परिस्थिती निर्माण झालीय आमच्या क्षेत्रात.’
सध्या ज्या काही मुली तमाशाच्या पारंपरिक थेटरात नाचतात, त्यासुद्धा थोड्याफार शिकलेल्या. मोबाइलमुळं सतत जगाशी संपर्कात राहिलेल्या. पूर्वीच्या काळी वर्षानुवर्षे या मुलींना घरच्यांचं तोंड पहायला मिळत नसे. आता मात्र, महिन्यातून दोन दिवस हक्काची सुट्टी घेऊन या मुली पुण्या-मुंबईच्या मार्केटमध्ये शॉपिंगला जातात. त्यांचं राहणीमान आणि विचारही बदलले आहेत. त्यांना इतर समवयीन मुलींसारख्या जगण्याची ओढ आहे. त्यासाठी बदलायची, नवी कौशल्यं शिकायची तयारी आहे.
‘पारंपरिक फडातल्या मुली शिकून बाहेर जाणार असतील, तर फडावर लावणी नाचणार कोण?’ - या प्रश्नाला मिळू लागलेलं उत्तर मोठं रोचक आहे. आणि समाजातल्या बदलत्या मानसिकतेचं प्रतीकही!
ज्या (पांढरपेशा) वर्गात एकेकाळी लावणी ‘बदनाम’ ठरली होती, त्याच वर्गातल्या शिकल्या-सवरल्या लेकी-सुना आता एक आव्हानात्मक कलाप्रकार म्हणून ‘लावणी’ शिकण्या-नाचण्याच्या ओढीनं फडावर उभ्या राहू लागल्या आहेत. त्यांच्या आईवडिलांना आपल्या मुलीच्या घुंगरांचं कौतुक आहे आणि नवर्‍यांना आपल्या कलावंत पत्नीचा अभिमान!
सातार्‍याच्या नाट्यदिग्दर्शिका वैशाली राजेघाटगे सांगत होत्या, ‘माझे वडील वकील. आई सामाजिक कार्यात सक्रिय. घर शिकलं-सवरलेलं. पण मला लावणीचं भारी आकर्षण. ही कला आपणही शिकावी असं फार वाटे. त्यासाठी तमाशाचे अनेक कार्यक्रम बघितले. अभ्यास केला. माझ्यासारख्याच सुशिक्षित तरुणींना एकत्र आणलं आणि आम्ही सार्‍याजणी अस्सल मराठमोळ्या लावण्यांसोबतच वेस्टर्न स्टाईल गाण्यांवर आधारित गावरान ठसका सादर करू लागलो.’
वैशालीबाईंच्या ‘नूपुरनाद’ या कार्यक्रमाचे सातारा-सांगलीत, कोल्हापूर-पुण्यात हाऊसफुल शो होतात. कार्यक्रमापूर्वी या सगळ्या आपापलं शिक्षण सांगतात, तेव्हा समोरचं पब्लिक चाट पडतं.
या ग्रुपमधल्या अनेकजणी जबाबदारीच्या जागेवर उत्तम पगाराच्या नोकर्‍या करतात. ट्रेझरी शाखेत क्लार्क म्हणून काम करणारी शीतल लांडगे स्टेजवर ‘जाऊ ऽऽ द्या ना घरी’ म्हणत थिरकते, तेव्हा तिच्या ऑफिसातल्या सहकार्‍यांना ओळखू येत नाही. ‘हात नका लावू माझ्या साडीलाऽऽ’वर ठेका धरणार्‍या चैत्राली यादवनं तर डॉक्टरेट मिळवलीय. पुण्यात प्राध्यापिका असणारी माधुरी गीते अन् शेअर ब्रोकरचं काम करणारी सायली ढवळे या दोघी तर जॉब सांभाळून अगदी वेळेत त्या-त्या गावातलं नाट्यगृह गाठतात. बाकीच्याही शिक्षण घेताहेत. लावणी नाचून पैसे कमावणं, हे त्यांच्या ध्यानीमनीही नाही. या सार्‍याजणी केवळ एकाच वेडानं झपाटलेल्या.. लावणी! बेहोश करणार्‍या या बेफाम नृत्याची ओढच त्यांच्या पायात घुंगरू बांधती झाली आहे.
 
 
 
    ..पर्वा कुणाची ?
 
नाट्यगृह खचाखच भरलेलं. ‘बुगडी माझी सांडली ऽऽ गं’च्या तालावर नर्तिकांच्या पायातल्या घुंगरांनी ठेका धरलेला. गाण्याच्या सोबतीला शिट्यांचाही आवाज घुमू लागलेला. शेवटच्या गाण्याला श्रोत्यांना मुजरा करत एकेक नर्तिका विंगेत शिरते. टाळ्यांच्या कडकडाटात पडदा पडतो. स्टेजच्या हौदात बसलेला एक पुरुष उडी मारून समोरच्या एका नर्तिकेला सामोरा जातो. ‘खूप छान नाचलीस गंऽऽ.’- त्यानं दिलेली दाद ऐकून ती सुखावते, लाजतेही; कारण गुपचूप हौदात बसून तिची अदाकारी मोठय़ा कौतुकानं बघणारा तो असतो तिचा नवरा. सरकारी नोकरीत रजा टाकून खास तिच्यासाठी धावत-पळत आलेला.
 ‘नाचणारीनं पायात घुंगरू बांधावेत, गळ्यात मंगळसूत्र नव्हे,’ या  ‘फिल्मी’ परंपरेत अडकून पडलेल्यांना चक्रावून टाकेल असा हा बदल प्रत्यक्ष अनुभवणार्‍या सुवर्णाला विचारा, काळ किती बदललाय. दोन मुलांची आई असलेली सातार्‍याची सुवर्णा चरकी एका चांगल्या खासगी कंपनीत मोठय़ा हुद्यावर काम करते. पायातलं घुंगरू सोडवत ती सांगत होती, ‘माझं माहेर खानदानी. सासरही खाऊन-पिऊन सुखी. मला लहानपणापासून डान्सची आवड. आमच्या लेडीज ग्रुपनं लावणी शो सादर करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा पहिला कौतुकाचा पाठिंबा माझ्या नवर्‍याचा होता!’ 
- श्रोत्यांमधून शिट्या वाजल्या की भान हरपून वाजणार्‍या टाळ्यांमध्ये नर्तिकांचे आईवडील आणि कधीकधी तर कौतुकाने फुललेले नवरेही असतात.
 
 
  ..घुंगरू तुटले रे !
 
संध्याकाळची वेळ. अंधार पडू लागला, तसा पिंजरा सांस्कृतिक कला-केंद्रातला उत्साहही उजळू लागला. प्रत्येकीचीच नटून-थटून साजशृंगार करण्यासाठी धांदल. त्याचवेळी, एका पार्टीची मालकीण मात्र मोबाइलवर बोलण्यात गुंतलेली. गावाकडं शिकायला ठेवलेली तिची मुलगी परीक्षेत पास झाल्याचं तिकडून मोठय़ा कौतुकानं सांगत होती. ‘भरपूऽऽर शिक गं बाई ऽऽ’ म्हणत मालकीणीनं संवाद संपवला. 
मुलींवर लक्ष ठेवत उषा वानवडकर सांगत होत्या, ‘माझी पणजी याच पेशातली. आजी अन् आईनंतर मीही घुंगरूच बांधले. आता माझी मुलगी तेरा वर्षांची झालीय. अभ्यासात हुश्शार. तिला इंजिनिअर व्हायचंय. त्यासाठी लागेल तेवढा पैसा खर्च करायला मी तयार आहे. दोन बैठका जास्त घेईन; पण पैसा कमी पडू देणार नाही. आम्ही भोगलं, ते भविष्यात लेकीच्या नशिबी नको.’
- उषाताई लातूर जिल्ह्यातल्या. त्यांच्या पार्टीतली औश्याजवळची अनिता काळे ग्रॅज्युएटपर्यंत गेलेली. केवळ परिस्थितीमुळं तमाशा केंद्रात आलेली अनिता सांगत होती, ‘आमच्या समाजातल्या मुली आता या क्षेत्रात यायला नको म्हणतात. पूर्वीच्या काळी आठ-दहा वर्षांच्या मुलींनाही डान्सचं ट्रेनिंग दिलं जायचं. तेराव्या-चौदाव्या वर्षी मुलगी पायात घुंगरू बांधून थेट फडात. त्याकाळी तिला चॉईस नव्हता; पण आता नव्या कायद्यामुळं अठरा वर्षे पूर्ण झाल्याशिवाय मुलीला नाचता येत नाही. तोवर तिची बारावी झालेली असते. जगाचं ज्ञान आलेलं असतं. नोकरी करून मोठं होण्याची स्वप्नं बघितलेली असतात. म्हणूनच गेल्या पाच-सात वर्षांपासून नवीन मुली येण्याचं प्रमाण सत्तर-ऐंशी टक्क्यानं घटलंय. माझ्या गावाकडच्या अनेक मुली आज शिकून चांगल्या पगारावर काम करू लागल्यात.’ 
अनिता उत्साहाने सांगत होती. तिच्या खोलीतल्या खुर्चीवर एक छानसं पुस्तक पडलं होतं. त्याचं नाव होतं ‘तोडू तणावाचा पिंजरा!’
 
 
 मी आणि लावणी
 
‘ती तूच होतीस का? विश्‍वासच बसला नाही’ - कथकच्या कार्यक्रमात माझ्या लावणीची अदा पेश झाली, की त्या ‘कड्डक’ परफॉर्मन्सला ही  ‘अशी’ दाद मिळणं आता माझ्या सवयीचं झालंय. अनेकदा परदेशातल्या कार्यक्रमात तर ‘त्याने गालावर मारली टिचकी’ असल्या शृंगारिक नखर्‍यांचा अर्थ इंग्रजीतून समजावून देत देत मी नाचले आहे. कथकच्या शास्त्रशुद्ध प्रशिक्षणाचा बाज उतरवून ठेवून अस्सल गावरान ठसक्यात लावणी नाचण्याबद्दलची प्रशंसा स्वीकारताना मी नतमस्तक असते, ती अर्थातच माझ्यावरच्या नृत्यसंस्कारांसमोर ! 
माझ्यावर नृत्याचे संस्कार लहानपणापासून झाले. माझी आई गायिका. ती सर्व प्रकारची गाणी सहजपणे गात असे. तिला कुठलाही गान प्रकार वज्र्य नव्हता. त्यामुळे लहानपणापासून मी इतर गाण्यांबरोबर लावण्यासुद्धा ऐकत राहिले. वाढत्या वयाबरोबर कथक व लावणी या नृत्यप्रकारांमधली समानता व भिन्नता उमजत गेली आणि लावणीच्या इश्कबाजीची बेहोशी माझ्या नृत्यात उमटू लागली. 
परदेशी आणि अमराठी रसिकांसमोर लावणी सादर करण्याचा आनंद मी मनमुराद लुटला आहे. लुई बँकस यांच्या ज्ॉझबरोबर रंगलेली माझ्या लावणीची फ्यूजन जुगलबंदी अविस्मरणीय होती.
- मला लावणी ‘माझी’ वाटते. लावणीचं वातावरण ही माझी परंपरा नाही, फडावरचे चाळ माझ्या पायात बांधले गेले नाहीत, पण माझ्या पायातले कथकचे घुंगरू लावणीच्या बोलांनी थिरकतात, ती धुंदी माझ्या शरीरात उतरते आणि धसमुसळ्या शृंगाराचा तो नखरा माझ्यातल्या कथक नर्तिकेला आव्हान देतो.
- परंपरा जन्माने येते तशी ती ध्यासापोटीही जन्म घेते.
लावणीशी माझं जन्माचं नाही, पण हे असं ध्यासाचं वेडं नातं आहे.  
 
- अदिती भागवत
(लावणीच्या ‘अस्सल’ सादरीकरणासाठी प्रसिद्ध असलेल्या ख्यातनाम कथक नर्तिका)