शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

हवामान बदलाचा रुद्रावतार

By admin | Updated: May 31, 2014 16:20 IST

थंडीच्या दिवसांत पडणारा पाऊस, एकाएकी मोठय़ा प्रमाणात वाढणारे तापमान आणि मॉन्सून आगमनाच्या दिवसांत होणारे बदल यांचा भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. त्याचा हा आढावा..

 राहुल कलाल

पृथ्वीवरील जीवनासाठी हवामान हा एक महत्त्वाचा घटक आहे. या हवामानामुळेच आज पृथ्वीवर सजीवसृष्टी टिकून राहिलेली असून, त्याच्या मदतीनेच सामाजिक -आर्थिक अभिसरण होताना दिसून येत आहे. मात्र, जागतिक तपामानवाढ आणि हवामानबदलामुळे पूर्ण जग ढवळून निघत असतानाच त्याच्या झळा भारतालाही वेगाने बसू लागल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) १९0१ ते २0१३ या ११२ वर्षांतील आकडेवारीच्या केलेल्या सखोल अभ्यासामधून दिसून येत आहे. यामध्ये प्रत्येक राज्यात नेमके काय बदल होत आहेत, याचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आला. यात अनेक राज्यांच्या तापमानात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून आले, तर भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या मॉन्सूनच्या पावसाच्या वितरणात आणि तीव्रतेतही वेगाने बदल होत असल्याचे दिसून आले आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत वेगाने घोडदौड करणार्‍या भारतीय अर्थव्यवस्थेवर याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. हे रोखण्यासाठी स्थानिक पातळीपासून केंद्र पातळीपर्यंत उपाययोजना निर्माण करून त्या प्रभावी पद्धतीने राबविण्याची आवश्यकता आहे.
सन १९0१ ते २0१३ या ११२ वर्षांत पृथ्वीच्या तापमानात मोठी वाढ झाली आहे. ती 0.८९ अंश सेल्सिअस इतकी आहे. पृथ्वीच्या काही भागांचे तापमान तर आणखी वाढून १.0८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. एवढय़ा प्रमाणात होणारी वाढ पहिल्यांदाच नोंदविली गेली असून, ती धोक्याची घंटा आहे. या तापमानवाढीचा आणि हवामानबदलाचा परिणाम समुद्रावरही दिसून येऊ लागला आहे. हिमनग वेगाने वितळू लागल्याने समुद्राच्या पातळीमध्ये वाढ होऊ लागली आहे. या ११२ वर्षांत समुद्राच्या पाण्याची पातळी 0.३३ ते 0.६२ मीटरने वाढल्याचे अभ्यासात दिसून आले आहे. विविध शास्त्रज्ञांनी केलेल्या भाकितांपेक्षा ही तापमानवाढ जास्त आहे. याचा थेट परिणाम उष्ण कटिबंधातील भागांवर दिसून येऊ लागला आहे आणि विकसनशील देशांना त्याच्या झळा बसण्याची शक्यता वाढली आहे. या जागतिक बदलामुळे केवळ तापमानातच वाढ झालेली नाही, तर पावसाची तीव्रताही कमीअधिक झाल्याचे अभ्यासात दिसून आले आहे. 
भारत वेगाने विकसित होणारा देश आहे. नुकत्याच एका जागतिक सर्वेक्षणात भारताची अर्थव्यवस्था गरुडझेप घेत जागतिक क्रमवारीत तिसर्‍या क्रमांकावर पोहोचली आहे. ही घोडदौड आणखी वाढण्याची अपेक्षा जागतिक स्तरावर व्यक्त केली जात आहे. अशा काळात जागतिक हवामानबदलाचा विपरीत परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर झाल्याखेरीज राहणार नाही, हे या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. हे रोखण्यासाठी स्थानिक पातळीपासून देश पातळी आणि जागतिक पातळीवर सक्रिय उपाययोजना करणे गरजेचे आहे. 
जागतिक तापमानवाढ, हवामानबदल, वेगाने वाढणारी लोकसंख्या व हव्यासापोटी ओरबडली जाणारी नैसर्गिक साधनसंपत्ती यांचा थेट परिणाम सजीवसृष्टीवर होणार असून, त्यामुळे भविष्यात अन्नसुरक्षा, शुद्ध पाणी, आरोग्य आणि ऊर्जा यांबाबत गंभीर प्रश्न निर्माण होतील. 
भारतातील हवामानशास्त्राचा अभ्यास आणि अंदाज वर्तविणारी एक अग्रगण्य शासकीय संस्था म्हणून आयएमडीचा नावलौकिक आहे. आयएमडीचे देशाच्या कानाकोपर्‍यात विस्तृत जाळे असून, त्यामध्ये ५00 सरफेस मेट्रॉलॉजिक स्टेशन आणि अडीच हजारांहून अधिक रेनफॉल स्टेशन यांचा समावेश आहे. यांपैकी २८२ सरफेस मेट्रॉलॉजिक स्टेशन आणि १ हजार ४५१ रेनफॉल स्टेशनमध्ये जमा होणार्‍या आकडेवारीचा वापर राज्यांमध्ये होणार्‍या हवामानबदलाच्या अभ्यासासाठी केला गेला. 
हवामानबदलाची स्थिती
हवामानबदलाची स्थिती देशामध्ये वेगाने बिघडत आहे. प्रत्येक राज्याची स्थिती वेगळी असून, बहुतांशी राज्यांच्या वार्षिक तापमानात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. केवळ इंडो-गंगेटीक प्लेटमध्ये येणार्‍या राज्यांमध्येच तापमानवाढ दिसून आलेली नाही. काही राज्यांचे तापमान वाढणे आणि घटणे यांमध्ये लहरीपणा दिसून आला आहे. याचबरोबर, मॉन्सूनच्या पावसातही सातत्याने घट दिसून आली, ही चिंतेची बाब आहे. 
बहुतांशी राज्यांच्या तापमानामध्ये १९५१ ते २0१0 या वर्षांमध्ये सातत्याने वाढ दिसून आली आहे. यामध्ये बिहार, छत्तीसगड, दिल्ली, हरियाना, जम्मू-काश्मीर, मेघालय, पंजाब, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, अंदमान-निकोबार बेटे, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, झारखंड, कर्नाटक, केरळ, लक्षद्वीप बेटे, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, मिझोराम, ओडिशा, राजस्थान, सिक्कीम, तमिळनाडू व उत्तराखंड या राज्यांचा समावेश आहे. देशात सर्वाधिक तापमानवाढ हिमाचल प्रदेशामध्ये दिसून आली आहे. या राज्याचे तापमान दर वर्षी 0.0६ अंशांनी वाढत आहे. दिसायला हा आकडा छोटा असला, तरी दर वर्षी एवढे तापमान वाढल्याने तेथील हवामानात वेगाने बदल होऊ लागले असून, जैववैविध्यावर त्याचे दुष्परिणाम दिसून येत आहेत. त्यापाठोपाठ गोव्याचे तापमान दर वर्षी 0.0४ अंशाने वाढत आहे. मिझोराम, मणिपूर व तमिळनाडूचे तापमान दर वर्षी 0.0३ अंशाने वाढत आहे. ही धोक्याची घंटा आहे.
एकीकडे, तापमानात वेगाने वाढ होत असतानाच काही राज्यांच्या तापमानात या काळात सातत्याने घट दिसून आली आहे. यामध्ये पंजाब, हरियाना यांचा समावेश आहे. पंजाबचे तापमान दर वर्षी 0.0१ अंशाने, तर हरियानाचे तापमान दर वर्षी 0.0२ अंशाने घटत आहे. 
मॉन्सूनचा लहरीपणा वाढला
भारताची अर्थव्यस्था ही कृषिप्रधान असून, देशातील बहुतांशी शेती ही नैऋत्य मोसमी पावसावर (मॉन्सून) अवलंबून आहे. मात्र, या मॉन्सूनचा लहरीपणा वाढला असून, त्याचा विपरीत परिणाम पावसाच्या वितरणावर होऊ लागला आहे. पावसाचे दिवस वाढत नसतानाही अनेक राज्यांमध्ये पावसाची तीव्रता वाढली आहे. यावरून राज्यांमध्ये महापूर, ओला दुष्काळ पडण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे स्पष्ट होत असून, पुढील काळात हे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता आहे. 
सन १९५१ ते २0१0 या काळात बिहार, गुजरात, झारखंड, कर्नाटक, लक्षद्वीप, पश्‍चिम बंगाल, मेघालय आणि मिझोराम या राज्यांमध्ये मॉन्सूनच्या पावसाची तीव्रता वाढत असल्याचे अभ्यासात दिसून आले आहे. तर, अंदमान-निकोबार बेटे, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, छत्तीसगड, दिल्ली, गोवा, हरियाना, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, नागालँड, ओडिशा, पंजाब, राजस्थान, सिक्कीम, तमिळनाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश व उत्तराखंड या राज्यांमधील मॉन्सूनच्या पावसाच्या प्रमाणात सातत्याने घट दिसून आली आहे. 
मॉन्सूनचा पाऊस ४ महिने पडत असला, तरी दक्षिण मोसमी पाऊस व वर्षात इतर वेळी पडणारा पाऊसही राज्यांसाठी महत्त्वाचा आहे. मात्र, या वार्षिक पावसावरही जागतिक तापमानवाढ आणि हवामानबदलाचा परिणाम दिसून येऊ लागला आहे. अनेक राज्यांमध्ये वार्षिक पावसाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामध्ये आंध्र प्रदेश, बिहार, गुजरात, हरियाना, जम्मू-काश्मीर, झारखंड, लक्षद्वीप बेटे, मणिूपर, मेघालय, मिझोराम, ओडिशा, राजस्थान, तमिळनाडू, त्रिपुरा व पश्‍चिम बंगाल यांचा समावेश आहे. मेघालय राज्याच्या वार्षिक पावसामध्ये या काळात सर्वाधिक वाढ नोंदविली गेली आहे. तेथे दर वर्षी सरासरीपेक्षा १४.६८ मिमी पाऊस जास्त पडत आहे. त्यापाठोपाठ पश्‍चिम बंगालमध्ये दर वर्षी वार्षिक पावसापेक्षा ३.६३ मिमी पाऊस वाढत आहे. मात्र, या भागांमध्ये पाऊस पडण्याच्या दिवसांमध्ये वाढ झालेली नाही. त्यावरून हे स्पष्ट होत आहे, की मुसळधार पाऊस, ढगफुटीसारख्या पावसाची तीव्रता या भागांमध्ये वाढू लागली आहे. यामुळे महापूर, ओला दुष्काळ यासारख्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली असून, त्याचा विपरीत परिणाम सजीवांवर होत असून दर वर्षी मोठय़ा वित्तहानीलाही देशाला सामोरे जावे लागत आहे. एकीकडे पावसाचे प्रमाण वाढत असतानाच, दुसरीकडे काही राज्यांमध्ये पावसाचे प्रमाण घटत असल्याचेही दिसून आले आहे. यांमध्ये अंदमान-निकोबार बेटे, उत्तर प्रदेश यांचा समावेश आहे. अंदमान-निकोबार बेटांवरून दर वर्षी ७.७७ मिमी आणि उत्तर प्रदेशामधून दर वर्षी ४.५२ मिमी पाऊस कमी होत असल्याचे अभ्यासात दिसून आले आहे.
हवामानबदल आणि तापमानवाढीचा फटका भारताला बसू लागला असून, भविष्यात त्याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या गोष्टीकडे आतापर्यंत केला जाणारा काणाडोळा आता परवडणारा नाही. हे रोखण्यासाठी केवळ शासकीय स्तरावर प्रयत्न करून भागणार नाही, तर प्रत्येकाने वैयक्तिक पातळीपासून प्रयत्न करायला हवेत. 
(लेखक लोकमत पुणे आवृत्तीमध्ये 
बातमीदार आहेत.)