- शर्मिला फडके
फाइल्स, पुस्तकं, बिलं, पावत्या, कागद, कामाच्या याद्या यांनी आपलं कामाचं टेबल गजबलेलं असेल, वापरात नसलेल्या साड्या, न बसणारे कपडे, महागडे पण घट्ट ब्लाउज, ओढण्यांच्या गुंडाळ्या, स्टोल्स, जॅकेट्सच्या पसाऱ्यानं आपलं कपड्यांचं कपाट ओसंडून वाहत असेल तर नववर्षाच्या संकल्पाआधी एका जागी जरा शांत बसा आणि स्वत:शीच मान्य करा की मला माझ्या आतला आणि बाहेरचा पसारा, अडगळ आवरण्याची गरज आहे.
भोवतालच्या आणि आतल्या अडगळीचा, पसाऱ्याचा मनावर येणारा ताण अती झाला, कोलाहल वाढला आणि त्यातून हा कॉलम सुरू झाला. जीवनशैली सोपी, तणावरहित करायचे वैयक्तिक पातळीवर प्रयत्न चालू असताना, साहजिकच बाहेरच्या जगातही या संदर्भात अनेकांचे चालत असलेले प्रयोग वाचनात येत राहिले. मिनिमलिझम हे तत्त्व किती वेगवेगळ्या पातळ्यांवर, सखोलतेनं आणि सहजतेनं आपल्या रोजच्या आयुष्यात सामावून घेता येऊ शकतं हे त्यातूनच लक्षात येत गेलं. कोणताही बदल हा कधीच सोपा नसतो. जीवनशैलीतला तर नाहीच. अडथळे, पसारा, अडगळ आपणच निर्माण केलेले असतात. ते दूर सारणं, आवरून ठेवणं आणि मोकळा, स्वच्छ अवकाश आपल्या सभोवताली निर्माण करणं, आणि मग तो आपल्या आत झिरपू देणं हे साधं वाटणारं वाक्य जीवनाचे तत्त्व म्हणून स्वीकारण्याचे प्रयत्न शतकानुशतके, वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये अनेकांनी केले. पिढ्यान्पिढ्या ते हस्तांतरित होत राहिले. झेनसारख्या तत्त्वज्ञानाचा पाया त्यातून उभारला गेला. मिनिमलिझम माझ्या जीवनशैलीत पूर्णपणे भिनला गेला आहे का? - या प्रश्नाला ‘हो’ असे उत्तर द्यायला आवडले असते. पण ते तसे देता यावे याकरताच तर हा अट्टहास. कधीतरी, आयुष्यातल्या पुढच्या एखाद्या टप्प्यावर ते निश्चितच देता येईल. तोवर कमीतकमी खरेदी, गरजेपुरतीच साठवण, पसाऱ्याचे व्यवस्थापन सातत्याने आवर्जून करत राहणे आवश्यक. नवीन वर्ष उंबरठ्यावर असताना तुम्हालाही नव्याने मिनिमलिझमच्या संकल्पाची आठवण त्याकरताच नव्याने करून द्यायची आहे.
तुमचं कामाचं टेबल फाइल्स, पुस्तके, बिलं, पावत्या, कागद, कामाच्या याद्या यांनी गजबलेले असेल, तुमचं कपड्यांचं कपाट तुम्हाला न बसणारे होणारे कपडे, उन्हं न लागलेल्या साड्या, महागडे पण घट्ट ब्लाउज, ओढण्यांच्या गुंडाळ्या, स्टोल्स, जॅकेट्सच्या पसाऱ्याने ओसंडून वाहत असेल तर नववर्षाच्या संकल्पाच्या याद्या बनवण्याच्या आत तुम्ही एका जागी जरा शांत बसा आणि स्वत:शीच मान्य करा की मला मिनिमलिस्ट लाइफस्टाइलची तत्त्वे पुन्हा एकदा जाणून घ्यायची गरज आहे. आतला आणि बाहेरचा पसारा, अडगळ आवरण्याची गरज आहे. तुमच्या आतही असाच पसारा असेल हे वेगळं सांगायची गरजच नाही. तुमच्या भोवतालातच त्याचं प्रतिबिंब पडलेलं असतं. पसारा किंवा अडगळ होण्याचं, साठण्याचं एकमेव कारण म्हणजे ‘लेट गो’ करण्याची. नको असलेलं सहजतेनं सोडून देण्याची स्वत:तली अक्षमता. त्यात कधी भावनिकता असते, आठवण असते किंवा भविष्याची आशाही असू शकते. अर्थात आपला आळशीपणा, हलगर्जीपणा किंवा बेफिकिरपणाही तितक्याच प्रमाणात असू शकतो. तेव्हा कारणामध्ये फार गुंतून न राहता उठा आणि फेकून द्या किंवा पुनर्वापर करायला योग्य व्यक्तींच्या हवाली करा. आपल्या रोजच्या जगण्यातले कानाकोपरे या अडगळीमुळे धुळीने व्यापून जातात, आपल्यातली कार्यक्षमता मंदावते, आर्थिक क्षमता खालावते. ज्या क्षणी अडगळ, पसारा आवरायचा जाणीवपूर्वक निर्णय तुम्ही घेता त्याच क्षणी स्वच्छ, हवेशीर भोवताल तुमच्या अवतीभवती, आतमध्ये निर्माण होण्याची प्रक्रि या सुरूही झालेली असते. भावनिकदृष्ट्या हलकं, सकारात्मक वाटण्याची ही सुरुवात असते. आपण इतक्या वस्तू साठवून ठेवू शकलो, आपल्याकडे इतक्या साड्या, कपडे, दागिने, भांडी, पुस्तकं आहेत..
हे जमा करण्यात आपण आपल्या श्रमाने साठवलेले पैसे, वेळ खर्च केला आहे, आपल्या वाडवडिलांनी, सुहृदांनी प्रेमाने सोपवल्या आहेत, त्यातल्या बऱ्याच गोष्टी आपल्याकडे असतात, त्यामुळे या सर्वांबद्दल मनोमन कृतज्ञता व्यक्त करून त्यातल्या न लागणाऱ्या, जास्तीच्या, तुमच्याकरता निरुपयोगी वस्तू अशा वस्तू कुणाकडे तरी सोपवा; ज्यांना त्याचा उपयोग होईल. तसं कोणी आसपास नसेलच तर फेकून द्या, विका किंवा दान करा. मारी कोन्दोने सुचवलेल्या कोनमारी मेथडचा त्याकरता वापर करू शकता. मारी कोन्दो सुचवते- तुम्हाला काय फेकायचं आहे हे ठरवता येत नसेल तर तुम्हाला स्वत:कडे काय ठेवावंसं वाटतं याचा विचार आधी करा. त्या वस्तूंकरता चांगली, मोकळी, हवेशीर जागा निर्माण करा. हे कसं करायचं? तर त्याकरता सगळे कपडे, पुस्तकं, वस्तू वेगवेगळ्या ढिगाऱ्यात समोर रचा. मग एक एक कपडा, पुस्तक, वस्तू हातात घ्या, निरखा, विचार करा. तुम्हाला खरंच हवी आहे का ही? या वस्तूकडे पाहिल्यावर मनात आनंदाची भावना निर्माण होत आहे का? असेल तर ठेवा. नसेल तर टाकून द्या. अजून एक सोपी, पण काहीशी दीर्घ पद्धत म्हणजे रोज एक वस्तू टाकून देणे किंवा देऊन टाकणे. अर्थातच यात नव्याने खरेदी करून रिकामी जागा लगेच भरण्याचा पर्याय उपलब्ध नाही. त्याकरता संकल्पाच्या यादीमध्ये सर्वात वर गरज नसताना खरेदी न करण्याचा, सेलच्या जाहिरातींना बळी न पडण्याचा, वस्तू न साठवण्याचा निश्चय लिहा. मिनिमलिस्ट जीवनशैली म्हणजेच कमीतकमी वस्तूंच्या साहाय्याने, अडगळीवाचून आयुष्य जगणे ही एक सुंदर, सहज, सोपी, पर्यावरणस्नेही जीवनशैली आहे. आयुष्य समृद्ध करणारी. नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येलाच तिचे तुमच्या जीवनात स्वागत करा. “There are two ways to be rich : One is by acquiring much, and the other is by desiring little.”
कसा आवराल घरातला पसारा?
पसारा, अडगळ आपल्या आयुष्याचा एक भाग बनलेला असतो. इतका की त्या अडगळीतच जगायची आपल्याला सवय झालेली असते. बऱ्याचदा ही अडगळ आपल्या लक्षातही येत नाही किंवा आपल्याकडे अमुक एक वस्तू आहे हेदेखील काळाच्या ओघात आपण विसरून गेलेलो असतो. गेल्या कित्येक वर्षांत त्या वस्तूला आपण हातही लावलेला नसतो. काही कारणानं ती वस्तू अचानक नजरेच्या समोर आल्यावर ती वस्तू आपल्याकडे होती हे लक्षात येतं, तरीही ती फेकून देण्याची किंवा दुसऱ्या कुणाला देण्याची इच्छा आपल्याला होत नाही. अशा वस्तू पुसूनपासून पुन्हा एकदा आपण अडगळीत, आणखी काही वर्षं न पाहण्यासाठी टाकून देतो. मग घरातला हा पसारा, अडगळ आवरायची कशी? पसारा आवरण्याची एक चांगली पद्धत म्हणजे चार खोक्यांवर नावं लिहा- ‘ठेवणे’, ‘टाकून देणे’, ‘गरजूला देणे’, ‘नंतर ठरवणे’. ..आणि मग ही चारही खोकी घरातल्या प्रत्येक कपाटासमोर, टेबलासमोर, साठवणुकीच्या जागेसमोर फिरवा. ती भरली की मग पुन्हा एकदा घर लावा. अर्थात ‘ठेवणे’ नाव लिहिलेल्या खोक्यात जास्त वस्तू भरल्या गेल्या तर मात्र ही पद्धत तुमच्याकरता उपयोगाची नाही हेही लक्षात घ्या..
(लेखिका ख्यातनाम कलासमीक्षक आहेत.)sharmilaphadke@gmail.com