शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

चतुरस्त्र आशालता

By admin | Updated: May 24, 2014 13:15 IST

भरताने नाट्यशास्त्रात अभिनयाची चार प्रकारची अंगे सांगितली आहेत. आंगिक, वाचिक, सात्त्विक आणि आहार्य. यातील पहिली तीन ही नटाने करायची असतात, तर चौथा प्रकार हा रंगभूषा, वेशभूषा इ. हा आहे.

- डॉ अजय वैद्य

भरताने नाट्यशास्त्रात अभिनयाची चार प्रकारची अंगे सांगितली आहेत. आंगिक, वाचिक, सात्त्विक आणि आहार्य. यातील पहिली तीन ही नटाने करायची असतात, तर चौथा प्रकार हा रंगभूषा, वेशभूषा इ. हा आहे. आंगिक, वाचिक यांबरोबरच सात्त्विक (भावनिक) अभिनयसुद्धा प्रगल्भ असावा लागतो, तरच या मेक बिलीफ माध्यमातून कलाकार आपली भूमिका प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकतो. आशालता (आशालता नाईक/आशालता वाबगावकर) या अभिनेत्रीची अभिनयाच्या या तिन्ही अंगावर विलक्षण हुकमत आहे. म्हणून त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका ही प्रेक्षकांच्या मनाचा आणि मेंदूचा ठाव घेते.

आशाताईंची आई कर्नाटकाच्या सीमेलगत असलेल्या गोव्यातील दक्षिणेकडील काणकोण या गावातील. 
आशालता नाईक या मुलीचा जन्म मुंबईतला. पुढील आयुष्यात आपल्या अभिनयाने अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आणणारी ही अभिनेत्री स्वत:च्या जन्माच्या वेळी मात्र इतर सर्व मुलांसारखी रडली नाही. त्यामुळे कदाचित ती मुकी असावी, असे सगळ्यांना वाटले; पण मग काही वेळाने पाठीवरच्या धपाट्यांनी या मुलीने टाहो फोडला.
‘दि गोवा हिंदू असोसिएशन’ या संस्थेने महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत सादर केलेल्या ‘सं. संशयकल्लोळ’ या नाटकातील रेवतीच्या भूमिकेतून आशाताईंनी रंगभूमीवर पदार्पण केले. मराठी संगीत रंगभूमीवर अनेक भूमिका केलेले गोमंतकीय कलाकार आणि निर्माते गोपीनाथ सावकार हे दिग्दर्शक होते. रेवतीच्या भूमिकेसाठी मुलींचा शोध चालू झाला. काहींची भाषा योग्य नव्हती, काहींना रेवतीचे सौंदर्य नव्हते, तर काहींना गाण्याचे अंग नव्हते. मुंबई आकाशवाणीवर त्या काळी कोकणी विभागात असणारे विष्णू नाईक यांनी आशालता नाईक या मुलीचे नाव सुचवले. आकाशवाणीवर त्यांनी या मुलीची भाषा ऐकली होती. गाणेही ऐकले होते. 
घरात स्कर्ट घालणारी ही षोडशवर्षा मुलगी साडी नेसून चाचणीला आली आणि एकही प्रश्न न विचारता सावकारांनी तिची निवड केली. सर्व जण अवाक झाले. सावकारांना विचारताच ते म्हणाले, ‘तिचा नाकाचा शेंडा फार बोलका आहे. ही मुलगी रंगभूमीवर नाव काढील.’ त्यांची निवड योग्य ठरली. संस्थेने स्पर्धेत सादर केलेल्या ‘सं. संशयकल्लोळ’, ‘सं. शारदा’ व ‘सं. मृच्छकटीक’ या तिन्ही नाटकांत अनुक्रमे रेवती, शारदा व वसंतसेना या भूमिकांसाठी दर वर्षी आशाताईंना उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळाले. त्यांनी साकार केलेल्या भूमिका अद्यापि लोकांच्या स्मरणातून गेलेल्या नाहीत. पं. गोविंदराव अग्नींनी त्यांची सर्व गाणी पारंपरिक पद्धतीने बसवली होती. त्यांची वसंतसेनेची भूमिका पाहूनच प्रा. वसंतराव कानेटकरांनी ‘हीच माझी मत्स्यगंधा,’ असे उद्गार काढले होते. म्हणून आजही आशाताई या आपल्या दोन्ही गुरूंचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करतात.
नाट्यस्पर्धांतून बक्षिसे मिळविणारी आशालता सर्वार्थाने रसिकांच्या मनात कायमची जाऊन बसली, ती मत्स्यगंधेच्या भूमिकेने. या नाटकात संवादाबरोबरच संगीताची परीक्षा तिला प्रेक्षकांसमोर द्यायची होती. जितेंद्र अभिषेकी या नव्या दमाच्या कल्पक संगीत दिग्दर्शकाचेही ते पहिलेच नाटक. त्यामुळे एक वेगळा तणाव आशाच्या मनावर येणे स्वाभाविक होते. अभिषेकींनी आपल्या कौशल्याने आशाच्या गळ्यात चपखल बसतील, अशा चाली अलगदपणे तिच्या गळ्यात उतरवल्या. आशानेही परिश्रमपूर्वक या चालींचे सोने केले. कुठलीही भूमिका साकारताना त्यासाठी अपार कष्ट घेण्याची त्यांची तयारी होती. म्हणूनच ‘भावबंधन’ नाटकात चित्तरंजन कोल्हटकर (घनश्याम) व प्रसाद सावकार (प्रभाकर) यांसारख्या मुरलेल्या अनुभवी कलाकारांबरोबर आपल्याला लतिकेची भूमिका करावी लागणार आहे, हे समजल्यावर त्यांनी, ज्यांचा ठसा या भूमिकेवर आजही पडलेला आहे, त्या मा. नरेश यांना आपल्या घरी येऊन तालीम देण्याची विनंती केली. मा. नरेश यांनी प्रकृती अस्वस्थ असूनसुद्धा पंधरा दिवस आशाताईंच्या घरी राहून त्यांना या भूमिकेचे बारकावे समजावून दिले होते. दुर्दैवाने अल्पावधीतच त्यांचे निधन झाल्यामुळे मा. नरेश त्यांचा प्रयोग मात्र पाहू शकले नाहीत.
पहिल्यांदाच रंगभूमीवर येणार्‍या नाटकात एखादी भूमिका साकार करणे हे जितके कठीण असते, त्याहीपेक्षा पूर्वी रंगभूमीवर येऊन गेलेल्या व प्रेक्षकांच्या मनात स्थिर होऊन राहिलेल्या, दुसर्‍या कलाकाराने साकारलेल्या भूमिका करणे हे अति अवघड असते; कारण प्रेक्षकांच्या नजरेसमोर तरळत असलेल्या पूर्वीच्या अभिनेत्रीच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कौशल्याचा प्रभाव स्वत:च्या भूमिकेने पुसून टाकणे हे आव्हान असते व ते पेलण्यासाठी धाडस लागते, जबर आत्मविश्‍वास लागतो. आशाताईंनी हे आव्हान अनेक वेळा यशस्वीरीत्या पेललेले आहे. यात ‘रायगडाला जेव्हा जाग येते’मधील येसूबाई (सुधा करमरकर), ‘गारंबीचा बापू’मधील राधा (उषा किरण), ‘गुंतता हृदय हे’मधील कल्याणी (पद्मा चव्हाण) आणि ‘भाऊबंदकी’ नाटकात त्यांनी आनंदीबाईची भूमिका केली होती. ही भूमिका आधी दुर्गाबाई खोटे करीत असत. दाजी भाटवडेकर (राघोबादादा), मा. दत्ताराम (रामशास्त्री) अशा कसलेल्या अनुभवी कलाकारांबरोबर काम करणे सोपी गोष्ट नव्हती. नटश्रेष्ठ केशवराव दाते यांनी आशाताईंना आनंदीबाईच्या स्वभावाचे कंगोरे समजावून सांगितले होते, मार्गदर्शन केले होते. आनंदीबाई ही राजकारण कोळून प्यालेली, आपल्या सौंदर्यावर आपला नवरा पूर्णपणे भाळलेला आहे हे जाणणारी, महत्त्वाकांक्षी स्त्री. ‘या नाटकात डोळ्यांचा आणि शब्दांचा उपयोग करा, शब्द प्रेक्षकांच्या उरी घुसले पाहिजेत,’ असा कानमंत्र दाते यांनी आशाताईंना दिला होता. 
एका प्रवेशात नारायणरावांची गारद्यांच्या हातून हत्या होताना आनंदीबाई पाहते आणि लगेच बाकी सर्वांच्या समोर त्यांचे प्रेत पाहून रडवेली होते, असा क्षणात मुद्राभिनय बदलण्याचा प्रसंग होता. सातार्‍याला या प्रसंगानंतर त्यांच्यावर प्रेक्षकांतून चप्पल फेकली. त्या क्षणभर नर्व्हस झाल्या. भाषण आठवेना. रामशास्त्रीच्या भूमिकेतील मा. दत्ताराम जवळच उभे होते. ते म्हणाले, ‘मुली, ही तुझ्या अभिनयाला दिलेली दाद आहे. पुढचं वाक्य बोल.’ या व अशा भूमिकांमुळे आशा आणि आव्हान हे रंगभूमीवरचे समीकरणच झालेले असावे.
दि गोवा हिंदू असोसिएशन, चंद्रलेखा, अभिजात, मुंबई मराठी साहित्य संघ, माउली प्रॉडक्शन्स व आय.एन.टी. अशा सहा संस्थांमधून त्यांनी जवळजवळ पन्नासहून अधिक नाटकांचे हजारो प्रयोग केले. चंद्रलेखा या संस्थेत त्यांनी सर्वाधिक नाटके केली. ‘घरात फुलला पारिजात’मध्ये चंद्रलेखा, ‘आश्‍चर्य नंबर दहा’मध्ये विमला, ‘विदूषक’मध्ये अंजली, ‘गरुडझेप’मधील सत्तरी ओलांडलेली राजमाता जिजाबाई आणि ‘वार्‍यावरची वरात’मधली तारस्वरात कन्नड भाषेचे हेल काढून बोलणारी कडवेकर मामी अशा भिन्नभिन्न स्वभावाच्या भूमिकांमधून आशाताईंनी आपले नाट्यनैपुण्य प्रकर्षाने प्रगट केलेले आहे. ‘वार्‍यावरची वरात’ या नाटकात खुद्द पु.लं.च्या बरोबर काम करायला मिळणे हा त्या आपल्या आयुष्यातील भाग्ययोग मानतात.
‘गुड बाय डॉक्टर’ या नाटकाच्या शंभराव्या प्रयोगाच्या वेळी त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. पायाला बँडेज केले होते. असह्य वेदना होत होत्या. त्यामुळे हालचाली करणे कठीण झाले होते. शंभरावा प्रयोग रद्द करणे योग्य नसल्यामुळे त्या तशाही परिस्थितीत भूमिका करण्यासाठी तयार झाल्या. प्रयोग सुरू होण्याअगोदर त्यांनी ही परिस्थिती प्रेक्षकांना समजावून सांगितली. 
आपली भूमिका नेहमीप्रमाणे होऊ शकत नसल्यामुळे ज्यांना पैसे परत पाहिजेत, त्यांना ते देण्याची संस्थेने तयारी दाखविली; पण एकाही प्रेक्षकाने पैसे परत घेतले नाहीत. प्रेक्षकांचा असा विश्‍वास क्वचितच एखाद्या कलाकाराच्या नशिबात असतो. हा विश्‍वास त्या कलाकाराच्या निष्ठेला असतो, कष्टांना असतो व प्रामाणिकपणाला असतो. आशाताईंच्या नसानसात ही निष्ठा, हे कष्ट व हा प्रामाणिकपणा आपल्याला दिसून येतो.
दूरदर्शनवर आशाताईंनी एका कोकणी नाटकात भाग घेतला होता. त्यातील त्यांचा अभिनय बघून नामांकित चित्रपट दिग्दर्शक बासू चटर्जी यांनी त्यांच्याबद्दल चौकशी केली. त्यांचे ‘गुंतता हृदय हे’ हे नाटक पाहिले आणि ‘अपने पराये’ या आपल्या चित्रपटात त्यांना भूमिका दिली. अमोल पालेकर, गिरीश कार्नाड यांच्यासारख्या चित्रपटसृष्टीत मुरलेल्या कलाकारांबरोबर काम करण्याची संधी त्यांना पदार्पणातच मिळाली होती. त्यांनी चित्रपट तंत्राची मुळाक्षरे बासुदांसारख्या दिग्दर्शकाच्या हाताखाली गिरवल्यामुळे नंतर केलेल्या जवळजवळ दोनशेहून अधिक हिंदी व पन्नासहून अधिक मराठी चित्रपटांचा प्रवास सोपा झाला.
आशाताई कधी स्तुतीने भाळल्या नाहीत किंवा निंदेने चळल्या नाहीत. रंगभूमीवर किंवा चित्रपटात डोळ्यांत पाणी आणण्यासाठी त्यांना कधी ग्लिसरीनचा वापर करावा लागला नाही, असे त्या अभिमानाने सांगतात. स्टेजवर नुसते रूप असून भागत नाही. आपण बोललेले शब्द प्रेक्षकांच्या मनाला गोड वाटले पाहिजेत. चेहरा बोलला पाहिजे. भूमिकेशी एकरूप व तन्मय झाले म्हणजे प्रेक्षक तुमचा अभिनय स्वीकारतात. प्रेक्षक हुशार असतात. त्यांना अस्सल व नक्कल यांतला फरक लगेच समजतो. याच प्रेक्षकांनी आपला अभिनय गोड मानून घेतला आणि आपल्याला उदंड प्रेम दिले, याबद्दल त्या त्यांचे ऋणही व्यक्त करतात. 
आपल्या साठेक वर्षांच्या अथक प्रवासात विविधांगी भूमिका, अनेक दिग्गज दिग्दर्शक, कसलेले अनुभवी सहकलाकार, नवीन तसेच जुनी पारंपरिक नाटके, मराठी व हिंदी चित्रपट, आकाशवाणी, दूरदर्शनवर नाटके व चित्रमालिका अशा चारही माध्यमांतून आशाताईंनी यशस्वी संचार केलेला आपल्याला दिसतो. अशा या गोमंतकीय चतुरस्र अभिनेत्रीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
(लेखक गोव्यातील रंगकर्मी आहेत.)