शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

केबलवाल्यांच्या राड्याची ती कहाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 07:55 IST

2000च्या दशकात ‘केबलवाला’ उदयाला आला आणि बघता बघता या नव्या शितांभोवती भुतं जमली. लपवाछपवीला उदंड स्कोप होता. केबल कंपन्यांना गंडा घालून प्रचंड पैसा जमू लागला. बघता बघता ‘केबल टोळ्या’ उभ्या राहिल्या आणि अगदी मुडदे पाडण्यापर्यंत राडे सुरू झाले.

-रवींद्र राऊळ

‘असतील शितं तर जमतील भुतं’, ही म्हण गुन्हेगारी टोळ्यांसाठी चपखल बसते. जिथे बख्खळ कमाई तेथे माफिया टोळ्यांचा शिरकाव झालाच समजा. स्मगलिंग, रियल इस्टेट, ड्रग्ज ही माफियांच्या उपद्व्यापांची परंपरागत क्षेत्रं. पण 2000च्या दशकात गुंडांच्या टोळ्यांना एक नवं क्षेत्र पादाक्रांत करता आलं, ते म्हणजे केबल टीव्हीचं. याचं मुख्य आणि अगदी सहज ओळखता येणारं कारण म्हणजे या धंद्यातली भरभक्कम मार्जिन. येथे मिळणारा नफा तब्बल 80 टक्के एवढा होता. आणि तोही केबल प्रोव्हाईडर कंपन्यांना गंडा घालून ! केबलच्या धंद्यात काळाकांडीने बस्तान बसवलं होतं.केबलचालक करायचे काय?

- ज्याच्याकडे हजारभर केबल कनेक्शन्स असायची तो केबल प्रोव्हाईडर कंपनीला आपली केवळ शंभर कनेक्शन असल्याचं सांगायचा आणि तितक्याच कनेक्शनचे पैसे कंपनीला द्यायचा. कोणाकडे किती कनेक्शन्स आहेत यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा नसल्याने कंपनीही त्या केबलचालकावर विश्वास ठेवून तितक्याच कनेक्शन्सचे पैसे पुढे चॅनलना द्यायची. त्यामुळे जवळ जवळ 80 टक्के कनेक्शन्सचे पैसे सरळ केबलचालकांच्या खिशात जायचे. तितक्याच कनेक्शन्सचा मनोरंजन करही चुकवला जात असल्याने सरकारी महसूल बुडत असे. ही कमाई इतकी होती की, यातूनच पुढे केबलचालकांमध्ये आपापसातच हाणामा-या सुरू झाल्या. ज्याच्याकडे जास्त कनेक्शन्स त्याची जास्त कमाई. साहजिकच एरियातली सर्वाधिक कनेक्शन्स आपल्याकडे असावीत म्हणून केबलचालक मनगटशाहीचा वापर करू लागले. अशात केबलसेवा पुरवणा-या बड्या कंपन्यांमध्येही कमालीची स्पर्धा होतीच. त्यांनीही आपापल्या कंपनीच्या केबलचालकांना हवा भरायला सुरुवात केली. मग काय, केबलचालकांनाही भलताच जोर आला. केबलचालक एकमेकांची डोकी फोडू लागले. एकमेकांच्या ग्राहकांची केबल कापू लागले. सुमारे 50 हजार केबलचालकांच्या जगतात प्रचंड राडे आणि फार मोठी उलथापालथ झाली.

अर्थातच या सगळ्याचा फायदा घ्यायला गुंडांच्या टोळ्या टपलेल्याच होत्या. त्यांनी जो आपल्याला ठरलेला वाटा देईल त्या केबलचालकाची बाजू घेत हाणामा-या सुरू केल्या. यातून झालेले वाद पोलीस ठाण्यात पोहचू लागले. दोन्ही बाजूचे केबलचालक, कंपन्यांचे अधिकारी आणि वकील, अशी मंडळी दिवसभर पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसलेली दिसू लागली. केवळ दांडगाई करणारेच केबलच्या व्यवसायात टिकू लागले. अनेकदा वाद विकोपाला जात. अपहरण, हत्येचा प्रयत्न आणि थेट मुडदे पाडण्यापर्यंत या राड्यांची मजल पोहचली होती. पोलीस अधिकारीही केबल कंपनीच्या सुपा-या घेऊ लागले. या सगळ्यात गप्प राहतील ते राजकीय पक्ष कसले. बहुतेक पक्षांनी केबल ऑपरेटरच्या संघटना सुरू करीत मोर्चेबाजीही केली. 

केबलच्या धंद्यातील ही माफियागिरी इतकी वाढली की मुंबईच्या पश्चिम उपनगरातील आपल्या हस्तकाचा धंदा वाढविण्यासाठी छोटा राजनने तेव्हा एका राज्यमंत्र्याला आणि त्याच्या भावालाही धमकावलं होतं. 

या धंद्याचं गुन्हेगारीकरण रोखणं अवघड झालेलं असतानाच आता दोन दशकानंतर या धंद्यातील बदललेल्या तंत्रज्ञानाने येथील गुन्हेगारी मोडीत काढली. याचं कारण म्हणजे 2011 साली सेट टॉप बॉक्स आले. मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता या मुख्य शहरात टप्प्याटप्प्याने सुरू झालेल्या सेट टॉप बॉक्स सिस्टीमने काळ्या कमाईला प्रतिबंध होऊ लागला. कारण सारे व्यवहार या सिस्टीमने पारदर्शक केले. मोबाइल फोन जसा प्रिपेड असतो तसं केबलचालकांना आधी कंपन्यांकडे पैसे भरून ग्राहकाकडील सेट टॉप बॉक्स अँक्टिव्ह करण्याची पद्धत सुरू झाली. त्यामुळे कंपन्यांना केबलचालकांकडे किती कनेक्शन्स आहेत हे समजू लागलं. लांड्यालबाड्या करता येईनाशा झाल्या. त्यामुळे केबलचालकांची वरकमाई कमी झाली. जितकी कनेक्शन्स असतील ते सारे पैसे कंपनीकडे जमा होऊ लागले. लपवाछपवीतून बुडणारा महसूल सरकारी तिजोरीतच जमा होऊ लागला. आता काही आपलं इथं काम नाही हे ओळखून माफिया टोळ्याही दूर झाल्या. 

आता एका बड्या उद्योगसमूहाने सवलतीच्या दरात केबल सेवा देण्याचा प्लॅन आखला आहे. या कंपनीचे ऑप्टिकल फायबर आणि अँपआधारित चॅनल ग्राहकांच्या घरोघर पोहोचणार आहेत. ही कंपनी शार्क माशाप्रमाणे लहान लहान केबलचालकांचा धंदा गिळण्याच्या तयारीत आहे. कारण केबल, फोन आणि इंटरनेट सेवा एकाच केबलच्या माध्यमातून देण्याची या कंपनीची योजना आहे. त्यामुळे काही वर्षात इंटरनेट सेवेमुळे कसाबसा धंदा सावरलेले केबलचालक अस्वस्थ झाले आहेत. बड्या कंपन्यांना भांडवल आणि तंत्रज्ञानाच्या बळावर शक्य असलेली  सेवा आपल्याला देता येणार नाही याची कल्पना असल्याने केबलचालक हवालदिल आहेत. या कंपनीशी स्पर्धा करीत आपलं अस्तित्व टिकवण्याची लढाई आता या चालकांना लढावी लागणार आहे.एकेकाळी आपला व्यवसाय वाढवण्यासाठी एकमेकांच्या जिवावर उठलेल्या केबलचालकांना आता या धंद्यातील तांत्रिक स्थित्यंतराने एकत्र आणलं आहे.

-पूर्वी एकमेकांचे गळे चिरायला उठणारे लोक आता एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून आपल्या उदरनिर्वाहाची व्यवस्था वाचवण्यासाठी एकत्र येऊ घातले आहेत.हा काळाचा - आणि तंत्रज्ञानाचा- महिमा!

 (लेखक ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीचे मुख्य वार्ताहर आहेत)

manthan@lokmat.com