मेघना ढोके
ईशान्य भारतातल्या नद्या, त्यांची कुळं, उगमस्थानं आणि त्यांचं बेफाम होत वाट्टेल तसं उधळत, प्रवाह बदलत, सगळं पोटात घेत संतापणं. कुठं जमीन पोटात घेणं, कुठं भराव होणं हे सारं कसं कसं बदलत गेलं, त्यातून तटावरच्या जीवनवस्तीचं काय झालं याचा अभ्यास करणा:या दोन तरुण मानववंश शास्त्रज्ञांची गेल्या आठवडय़ात भेट झाली.
नदीचा उगम, तिचा पसारा, तिचं पिसाटणं आणि तिच्या आधारानं बदलणारी लोकसंस्कृती असा काहीसा अभ्यास ते दोघे करत होते.
बोलता बोलता नाशिकच्या कुंभमेळ्याचा विषय निघालाच, तसे दोघे जाम खूश झाले. म्हणाले,
‘‘यापुढच्या टप्प्यात कुंभमेळा आणि जलवस्ती असा काहीसा अभ्यास आम्ही करणार आहोत.’’
त्यांनी म्हणो असं वाचलं होतं की, पूर्वी काही साधूंचा पाणी आणि जनजीवन, लोकसंस्कृती या विषयांवर अभ्यास असायचा!
पाण्याचे अभ्यासक असणारे कुणी साधू तुला कुंभमेळ्यात भेटले होते का? - असा प्रश्न हे दोघे अभ्यासक मला विचारत होते.
- त्या प्रश्नासरशी माङया डोळ्यासमोर नाव आलं, पागलबाबांचं!
पागलबाबा किंवा पगलेबाबा असंच काहीतरी नाव होतं त्यांचं! आखाडय़ातले साधू या दोन्ही नावांनी त्यांना संबोधत!
नाशिकमधल्या तपोवनात एक वृद्धाश्रम आहे, त्याच्या जवळ एक छोटा आश्रम होता. आश्रम म्हणजे दोन चार खोल्यांचं एक अंधारं घर. एकदा दुपारी मी तिथं पोहचले. आत कुणी आहे का म्हणून हाका मारत होते. तसा झोपेतून उठल्यासारखा वैतागत एक म्हातारासा साधू बाहेर आला.
‘‘क्या है? कोई नहीं इधर.. जाओ’’ म्हणाला.
‘‘मैं पत्रकार, ये आखाडेके बाबाजीसे मिलना है’’ - अशी तोर्पयत मलाच तोंडपाठ झालेली एका वाक्याची टेप मी पुन्हा वाजवली आणि ओटय़ावर फतकल मारली.
साधूबाबा आत गेले, पाणी घेऊन आले.
मग म्हणाले, ‘‘ये जो काम करने आयी हो, खूश नहीं हो?’’
काय तो कुंभमेळा, काय ते साधू, काय ते जुनाट सगळं असलं काहीतरी डोक्यात होतंच सुरुवातीच्या काळात. त्यामुळे चेह:यावरचे त्रसिक भाव लपले नसणारच, म्हणून हे विचारताहेत असं मला वाटलं!
मी काही बोलले नाही.
रागीट चेह:याच्या, अगदीच गरीब दिसणा:या पांढ:या कपडय़ातल्या या किडकिडय़ा साधूशी आता काय बोलायचं याची मनाशी जुळवाजुळव करत असताना त्यांनीच बोलायला सुरुवात केली.
माझं नाव गाव काहीच माहिती नसताना साधुबाबानं मला माझा सगळा भूतकाळ सांगायला सुरुवात केली. (भविष्य नाही!!) माङया कुटुंबात कोण कोण, भाऊबहिणी किती, माझा स्वभाव कसाय, पूर्वी काही दु:खद घटना घडलेल्या असं बरंच काहीबाही साधूबाबा सांगत होते. आपण आपलं नावही न सांगता हा साधू कसा काय आपला सगळा भूतकाळ अचूक सांगतोय याचं मला मोठं कुतूहल वाटलं!
हे सगळं तुम्हाला कसं कळलं? - असा प्रश्न त्यांना विचारला तर ते म्हणाले, ‘‘अपना अपना तरिका होता है, लोगों को पढनेका!’’
लोकांचा भूतकाळ अचूक सांगणारा भन्नाट साधू आपल्याला भेटला याचा मला कोण आनंद झाला होता. हे साधुबाबा काहीतरी भारी प्रकरण आहे असं वाटल्यानं मग त्यांच्याशी गप्पा सुरू झाल्या. त्यातून कळलं की, मूळचे अलाहाबादच्या निर्वाणी आखाडय़ाशी संबंधित असलेले ते बाबा पाणी, भूजल आणि औषधी वनस्पती याचे तज्ज्ञ होते. लोकांवर उपचारही करायचे.
या पहिल्या भेटीनंतर मग दोनतीनदा भेटले. एकदा त्यांना विचारलं की, हे सारं तुम्ही कुठं शिकलात? भूजल, नद्यांच्या पाण्याची पातळी, पाण्याचं प्रदूषण हे सारं कसं शिकलात?
ते म्हणाले,
कसं म्हणजे? पाहून पाहून शिकलो. कुणी गुरुजीनं नाही तर नद्यांजवळ राहणा:या खेडय़ापाडय़ातल्या माणसांनी मला शिकवलं. त्यांच्या ‘श्रुत’ ज्ञानाच्या आधारे शिकत गेलो.
त्यांची पाण्याची एक फार मस्त परिभाषा होती.
ते म्हणाले, पाण्याकडे मी तीन टप्प्यात पाहतो, चलता जल, फलता जल और जलता जल!
चलता जल म्हणजे वाहतं पाणी.
त्यावर आधारलेलं मानवी जीवन, त्या पाण्याचा उत्तम वापर करून जगणारी माणसं, त्यांची समृद्धी हे म्हणजे फलता जल. आणि पूर, प्रदूषण, गटारलेल्या नद्या हे म्हणजे जलता जल!
माणसाचं जगणं पाण्याशी असं जोडलेलं असतं. म्हणून तर चलत्या जलात अंघोळ करून नमन करायचं अशी कुंभाची साधी व्याख्या या साधुबाबांनी सांगितली.
अशा भन्नाट गोष्टी सांगणारे साधुबाबा मला खरंच आवडले होते. पण ही आमची भेट झाली तेव्हा प्रत्यक्षात कुंभमेळा सुरू व्हायला तीन-चार महिने बाकी होते म्हणून मग ते परत गेले. ‘हिमालय जा रहा हूं, नाशिक आनेपर फोन करूंगा’ असं सांगून गेले. त्यांचा फोनही आला नंतर की मी आलोय नाशकात. पण कुंभमेळा सुरू झाल्यावर त्यांना बरंच शोधलं तरीही त्यांची भेट झाली नाही. त्यांच्या आखाडय़ात, खालशातही चौकशी केली. खालसा सापडलाही, पण त्यांना भेटायला गेले त्यादिवशीच पोलीस कुठल्याशा साधूला व्हॅनमधे घालून अटक करून नेत होते.
चौकशी केली तर कळलं हेच ते पागलबाबा होते. कुठल्याशा साधूशी भांडण झालं तसं त्याच्या डोक्यात दगड घालून मोकळे झाले.
त्या पाठमो:या व्हॅनमधे ते गेले ते गेलेच, परत कधीच भेटले नाहीत! या सिंहस्थात आता पुन्हा शोधायला हवं त्या पागलबाबांना.
===
गंमत वाटली होती ती कुंभातल्या साधुबाबांकडून ऐकलेल्या अशा आख्यायिकांची. आणि लक्षातही आलं की, काही अगदी कमी का होईना साधू लोकजीवनाशी नातं सांगतात. त्यांचा जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आध्यात्मिक, धार्मिक कमी असतो. ते सामान्य माणसाच्या नजरेतून अवतीभोवतीचा निसर्ग वाचतात. नद्यांच्या काठाकाठानंच जिथं काही हजार वर्षे लोकजीवन फुललं, त्या नद्यांच्या असंख्य कहाण्या, त्यांचं माहात्म्य, त्यातल्या लोककथा हे सारं या कुंभमेळ्यात येणा:या काही माणसांना, किमान काही साधूंना तरी माहिती असावं.
हे खरं की, असा अभ्यासबिभ्यास असणारे साधू अगदी कमी भेटले. पण कमी भेटले म्हणजे ते नसतीलच असं कसं म्हणणार?
या सिंहस्थातही भेटतील कदाचित असे ‘अभ्यासू’ नजरेचे साधू. कदाचित.
===
हे सारं थोडक्यात त्या दोन मानववंश शास्त्रज्ञांना सांगितलं तसं त्यातला एक जण म्हणाला, ‘ये चलते-फलते-जलते जल की परिभाषा अगर हम आजके मॉडर्न लोग थोडी भी समज जाए ना. तो बहौत आसान होगा जल-जीवन!’
पण ते समजावं कसं, त्यासाठीचं ते ‘पागलपण’ उरलंय का आपल्यात..?
निसर्ग वाचू शकणा:या साधुबाबांचे पाण्याशी नाते
नदीया की कथा
नदी. ऊर्जा स्रोत म्हणून तिचं रूप मानणारे, त्या ऊर्जेवर जगणा:या मानवी जीवितांच्या कथा सांगणारे, लोककथा ऐकवणारे आणखी एक साधू गेल्या कुंभमेळ्यात भेटले होते. ते कुठल्या आखाडय़ाचे नव्हते. त्याकाळी चौदाभाई नावाच्या खालशात उतरले होते. कुंभ म्हणजे पाण्यापुढं शरणागती असं ते सांगत होते.
म्हणाले,
आपली सगळी लोकसंस्कृतीच पाण्याच्या काठाकाठानं फुलली आहे. यूपीचे असावेत. अवधी हिंदीत बोलायचे. त्यांनी एक यूपीकडची नदीया की कथा सांगितली होती.
म्हणाले, एकदा एक नदी रुसली. म्हणाली, मी नाही जाणार सागराकडे. मी उलटी फिरते, पुन्हा माङया मुळात जाऊन दडते. तिनं प्रवाह फिरवला तसे लोक हादरले. तिला विनवू लागले. पुजायला लागले. तिच्या पात्रत दिवे, नैवेद्य ठेवून मागे वळू नको म्हणून गयावया करू लागले. मग नदी निवली. म्हणाली, वायदा करा की तुम्ही कधीच मला विसरणार नाही, छळणार नाही, दर पावसाळ्यात मला आलेलं उधाणही पुजायला विसरणार नाही.
- म्हणून मग पावसाळ्यात लोक अनेक ठिकाणी गंगापूजा करतात आता. अजून घाबरतात की, ती उलटी फिरली तर आपल्याला पोटात घेऊन जाईल.
(लेखिका ‘लोकमत’मध्ये मुख्य उपसंपादक आहेत)
meghana.dhoke@lokmat.com