शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वटवृक्षाची सर्जरी!

By admin | Updated: May 28, 2016 20:10 IST

काँग्रेसने समर्थ विरोधकाच्या भूमिकेला न्याय देणे गरजेचे आहे. लोकशाही आणि देशाच्याही ते हिताचे आहे. ‘सर्जरी यशस्वी झाली, पण पेशंट दगावला’ असे होऊ द्यायचे नसेल तर ते अत्यावश्यकही आहे.

दिनकर रायकर
(चार दशकांहून अधिकच्या पत्रकारितेचा दीर्घ अनुभव असलेले लेखक ‘लोकमत’चे समूह संपादक आहेत.)
 
 
काँग्रेसने समर्थ विरोधकाच्या भूमिकेला न्याय देणे गरजेचे आहे. लोकशाही आणि देशाच्याही ते हिताचे आहे. ‘सर्जरी यशस्वी झाली, पण पेशंट दगावला’ असे होऊ द्यायचे नसेल तर ते अत्यावश्यकही आहे. 
 
..टाके तुटतील ना!
आणीबाणीनंतरच्या निवडणूक काळात संजय गांधींची एक जाहीर सभा होती. त्या काळात संजय आणि बन्सीलाल यांनी सक्तीने नसबंदी करण्याची मोहीम देशभरात रेटून नेली होती. संजय यांच्या सभेच्या अखेरीस त्यांनी ‘जय हिंद’चा नारा दिला. लोकांनी त्याला जोरदार प्रतिसाद देणो अपेक्षित होते. पण उपस्थितांकडून फारच क्षीण प्रतिसाद आला. मग पुन्हा आवाहन केले गेले.. जोरसे बोलो, जय हिंद! तरीही प्रतिसाद क्षीणच.. 
मग एकाने कारण सांगून टाकलेच.. तो म्हणाला, बहुतेकांची नसबंदी केलीय. जोरात ओरडलो, तर टाके तुटतील ना!
संजय गांधींच्या आक्रमक नसबंदी मोहिमेचा फटका अभूतपूर्व होता. त्याचा ग्रामीण महाराष्ट्रातील एक नमुना मासलेवाईक ठरला होता. गावात नंदीबैल आला होता. तो खेळ बघायला जमलेली गर्दी नंदीबैलवाल्याच्या मागे एप्रन घातलेला डॉक्टर दिसताच नसबंदीच्या भीतीने विलक्षण वेगाने पांगली होती..
 
काँग्रेसला सर्जरीची गरज आहे.. काँग्रेसमध्ये पुनर्रचना होणे गरजेचे आहे.. जुन्या चेह-यांना सल्लागाराच्या मखरात बसवा.. पक्षाला नवा चेहरा द्या.. तरुणांना संधी द्या.. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये बिगरकाँग्रेसी पक्षांची सरशी झाल्यानंतर असा गलका काँग्रेसमध्ये सुरू झाला आहे. केरळ, तामिळनाडू, आसाम या तीन राज्यांमध्ये दयनीय अवस्था झालेल्या काँग्रेसला पुद्दुचेरीतील निकालाने काहीसा दिलासा मिळालाही. पण सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने काँग्रेसची घसरण सुरूच आहे. 
दोन वर्षापूर्वी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाने लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळविल्यापासून खचलेल्या काँग्रेसला म्हणावी तशी उभारी मिळालेलीच नाही. या पार्श्वभूमीवर नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाने पक्षातील मरगळ वाढली नसती तरच नवल! अर्थात पक्षासाठी ही स्थिती चांगली नाही, हे बोलायचे कोणी? आवश्यक तितकेच अनावश्यकही बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या दिग्विजयसिंह तथा दिग्गीराजा यांनी हे काम केले. काँग्रेसला शस्त्रक्रियेची गरज आहे, असे सांगत त्यांनी अनेकांच्या मनातील सुप्त भावनेला मूर्त स्वरूप दिले. त्यांनी वाचा फोडल्यानंतर बोलणा-यांच्या संख्येत भर पडण्यास सुरुवात झाली आहे. या व्यक्त होण्याला ‘गलका’ असे संबोधण्याचे कारणही तेच तर आहे! दिग्विजयसिंह शस्त्रक्रियेबद्दल बोलले तेव्हा ते एकटेच ‘सर्जन’शील होते. पण आता अनेकजण त्यांच्या सुरात सूर मिसळू लागले आहेत. गेल्या काही काळातील काँग्रेसची देशातील अवस्था पाहता हे अटळ होते. भारतीय प्रजासत्ताकाच्या निर्मितीनंतर लागलीच झालेल्या निवडणुकांचे निकाल लक्षात घेता स्वतंत्र भारताच्या नकाशावरचे अपवादात्मक कोपरे सोडले तर देशाच्या बहुतांश भागात काँग्रेसची सत्ता होती. लोकसंख्येच्या बाबतीत सांगायचे तर 90 टक्क्यांहून जास्त प्रजा काँग्रेसशासित होती. हेच प्रमाण आता अवघे सहा टक्क्यांवर आले आहे.
अर्थात शस्त्रक्रिया करण्याची वा तत्सम भाषा पक्षांतर्गत नेत्यांकडून वापरली जाण्याची ही काही पहिली वेळ नाही. दिग्गीराजांच्या वक्तव्याच्या निमित्ताने काही जुने प्रसंग पुन्हा माङया नजरेसमोर तरळले. त्यातील सर्वात महत्त्वाचा काळ आणीबाणीचा. आणीबाणीनंतर 1977 साली देशात सार्वत्रिक निवडणुका झाल्या. त्यात काँग्रेसचे पानिपत झाले. जनता लाटेत भले-भले काँग्रेस नेते वाहून गेले. त्यांच्या काही काळ आधी म्हणजे आणीबाणी लागू असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी अकस्मात वसंतदादा पाटील आणि मधुकरराव तथा बाळासाहेब चौधरी यांना मंत्रिमंडळातून अर्धचंद्र दिला होता. त्यावर प्रतिक्रियात्मक कृती म्हणून दादांनी थेट राजकीय संन्यास घेत असल्याचे जाहीर करून टाकले. पण लगेचच्याच लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर याच वसंतदादांनी संन्याशाची वस्त्रे झुगारून नव्याने खडग हाती घेतले. तो प्रसंग आजही मला लख्ख आठवतो. काँग्रेसच्या पराभवानंतर पुन्हा राजकीय रणांगणात उतरताना दादा म्हणाले होते, की ‘घराला आग लागलेली असताना मी गप्प बसू शकत नाही’..
काँग्रेसचे पेटलेले घर वाचविण्यासाठी सरसावलेल्या दादांच्या आकस्मिक पवित्र्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. शंकररावांचे मुख्यमंत्रिपद गेले, त्या खुर्चीत वसंतदादा विराजमान झाले. तेव्हा नरेंद्र तिडके महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते. लोकसभा निवणुकीतील पराभवाच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसची पुढची दिशा ठरविण्यासाठी तिडकेंनी सेमिनार आयोजित केला होता. विठ्ठलराव गाडगीळ, राममनोहर त्रिपाठी असे काही नेते व्यासपीठावर होते. आजच्या घडीला एकप्रकारे दिग्विजयसिंहाचीच री ओढणा:या अभिषेक मनू सिंघवी यांनी जे भाष्य केले, त्याने या सेमिनारची याद प्रकर्षाने जागवली गेली..
ताज्या पराभवाकडे काँग्रेसने दुर्लक्ष करता कामा नये किंबहुना काँग्रेस कार्यकारिणीची पुनर्रचना करून त्यात नव्या तरुण चेह:यांना प्राधान्य दिले पाहिजे. जुन्या, त्याच त्याच चेह:यांना मार्गदर्शकाच्या भूमिकेत शिरण्यास भाग पाडायला हवे, अशी भूमिका सिंघवी यांनी ट्विटरच्या माध्यमातून मांडली.. पण तब्बल 40 वर्षापूर्वीच्या पराभवानंतर त्रिपाठी काय म्हणाले होते?..
.बुजुर्गाना डावलले आणि संजय गांधींच्या हाती अधिक सत्ता दिल्याने पराभवाला सामोरे जावे लागले ही होती त्रिपाठींची मीमांसा! सिंघवींची मीमांसा बरोबर विरुद्ध आहे. अर्थात तेव्हाही आणि आताही मुद्दा अंतर्गत बेबंदशाहीचाच अधिक अधोरेखित झाला. 
संजय गांधींच्या बाबतीत केलेल्या लांगुनचालनातून आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री रघुरामय्या अडचणीत आले होते. आंध्रच्या दौ:यावर गेलेल्या संजय गांधी यांची चप्पल विमानातून जिन्यावरून उतरताना खाली पडली. ती मुख्यमंत्री रघुरामय्या यांनी तत्परतेने उचलली. त्या क्षणाचे विलक्षण छायाचित्र तेव्हा प्रसिद्ध झाले होते. जनता पार्टीने त्याचा मोठय़ा चतुराईने निवडणूक प्रचारात वापर केला होता. 
मला त्याबाबत नगरमधील परिषद लख्ख आठवतेय. एन. एन. बार्शीकर नगरचे आमदार होते. ते राज्यातील महापौर परिषदेचे अध्यक्षही होते. त्यांनी नगरमध्ये परिषद भरविली होती. त्या काळी काँग्रेसमध्ये अशा परिषदा सातत्याने होत असत. त्या कमालीच्या गांभीर्यानेही घेतल्या जात असत. म्हणूनच तर सुरुवातीला उल्लेख केला, त्या काँग्रेसच्या चिंतन परिषदेत विठ्ठलराव गाडगीळांसारख्या निष्ठावंत नेत्यानेही कडू भाषेत खडे बोल सुनावले होते. आणीबाणीत ज्या 20 कलमी कार्यक्रमाचा डंका वाजविला, त्याचे काय झाले, हा त्यांचा सवाल झोंबणारा होता. पण तेच सत्य होते. वास्तवाचा स्वीकार करण्याची मानसिकता तेव्हा काँग्रेसच्या बहुतांश नेत्यांमध्ये होती. आता शीर्षस्थ नेत्यांना आवडेल तेच बोलण्याची फॅशन रूढ झाली आहे. 
या पाश्र्वभूमीवर दिग्विजयसिंहांसारख्या नेत्यांनी काँग्रेसला कशा प्रकारच्या सर्जरीची गरज आहे, हे स्पष्टपणो विस्ताराने सांगायला हवे होते. सिंघवी ट्विटद्वारे बोलले तर ते पी. सी. चाकोंच्या टीकेचे धनी झाले. चाको म्हणतात, जे काही बोलायचे ते पक्षाच्या अंतर्गत व्यासपीठावर बोला. मुद्दलात आता लोकांशी थेट संवाद साधू शकण्याची हातोटी असलेले किती राष्ट्रीय नेते काँग्रेसकडे उरले आहेत? आता पक्षात गंभीरपणो चिंतन होत नाही. झालेच तर त्यात वेगळा सूर लावणारा ‘नकोसा’ ठरतो. सोनिया गांधी यांनी पंतप्रधान होऊ नये, असा वेगळा सूर एआयसीसीत (काँग्रेस कार्यकारिणीत) लावणा:या शरद पवार आणि तारिक अन्वर यांना अल्पावधीतच काँग्रेसमधून बाहेर पडावे लागण्याची स्थिती निर्माण झाली होती, याची आठवण अलीकडेच ‘लोकमत’च्या पुण्यातील कार्यक्रमात स्वत: पवारांनी सांगितली होती.
हे सारे नमूद करण्याचे कारण हे की काँग्रेसचा वारसा सहिष्णुतेचा. प्रमाणशीर लोकशाहीचा आदर ठेवण्याचा, चिंतनाचा आणि राज्य करण्याच्या सवयीचाही. गाडे सध्या अडले आहे ते राज्य करण्याच्या सवयीवरच. सशक्त विरोधी पक्ष ही लोकशाहीची गरज आहे. आजचा प्रभावी विरोधी पक्षच उद्याचा सत्ताधारी पक्ष बनतो, याचे भान सुटले आहे. काँग्रेस अजूनही मानसिकदृष्टय़ा विरोधकाच्या भूमिकेत शिरायला तयार नाही. 1984 च्या लोकसभा निवडणुकीनंतर लोकसभेत भाजपाचे केवळ दोन सदस्य होते. ती स्थिती पचवता आल्यानेच अटलबिहारी वाजपेयी काही वर्षानी पंतप्रधान झाले. हे कालचक्र नैसर्गिक आहे, याचा विसर पडू न देता काँग्रेसने समर्थ विरोधकाच्या भूमिकेला न्याय देणो गरजेचे आहे. तेच लोकशाहीच्या आणि देशाच्याही हिताचे आहे. ‘सर्जरी यशस्वी झाली, पण पेशंट दगावला’ असे होऊ द्यायचे नसेल तर ते अत्यावश्यकही आहे. हे सारे करताना सोनिया गांधी आणि राहुल गांधी वजा करून काँग्रेसचा वटवृक्ष तगणार नाही याचे भानही सुटून कसे चालेल?