- चंद्रमोहन कुलकर्णी
हाएत का कुळकरनी साएब घरात..?’’
असं खास पोलिसी, जड आवाजात विचारत विचारत हवालदार घराचं फाटक उघडून घरात शिरले.
आमचे बंधुराज पोलीसमधे. बंगल्याच्या वरच्या मजल्यावर ते राहतात. त्यांच्याकडे हे हवालदार आले असणार असं समजून त्यांना जिना दाखवला, तर ते म्हणाले, ते नाय, आर्टिस् कुळकरनी पायजेत.
म्हटलं ‘‘या आत’’.
आत घरात येत, भिंतींवरच्या चित्रांवर नजर फिरवीत हवालदार पुन्हा खर्जात गुरगुरले,
‘‘तुमीच दिसताय की आर्टिस्’’ - हवालदार.
पोलीस घरी यावेत असा मी काय गुन्हा केला असावा याचा अंदाज बांधत मी हवालदारसाहेबांना विचारलं, ‘‘हो, मीच. बोला, काय काम काढलंय माज्याकडे?’’
‘‘शासनाला मदत करावी अशी विनंती आहे.
आपल्या कलेचा समाजाला उपयोग व्हावा.’’
हवालदारांच्या बोलण्याचा मला काही अर्थबोध झाला नाही. त्यांच्या ते लक्षात आलेलं दिसलं. म्हणाले, ‘‘चौकीवर चलावं लागतंय. केच काढायचंय’’.
‘‘केच?’’ - मी.
‘‘व्हय, केच. येवडे भारी आर्टिस् दिसताय आन केच कळंना झालंय व्हय?’’
मुख्य विषय जरा लांबतोय असं दिसल्यावर हवालदार लगेच थोडे बिघडले.
‘‘कसलं केच? तुम्ही काय बोलताय ते काही माज्या नीट लक्षात येत नाहिये साहेब..’’
‘‘सायेब, तुमी आधी चौकीवर चला आनि तुमचे जे काय असतील ते सगळे प्रश्न आमच्या सायबांना विचारा’’ - हवालदारसाहेबांनी बजावलं.
मी म्हटलं, ‘‘चला तुम्ही पुढे, मी येतोच.’’
**
स्थळ : चौकी.
हवालदारांनी मला इन्स्पेक्टरांच्या समोर बसवलेलं. साहेब खाली मान घालून मोठय़ा रजिस्टरात पेन्सिलीनं कसल्यातरी खुणा करत बसले होते.
दहाएक मिनिटांनी सबइन्स्पेक्टरांनी मान वर करून माझ्याकडे पाह्यलं. कॉन्स्टेबलला आधी कसली तरी खूण केली, आणि मग म्हणाले,
‘‘येताना चहा बी सांगा.’’
परत खाली रजिस्टरात मान घालून म्हणाले, ‘‘बसा, झालंच’’.
चहा झाला.
कॉन्स्टेबलनं येताना वीस-बावीस वर्षाच्या कुणातरी एका पोराला पुढे घालून आणलं होतं. मला आतल्या खोलीत नेण्यात आलं. तिथल्या एका टेबलासमोरच्या लाकडी खुर्चीत आदरपूर्वक बसवण्यात आलं. थोड्या वेळानं त्या मुलालाही माझ्यासमोरच, पण प्लॅस्टिकच्या खुर्चीवर बसवलं.
हवालदारसाहेबांनी माज्या हातात एकदम टिपिकल असं, पोलिसांचे रायटर वापरतात तसलं एक सरकारी पॅड दिलं. सोबत सरकारी ऋकफ दर्ज करताना वापरतात तसले पिवळसर, सामान्य दर्जाचे, न्यूज प्रिंटचे लीगल साइजचे दहाएक कागद. हवालदार आता माझ्याशी प्रचंड नम्रतेनं वागत होते!
मला कळेना, की हे सगळं काय चाललंय.
हवालदारांना विचारल्यावर कळलं ते असं :
तो मुलगा चौकीशेजारच्याच एका मोबाइलच्या दुकानात नोकरी करत होता. सकाळी दुकान उघडल्या उघडल्याच त्याच्या दुकानातून बरेच मोबाइल चोरीला गेले. चोराला म्हणे ह्यानं पाहिलं होतं; पण त्याला पकडण्यासाठी काउण्टरच्या बाहेर हा यायच्या आधीच तो चोर शिताफीनं पळून गेला होता!
ह्यानं तक्रार दिली आणि तो करणार असलेल्या चोराच्या वर्णनावरून मी चित्र काढायचं होतं.
मी म्हटलं, ‘‘अहो, पण मी ह्याआधी असं कधीच काढलेलं नाहिये वर्णनाबरहुकूम आरोपीचं चित्र वगैरे. मला ह्यात नका आणू तुम्ही.’’
हे ऐकून इन्स्पेक्टर साहेबांनी, मी कसा भारी चित्रकार आहे, मोठीमोठी अवघड अवघड चित्र मी कशी मनानी काढलेली आहेत आणि हे काम तर माझ्या दृष्टीनं कसं एकदम सोप्पं आहे, हे मला त्यांच्या भाषेत समजावून सांगितलं. पोलिसांना मी मदत केली पाहिजे आणि पोलिसांना मदत म्हणजे समाजाला मदत असते असंही सांगून मला जबाबदारीची जाणीव करून दिली.
त्या मुलानं वर्णन करायला सुरुवात केली.
‘‘लुकडा होता’’, ‘‘काळा होता’’, ‘‘चौकटीचा शर्ट होता’’, ‘‘डावीकडनं भांग पाडला होता’’.
स्केचला अनावश्यक अशा एकूण पंचेचाळीस गोष्टी त्यानं सांगितल्या. मी पुढे पुढे त्याचा नाद सोडून देऊन मघाशी साहेब म्हणाले तसं खरोखरच मनानं चित्र काढू लागलो!
न्यूज प्रिंट्स. खाली सरकारी प्याड. अस्पष्ट उमटणारी नटराज पेन्सिल. मी घरनं साहित्य घेऊन येतो म्हणालो तर ते म्हणाले की, काढा हो, त्याला कशाला लागतंय एवढं भारी मटेरियल तुमच्याकडचं.
मी त्या अस्पष्ट पेन्सिलीचा स्वीकार करून अखेर केलीच सुरुवात स्केच करायला.
भांग काढून झाल्यावर म्हणाला, ‘‘असा नव्हता. डावीकडनं होता.’’
मी म्हटलं, हा डावीकडनंच आहे की! तर तो म्हणाला, ‘‘आपल्या डावीकडनं !’’
आता आलं का खोडरबर!
हवालदार तर आरोपीच्या चित्रावर प्रचंड फिदाच झाला होता. मी स्केच करताना मागून सिक्स्टी परसेण्ट, सेवण्टी परसेण्ट, सेवण्टीफाय परसेण्ट’ असं म्हणत म्हणत परसेण्टेज् वाढवत होता.
भांगाचा विषय निघाल्या निघाल्या आपण होऊनच हवालदार साहेबांनी आपल्या टेबलाच्या एका खणातून एक छोटीशी पेटी बाहेर काढली आणि तिच्यातून एक अतिशय सुंदर असं गुलाबी रंगाचं, नाजूक, सुगंधी खोडरबर बाहेर काढून अतिशय महान वस्तू एखाद्याला अर्पण करावी, तसं ते खोडरबर त्यांनी अर्पण केलं.
हवालदारसाहेबांच्या त्या मोठय़ा, जाड निबर हातातलं ते नाजूक खोडरबर बघून मला हवालदार साहेबांची दयाच आली.
घाईघाईनं ते खोडरबर त्यांच्या हातातून काढून घेत मी प्रचंड खाडाखोड करून ते स्केच कसंबसं एकदाचं पूर्ण केलं. चित्र हातात घेऊन लांऽब धरून मुलानं पाहिलं. (बहुतेक, बराच वेळ चाललेल्या ह्या स्केच प्रकरणातून सुटका करून घेण्यासाठी ) म्हणाला,
‘‘हाच होता साहेब तो. सेवण्टी परसेण्ट वाटतोय.’’
हवालदार साहेबांच्या मघापासून चाललेल्या परसेण्टेजचा उलगडा मला आत्ता झाला होता!
हे सगळं होईपयर्ंत इतका वेळ कुठेतरी गायब झालेले सबइन्स्पेक्टर साहेब कुठूनतरी अचानक उगवले आणि आल्या आल्या चित्र बघून मोठय़ा आवाजात त्यांनी डिक्लेअर केलं. खरं तर आधी स्केचकडे आणि नंतर मुलाकडे पाहून ते जवळजवळ दरडावलेच,
‘‘एटी परसेंट!’’
घाबरून मुलगा म्हणाला, ‘‘हो साहेब!’’
साहेबांनी मग ते चित्र हातात घेऊन बराच वेळ न्याहाळलं. कॉन्स्टेबलला दाखवलं. हवालदाराशी चर्चा केली, मला पुन्हा एकदा चहा पाजला.
मला म्हणाले, ‘‘अशीच सेवा करत जावी समाजाची अधूनमधून!’’
मग त्या एटी परसेण्ट ‘‘बरोबर निघालेल्या’ चित्रावरून ते त्या आरोपीला कसं धक्क्याला लावणार आहेत हे मला सांगून उरलेल्या ट्वेण्टी परसेण्टबद्दल मला माफ करून त्यांनी वर माझं सांत्वन केलं.
शहरातल्या सगळ्या पोलीस स्टेशनवर द्यायला पुरतील एवढय़ा त्या स्केचच्या झेरॉक्स काढून त्या सगळीकडे डिस्प्ले करायची ऑर्डर त्यांनी कॉन्स्टेबलला दिली आणि माझे आभार मानून त्यांच्या बुलेटला एक हलकीशी किक मारून बुलेटचं ते स्पेशल फायरिंग करत निघून गेले.
**
त्या (‘एटी परसेण्ट’ स्केचमुळं पुढं तो आरोपी सापडला की नाही आणि त्या मुलाला त्याचे मोबाइल परत ताब्यात मिळाले की नाही हे बघायला तिथं परत जायला आजपयर्ंत तरी माझं डेअरिंग झालेलं नाही!
**
आरोपी सापडला असेलच, तर तो माझ्या (खरं त्याच्या) स्केचच्या किती पर्सेण्टजवळ आहे हे ताडून बघायची माझी इच्छा मात्र तीव्र आहे!!!