इकडे महाराष्ट्रात मराठी जगते की मरते याची (नेहमीची) चिंता पडलेली असताना, आणि ‘मराठी पुस्तकं खपत नाहीत हो’चा आक्रोश काही केल्या संपतच नसताना दूरदेशी राहणारे काही ‘मराठी लोक्स’ मात्र ऋषीमधला ऋ कॉम्प्युटरवर शुद्ध देवनागरीत कसा टंकायचा याच्या चर्चा करता करता
चक्क मराठीतून दिवाळी अंक काढायला लागलेत. हे लोक लिहितात कुठे? ते छापतं कोण आणि मराठीतून वाचायला येतं कोण? एवढय़ा लांबून मराठी आणि मायदेशाकडे बघताना त्यांना काही वेगळं चित्र दिसतं का?
संहिता अदिती जोशी
ऑस्टीन, टेक्सास
शाळेत असताना मला भाषा विषयामध्ये अजिबात रस नव्हता; भाषा विषयात आजही फार गती नाही. त्यामुळे आपण काही लिहायचं असतं किंवा लिहावं असं तेव्हा वाटतच नव्हतं. सांगण्यासारखं तेव्हा माझ्याकडे काही नव्हतं.
२00४ ते २00७ या काळात मी सायबाच्या देशात उच्चशिक्षणासाठी राहत होते. जगाचा अनुभव घ्यायचा, एकीकडे पदवी मिळेलच, वर पुन्हा ‘फॉरीन रिटर्न’चा मौल्यवान शिक्का भाळी बसेल, शिक्क्यामुळे नोकरी मिळवणं सोपं जाईल इतपतच विचार त्या परदेशगमनामागे होता. परदेशी असताना तिथल्या मराठी लोकांना भेटण्याची फार असोशी मला नव्हती; पण भारतात काय सुरू आहे याबद्दल मात्र कुतूहल होतं. इंग्लिश वाचनाचा वेग कमीच होता, त्यामुळे आळसापोटी का होईना, मराठी पेपर वाचायला मिळाला तरी फार असं वाटायचं.
त्याच सुमारास मराठी आंतरजालाचा मला शोध लागला. आंतरजाल म्हणजे इंटरनेट. ज्या संकेतस्थळांवर (वेबसाइट्स) मराठीतून देवघेव होते ते मराठी आंतरजाल, आंजा. मराठी आंजाशी माझी ओळख मराठी वृत्तपत्र वाचनातून झाली. देवनागरीतून संगणकावर मराठी लिहिता येतं हा शोध लागण्यासाठी आणखी काही वर्षं लागली. तोपर्यंत तंत्रज्ञान कोणालाही देवनागरीत मराठी लिहिता येईल इतपत पुढे गेलेलं होतं.
सुरु वातीला परदेशी राहणारे मराठी भाषिक कसंही करून एकमेकांशी मराठीतून संवाद साधायचे, मग ते रोमन लिपीतलं मराठी का असेना, या हट्टाने मराठी संस्थळं चालवत होते. भारतात तेव्हा नुकतंच डायल-अप इंटरनेट येत होतं. मराठीतून संवाद साधण्याची सुलभ आणि मुख्य म्हणजे स्वस्त सोय तेव्हा महाराष्ट्रात होती. डायल-अप आंतरजालाच्या काळात मलाही या संस्थळांची गोडी नव्हती. इमेलमधून कधीमधी ‘दारू पिताना मी कधीच रिस्क घेत नाही’ यासारखी मराठी कविता आली की तेवढय़ापुरती गंमत असायची तेवढंच.
सायबाच्या देशातून भारतात परत आले तेव्हा परिसरात संस्थळांबद्दल गप्पा ऐकल्या आणि ‘बघूया ही काय गोष्ट आहे ते’ एवढय़ा र्मयादित विचारांतून मी मराठी आंजाचा तपशिलात तपास काढला.
मराठी संस्थळांचा शोध लागेपर्यंत ‘ही काहीतरी
गंमत असते आणि आपल्यालाही ही देवाण-घेवाण आवडते’ हे मला समजलंच नव्हतं.
एकदा सवय लागल्यावर सुटत नाही असा हा प्रकार अनेकांचा झाला. मी पण त्यातलीच. आपल्या वेड्यावाकड्या विनोदांना लोक हसतात, कधी ते सुधारून देतात आणि वेळप्रसंगी आपल्या चुकाही प्रेमाने काढून देतात यातून सवय लागली. आपले विचार व्यवस्थित मांडायची शिस्त शिक्षणापुरती र्मयादित ठेवू नये, ही पहिली शिकवणी आंजामुळेच मिळाली.
आंजावरचं मराठी लेखन सुरू झालं ते परदेशी स्थायिक असणार्यांच्या स्मरणरंजनाच्या, मराठीत संवाद साधण्याच्या ओढीतून. सुरु वातीला हे लेखन गप्पा, संपर्काची ओढ, अनुभवांची (कधी निष्कारणच) केलेली देवघेव, कधी पाककौशल्याचं प्रदर्शनवजा देवाणघेवाण आणि शंकासमाधान इतपतच र्मयादित आवाका असणारं होतं. शिळोप्याच्या गप्पा आणि आपल्यासारख्या माणसांबरोबर टिंगलटवाळीची मजा त्यात होती.
जसे जास्त लोक यात आले तसं या गप्पांमधून मतंमतांतरं आणि नियमितपणे धारदार वादविवादही सुरू झाले. आस्तिक-नास्तिक, एनाराय-स्थानिक भारतीय, स्त्रीवाद असे काही नेहमीचे यशस्वी कलाकार. सामाजिक-राजकीय घटनांबद्दल मतप्रदर्शनं, चर्चांपासून ललित शैलीत लिहिलेल्या अनुभवांपर्यंत लेखनाचा पैस आणि वाचनीयता वाढत गेली. केवळ गप्पा आणि शेरामारीतून आंजावरचं मराठी लेखन बाहेर पडायची ही सुरुवात होती असं म्हणता येईल. आपण वाचलेली चांगली पुस्तकं, जालीय लेखन, बघितलेले चित्रपट, नाटकं, (परदेशी सदस्यांनी पाहिलेले) ऑपेरा यांच्याबद्दल सकस चर्चाही आता सातत्याने सुरू असतात.
एकेकाळी मॅजेस्टिकच्या दुकानामध्ये जाऊन पुस्तकं विकत घेताना मी फार हपापलेली असायचे. काय वाचू आणि काय नको असं व्हायचं. पुस्तकं, चित्रपट, कलाकृतींच्या चांगल्या (आणि सोप्या भाषेतल्या!) समीक्षा मी आंजावर वाचल्या. चांगल्या कलाकृतीकडून काय अपेक्षा असतात याबद्दल मतं तयार व्हायला लागली. मधल्या काळात अमेरिकेत राहायला आल्यानंतर इंग्लिश पुस्तकं, नियतकालिकं, परदेशी चित्रपट मिळवून वाचणं/पाहणं बरंच वाढलं. इंग्लिश वाचणार्या, परदेशी राहणार्या अनेक लोकांप्रमाणेच मराठी ही आता माझी ज्ञानभाषा नाही. अगदी मराठीतून विज्ञान-तंत्रज्ञानाबद्दल सोप्या भाषेत लिहिण्याची हौस असली तरीही अभ्यास इंग्लिशमध्येच होतो.
यावेळच्या भारतभेटीत मॅजेस्टिकमध्ये पुस्तकं पाहून हपापल्यासारखं झालं नाही. इंग्लिशमधून भारतीय भाषेत आणलेल्या लेखन, माहितीपेक्षाही अस्सल मराठीपणा, माझी मुळं काय आहेत हे शोधायला सुरुवात झाली.
‘ऐसी अक्षरे’ या आमच्या संस्थळाच्या दिवाळी अंकासाठी काम करताना मी बरंच काही नवीन शिकते. स्त्रीवादाचा अभ्यास इंग्लिशमधून करताना, भारतीय, मागास, आदिवासी, दलित स्त्रियांची दु:खं, त्यांची भाषाही मला समजत नाही. मराठीतून मला माझ्या समाजाबद्दल, पर्यायाने माझ्या मुळांपर्यंत पोहोचत जाण्याचा प्रयत्न करता येतोय. आंजावर बागडणं हा माझ्यासाठी स्वत:चा शोधही झालेला आहे.
लेखाच्या अगदी सुरु वातीला मी म्हटलं की मला शाळेत असताना भाषा विषय आवडत नसत,
मराठी तर अजिबात नाही. शाळेत असताना मी शुद्धलेखन लक्षात ठेवण्यासाठी कधीही कष्ट घेतले नाहीत, पण यावेळेस दुकानात जाऊन मी प्रमाणभाषा कोश विकत आणला. शालेय शिक्षणातून जे साधलं नाही, ते मराठी आंजाने कोणताही आव न आणता करून दाखवलं आहे.