गोंदियातील थरार : पत्नी पसंत नसल्याने काढला रागगोंदिया : आईवडिलांच्या संमतीने लग्न करून घरात आणलेली मुलगी पसंत नसल्याचा राग आणि त्यातून नेहमी उडणाऱ्या खटक्यांमुळे अखेर एका परिवारातील बापलेकांचा दुर्दैवी अंत झाला. सकाळी झोपेतून उठत असलेले वडील आणि लहान भावाच्या डोक्यात लोखंडी रॉडचे घाव घालून मोठ्या भावाने त्यांना यमसदनी पाठविले आणि त्यानंतर त्याने खोलीत जाऊन गळफास घेत आत्महत्या केली.हा थरार बुधवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास गोंदियाच्या सुंदरनगर भागात घडला. मदन चिमण मेश्राम (५०) व विकास मदन मेश्राम (२२) अशी खून झालेल्या बापलेकांची नावे आहेत, तर गणेश मदन मेश्राम (२५) असे आत्महत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशचे लग्न गोरेगाव तालुक्याच्या कवलेवाडा येथील सरिता हिच्याशी दोन वर्षापूर्वी झाले होते. परंतु सरिता पसंत नसल्याने तो नेहमीच तिच्याशी वाद घालत होता. तिचा रंग सावळा असल्याने तो तिला नेहमी माहेरीच पाठवायचा. आई-वडिलांनी त्याचे तिच्याशी लग्न करून दिल्यामुळे तो त्यांच्यावर नाराज असायचा. सरिताचे वडील व इतर चार जण मंगळवारी (दि.८) दुपारी १२ वाजताच्या दरम्यान गणेशच्या घरी बैठक करण्यासाठी आले होते. त्यावेळी गणेश हजर नव्हता. सरिताचे वडील व सोबत आलेल्या पाहुण्यांनी गणेशच्या आईवडिलांसोबत चर्चा करून तिला कवलेवाडा येथे माहेरी नेले. सायंकाळी गणेश घरी परतल्यावर तुझी पत्नी वडिलांसोबत माहेरी गेली. तू वागणूक सुधार, असा सल्ला आईवडिलांनी त्याला दिला. परंतु त्याने आईवडिलांचेही ऐकले नाही. त्यावेळी आईवडिलांशी भांडण करून तो घरातून निघून गेला. रात्री तो घरी परतला नाही. बुधवारी सकाळी ७ वाजता लहान भाऊ प्रकाश, मधला भाऊ विकास व वडील मदन मेश्राम हे झोपून उठत असताना गणेश घरी आला. काही वेळातच प्रकाश गोंदिया नगर परिषदेसमोर असलेले आपले चहाचे दुकान उघडण्यासाठी गेला. त्यावेळी घरी आलेल्या गणेशने पुन्हा वडील मदन मेश्राम (५२) व भाऊ विकास मेश्राम (२२) यांच्याशी भांडण केले. या भांडणात त्याने लोखंडी रॉडने वडील व भावाला मारहाण करून रक्तबंबाळ केले.या घटनेची माहिती प्रकाशला मिळाल्याने तो दुकानातून धावतच घरी गेला. शेजाऱ्यांच्या मदतीने त्याने मदन मेश्राम व भाऊ विकास मेश्राम यांना उपचारासाठी केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्या दोघांना मृत घोषित केले. यानंतर घटनेची तक्रार नोंदविण्यासाठी प्रकाश गोंदिया शहर पोलिसात गेला. पोलिसांच्या वाहनाने ते सुंदरनगरातील घटनास्थळी गेले. यावेळी गणेशची खोली आतून बंद होती. दाराला धक्का दिल्यावर गणेश आपल्या खोलीतील चादरीने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. पत्नी पसंत नसल्याच्या रागातून एका कुटुंबाची अशी शोकांतिका झाल्याने सुंदरनगर परिसरातील वातावरण सुन्न झाले आहे. गोंदिया शहर पोलिसांनी भादंवि कलम ३०२ नुसार तसेच गणेशच्या आत्महत्येसाठी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. (प्रतिनिधी)
वडील व भावाचा खून करून युवकाची आत्महत्या
By admin | Updated: July 10, 2014 00:45 IST