पुणे : यापूर्वीच्या सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात बेरोजगारांच्या फौजा तयार झाल्या. युवक ताकद बनण्याऐवजी देशावरचे ओझे बनले. हे चित्र पालटवण्यासाठी देशाचे भाग्य बदलणाऱ्या योजना मोदी सरकारने सुरु केल्या आहेत. त्याविरुद्धच्या भ्रामक प्रचाराला युवकांनी बळी पडू नये, असे आवाहन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी केले.प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानाच्या प्रसारासाठी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यावेळी उपस्थित होते. शहा म्हणाले, भारत हा तरुणांचा देश आहे. युवकांच्या हातांना काम देण्याची रणनिती आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असणारी राजकीय इच्छाशक्ती नरेंद्र मोदींकडे आहे. रोजगार निर्माण करण्याच्या क्षमतेपेक्षा अधिक लोक शेतीवर अवलंबून असल्याने शेती फायद्यात येऊ शकत नाही. शेतीवरचे अवलंबित्त्व कमी करण्यासाठी युवकांना कौशल्याधारीत शिक्षण देण्याचे मोदींचे नियोजन आहे. (प्रतिनिधी)काँग्रेसने दाखवले काळे झेंडेशहा यांच्यासमोर काँग्रेसने काळे झेंडे दाखवत निदर्शने केली. ‘गुन्हेगार शहा, चले जाव’ च्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. निदर्शनाची जागा बदलल्याने कार्यकर्ते व पोलिस यांच्यात वादावादी झाली. बालगंधर्व रंगमंदिर येथे रविवारी सकाळी साडेदहा वाजता शहा येणार होते. त्यापूर्वीच काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, पालिकेतील विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, माजी महापौर कमल व्यवहारे, नगरसेवक अविनाश बागवे आदी पदाधिकारी कार्यकर्त्यांसमवेत काळे झेंडे घेऊन तिथे उपस्थित झाले. त्यांना पोलिसांनी बालगंधर्व चौकातील जागा ठरवून दिली होती, मात्र त्यांचा हा मोर्चा ऐनवेळी स्वातंत्र्यवीर सावरकर भवन येथेच अडवण्यात आला.
युवकांनी भ्रामक प्रचाराला बळी पडू नये
By admin | Updated: June 6, 2016 03:20 IST