औरंगाबाद/यवतमाळ : यवतमाळ जिल्हा परिषदेतर्फे विविध पदांसाठी रविवारी झालेल्या लेखी परीक्षेच्या उत्तर तालिकांची (अन्सर की) विक्री करणाऱ्या राज्यस्तरीय टोळीतील ११ व्हॉईट कॉलर आरोपींना शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने फिल्मीस्टाईल पाठलाग करून शनिवारी मध्यरात्री जेरबंद केले. टोळीचा म्होरक्या शहरातील विक्रीकर निरीक्षक असून स्पर्धा परीक्षा शिकवणीचे खासगी वर्ग चालविणाऱ्या व्यक्तीला हाताशी धरून विद्यार्थ्यांमार्फत ही टोळी आपले सावज टिपत असल्याचे समोर आले आहे. विक्रीकर निरीक्षक, खासगी शिकवणी वर्गाचा संचालक, बँकेचा लिपिक, तीन परीक्षार्थी व तीन वाहनचालकांचा अटक केलेल्यांत समावेश आहे. त्यांच्याकडून उत्तर तालिकांची हस्तलिखिते व वाहने, असा १६ लाखांहून अधिक रकमेचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अशी : टोळीचा म्होरक्या औरंगाबादेतील विक्रीकर निरीक्षक मकरंद मारुती खामणकर (४३, रा. सागर प्लाझा, ज्योतीनगर, औरंगाबाद), वाडेकर क्लासेसचे दादासाहेब राघो वाडेकर (५०, रा. किणी, पो. वडगाव, जि. औरंगाबाद), भागीनाथ साहेबराव गायके (३६, रा. मु.पो. शेवगा, ता. जि. औरंगाबाद), औरंगाबाद जिल्हा सहकारी बँकेच्या जिल्हा दूध संघ शाखेतील लिपिक विनोद दत्तात्रय वरकड पाटील (४०, रा. बहादूरपुरा, औरंगाबाद), परभणी आरटीओ कार्यालयातील लिपिक पोपट नथू कऱ्हाळे (३४, रा. पळाशी, जि. औरंगाबाद) यांच्यासह परीक्षार्थी महेश आनंदराव गायकवाड (२५, रा. धामणगाव रेल्वे, जि. अमरावती), महादेव रामदास नायसे (२५, रा. बोरगाव मंजू, ता. जि. अकोला), सुरेश भीमराव आरसूळ (२२, रा. पराडा, ता. अंबड, जि. जालना), चालक काळुसिंग पन्नालाल नायमनी (२६, रा. शेवगा, ता. जि. औरंगाबाद), चालक केशव लिंबाजी सोनकांबळे (४२, रा. गौतमनगर, ता. जि. परभणी), चालक सचिन वाल्मीकराव गायकवाड (३१, रा. नवनाथनगर, एन. ११ हडको, औरंगाबाद). अटकेतील आरोपींना पोलिसांनी रविवारी न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना ८ दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली. शनिवारपासून पोलीस संशयित वाहनांच्या मागावर होतेच. पोलीस पथकांनी संशयित दोन इन्होवा, एक होंडा सिटी व एक टाटा इंडिका या वाहनांचा पाठलाग करून आरोपींना पकडले. त्यांच्या झडतीत उत्तर तालिकांची हस्तलिखिते सापडली. पोलीस उपायुक्त वसंत परदेशी, परिमंडळ दोनचे उपायुक्त अरविंद चावरिया, गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त बाबाराव मुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. (प्रतिनिधी)
यवतमाळ जि.प.च्या पदभरतीचा पेपर फुटला
By admin | Updated: November 3, 2014 03:37 IST