जमावबंदी : पुसद येथे जाळपोळ तर भंडाऱ्यात बसेसवर दगडफेक, आमदारांसह १५ अटकेतयवतमाळ/भंडारा : दोन वेगवेगळ्या कारणावरून उफाळलेल्या वादामुळे यवतमाळ जिल्ह्यात पुसद आणि भंडारा शहरात तणाव निर्माण झाला आहे. स्थिती आटोक्यात आणण्यासाठी पुसद शहरात जमावबंदी तर भंडारा शहरात आंदोलककर्त्यांवर पोलिसांना सौम्य लाठीमार करवा लागला. पुसद येथे ईदची नमाज अदा करण्यासाठी गेलेल्या मुस्लिम बांधवांना वाहन पार्किंगसाठी एका पोलीस अधिकाऱ्याने हटकले. शिवाय अपशब्दांचा वापर केला. पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या या आतताईपणाचे पडसाद बुधवारीही उमटले. काही ठिकाणी दगडफेक व जाळपोळीच्या घटना घडल्याने शहरात दुपारनंतर जमावबंदी जाहीर करण्यात आली. सविस्तर वृत्तानुसार पुसद येथे मंगळवारी नमाज अदा करण्यासाठी जमलेल्या नागरिकांबाबत सहायक पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण यांनी अपशब्द वापरले. त्यावरून शेकडोच्या संख्येने नागरिक पोलीस ठाण्यावर धडकले होते. त्यानंतर शहरातील हॉटेल आणि खासगी रुग्णालयांवर दगडफेक करण्यात आली होती. पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता. मात्र बुधवारी सकाळपासून शहरात तणाव वाढत गेला. काही भागात दगडफेकीच्या घटना घडल्या. काही दुकानांची जाळपोळ करण्यात आली. त्यामुळे पुसद शहरात दुपारपासून जमावबंदी लागू करण्यात आल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी ‘लोकमत’ला सांगितले. दरम्यान, सकाळी पुसद येथे अन्न व औषधी प्रशासन मंत्री मनोहरराव नाईक, जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल आणि पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत शांतता कमिटीची सभा घेण्यात आली. सध्या पुसद शहरातील परिस्थिती नियंत्रणात असून तणावपूर्ण शांतता आहे. पुसदमध्ये राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकडीसह तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वृत्त लिहेस्तोवर ११ जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच ईदच्या दिवशी भंडारा शहरातील शीतला माता मंदिरासमोरील खुल्या जागेत नमाज पठन करण्यात आले. दरम्यान मंदिरात हिंदू रक्षा मंच आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी भजनाचा कार्यक्रम ठेवला होता. नमाज पठनाचा कार्यक्रम आटोपल्यावर दोन्ही गटांत संघर्षाची स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी प्रकरण कुशलतेने हाताळले; पण शीतला माता मंदिरावर झालेल्या दगडफेकीच्या निषेधार्थ बुधवारी नागरिकांनी कडकडीत बंद पाळला. सायंकाळी ४.३० सुमारास जमलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी सौम्य लाठीमार करून शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यासह १५ जणांना अटक केली. दिवसभरात पाच बसेसवर दगडफेक झाल्याने वाहनांच्या काचा फुटल्या. ठिकठिकाणी टायर जाळून घटनेचा निषेध करण्यात आला. या बंदमध्ये मात्र अत्यावश्यक सेवा सुरळीत सुरू होती. शहरातील चौकांमध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. शाळा, महाविद्यालये, व्यापारी प्रतिष्ठाने पूर्णत: बंद होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)
यवतमाळ, भंडारा जिल्ह्यात तणाव
By admin | Updated: July 31, 2014 01:02 IST