मुंबई : महापालिकेने रस्ते दुरुस्तीसाठी ७ हजार कोटी रुपयांची तरतूद केली असून, ७०० रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम २०१६पर्यंत पूर्ण होईल, असा दावा पालिकेने केला आहे. परंतु या रस्त्यांचे काम करणाऱ्या कामगारांना संबंधित कंत्राटदारांकडून आवश्यक सुरक्षाविषयक साधने पुरविली जात नसल्याचा आरोप केला जात आहे. विशेष म्हणजे ही बाब महापालिका प्रशासनाच्या लक्षात आणूनदेखील काहीच कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. रस्ते दुरुस्ती व पुनर्निर्माण प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात असताना आधुनिक बॉईलर्स ट्रक्समधून मास्टिक नामक डांबराचे रासायनिक मिश्रण व द्रव्याचा थर रस्त्यावर चढवला जातो. २०० डिग्रीच्या तापमानात असलेले हे मास्टिक द्रव्य बॉईलर्समधून थेट रस्त्यावर सांडले जाते व अकुशल मजूर ते द्रव्य लोखंडी अवजारांच्या साहाय्याने रस्त्यावर एकसमान पसरवतात. हेल्मेट, हातमोजे, गमबूट, चष्मा, मास्क नसतानाही त्यांना काम करावे लागते, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते राजेश इंगळे यांनी दिली. पत्रव्यवहार करूनही दखल घेण्यात येत नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)
कामगारांना सुरक्षा उपकरणेच नाहीत
By admin | Updated: May 8, 2015 04:26 IST