वाडा : तालुक्यातील कोंढले येथे ४००/२२० केव्ही वीज उपकेंद्राचे काम गेल्या तीन वर्षांपासून कासवगतीने सुरू आहे. मात्र, गेल्या पावसाळ्यापासून हे काम बंद असल्याने हे काम केव्हा होणार, असा सवाल उद्योजकांसह रहिवासी करत आहेत.वाडा तालुक्यात डी प्लस झोनमुळे उद्योगधंदे वाढल्याने गांध्रे (वाडा) येथे असलेल्या वीज वितरण केंद्रावर मोठा भार वाढत होता. त्याचप्रमाणे गावागावांच्या वीज जनित्रांमध्ये बिघाड होऊन अनेक गावे अंधारात बुडत होती. त्यामुळे ग्राहक हैराण झाले होते. तसेच उद्योजकांनाही विजेचा तुटवडा भासत होता. त्यावर उपाय म्हणून वीज कंपनीने येथे ४००/२२० केव्हीए उपकेंद्राला मंजुरी दिली. त्यानंतर, कोंढले येथील सरकारी १९.७५ हेक्टर जागा २ कोटी १७ लाख रुपये देऊन विकत घेतली. त्यानंतर, २०११ च्या आसपास या वीज उपकेंद्राचे काम सुरू करण्यात आले असून ज्योती स्ट्रक्चर लि. या कंपनीला हे काम देण्यात आले आहे. मात्र, वीज उपकेंद्राचे काम ठप्प असल्याची माहिती येथील सुरक्षारक्षक जी. एन. जाधव यांनी दिली. शासनाने हे काम २२ महिन्यांच्या कालावधीसाठी दिले होते. मात्र, तीन वर्षे उलटूनही या उपकेंद्राचे काम काहीही झालेले नाही.वीज उपकेंद्राचे काम कासवगतीने सुरू असल्याने याचा फटका वाड्यातील उद्योजकांसह नागरिकांना बसत आहे. या उपकेंद्राने वाडा विजेबाबतीत सक्षम होणार असून २५ वर्षांत वाड्याला विजेची कमतरता भासणार नाही, असे वीज कार्यालयाचे म्हणणे आहे. (वार्ताहर)
कोंढले वीज उपकेंद्राचे काम कासवगतीने
By admin | Updated: December 29, 2014 05:19 IST