मुंबई : जगभरातील शहरांत कोणत्या भागांत महिलांना असुरक्षित वाटते, याची नोंद घेणा-या अॅपचे लाँच गुरुवारी मुंबईत झाले. महिला अत्याचारांच्या प्रश्नावर काम करणा-या ‘रेड डॉट फाऊंडेशन’ या संस्थेने ‘सेफ सिटी’ उपक्रमांतर्गत हे अॅप तयार केले आहे. अमेरिकी वकिलातीत सुप्रीत सिंग व मुंबईतील अमेरिकी वकिलातीच्या उपमुख्यअधिकारी जेनिफर लॉर्सन यांच्या उपस्थितीत त्याचे लाँच झाले.‘ग्लोबल सेफ सिटी’ हे अॅप मोबाइलवर डाऊनलोड करून छेडछाड, विनयभंग, बलात्कार किंवा अन्य अत्याचारपीडित महिलांना संबंधित संस्थेपर्यंत पोहोचविण्यात येईल. महिलांकडून अॅपवर मिळणाºया माहितीचे ठिकाणांनुसार वर्गीकरण करण्यात येईल. त्यानुसार महिलांसाठी असुरक्षित ठिकाणांची नोंद करण्यात येईल. अॅपवरील नकाशात अशी असुक्षित ठिकाणे लाल बिंदूंद्वारे दाखविण्यात येणार असून, तेथे क्लिक केल्यास घडलेल्या घटनांची माहिती (पीडितेचे नाव गुप्त ठेवून) मिळेल. त्यामुळे अनोळखी ठिकाणी जाताना महिलांना सुरक्षिततेसाठी आवश्यक काळजी घेता येईल. या अॅपची संकल्पना गेल्या वर्षी ‘ग्लोबल एंटरप्रेन्युएर समिट’मध्ये मांडण्यात आली होती. एका अमेरिकी कंपनीने त्यासाठी अर्थसाह्याची तयारी दर्शविली आणि हे अॅप शक्य झाले. भारत, केनिया, कॅमेरून, नेपाळ या देशांतील जवळपास ५0 शहरांमध्ये हे अॅप सुरू करण्यात आले असून, लवकरच ते अन्य देशांतही सुरू करण्यात येईल, असेही सिंग यांनी सांगितले.
‘सेफ सिटी’ जगातील घेणार महिला अत्याचारांची नोंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 05:06 IST