पाटोदा (जि. बीड) : शनिवारी सौंदाणा येथे घोटभर पाण्यासाठी एका महिलेला प्राणास मुकावे लागले. तहान लागल्याने विहिरीत उतरत असताना महिलेचा तोल गेला. पोहता येत नसल्याने तिचा बुडून मृत्यू झाला. जिल्ह्यातील हा १४ वा पाणीबळी ठरला. सत्यभामा छगन कदम (५०, रा. सौंदाणा) शनिवारी सकाळी सात वाजता सरपण आणण्यासाठी गावाजळील शेतात गेल्या होत्या. शेताजवळ शिवदास भीमराव कदम यांची विहीर आहे. तहान लागल्याने विहिरीत उतरत असताना त्यांचा तोल गेला होता. दुपारी १२ वाजता त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. सत्यभामा या शेतकरी कुटुंबातील असून त्यांच्या मागे पती, एक मुलगा व एक विवाहित मुलगी आहे. दहा वर्षांपूर्वी गावात जलस्वराज्य योजना राबविली होती. सार्वजनिक विहिरीला पाणीही आहे; परंतु दीड महिन्यांपूर्वी पाईपलाईन फुटली. त्यामुळे गाव टंचाईच्या झळा सोसत आहे. अनेकजण शेतशिवारातून मिळेल तेथून पाणी आणत आहेत. (प्रतिनिधी)
घोटभर पाण्यासाठी महिलेचा गेला जीव
By admin | Updated: May 15, 2016 05:24 IST