मुंबई : बांधकाम सुरु असलेल्या एका इमारतीमध्ये अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याची घटना बुधवारी सकाळी कुर्ला पश्चिम येथे समोर आली आहे. या महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला असून शवविच्छेदन अहवालानंतरच या महिलेच्या हत्येचे कारण समोर येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. एचडीआयएल कोहिनूर सिटी परिसरात २७ नंबरच्या इमारतीमधील खोलीमध्ये महिलेचा मृतदेह काही कामगारांना दिसला. त्यांनी तत्काळ ही माहिती व्हि.बी. नगर पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हा मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदनासाठी तो राजावाडी रुग्णालयात पाठवला आहे. ही महिला बांधकाम सुरु असलेल्या इमारतीमध्ये १५ दिवसांपासून मजूराचे काम करत होती. तसेच याच इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ती एकटी राहत असल्याची माहिती कामगारांनी पोलिसांना दिली आहे. तसेच तिच्या शरीरावर अनेक जखमा देखील आढळून आल्या आहेत. (प्रतिनिधी)
बलात्कारानंतर महिलेची हत्या?
By admin | Updated: January 26, 2017 05:37 IST