मुंबई : कमी जागेत व कमी पाण्यात दर्जेदार आणि निर्यातक्षम फुले, तसेच भाजीपाला निर्माण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांत संरक्षित शेती प्रकल्प राबविण्यात येणार आहे, तसेच विदर्भ व मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यांत नवीन सामूहिक शेततळे हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या दोन्ही प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याची माहिती कृषीमंत्री एकनाथराव खडसे यांनी आज येथे दिली. दोन्ही प्रकल्प प्रत्येकी २५ कोटी रु पये खर्चाचे असून, मंजूर निधीपैकी केंद्र व राज्य शासनाचा हिस्सा प्रत्येकी ५० टक्के एवढा असेल. अंमलबजावणी चालू वर्षापासून होईल. पहिल्या प्रकल्पांतर्गत हरित गृह व शेडनेटचा समावेश असून, त्यास शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. सामूहिक शेततळयांमध्ये विदर्भ व मराठवाड्यातील फलोत्पादन क्षेत्रास संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार आहे. पहिल्या प्रकल्पांतर्गत राज्यात २५० हरित गृहे व २५० शेडनेट गृहे उभारण्याचे लक्ष असून, प्रत्येक बाबींसाठी १२ कोटी, ५० लाख रु पये निधी देण्यात येणार आहे. सामूहिक शेततळे प्रकल्पांतर्गत प्रत्येक शेततळ्यांमध्ये कमाल १० हेक्टर फलोत्पादन क्षेत्र सिंचनाखाली येईल, याची खात्री असल्यास, २० लाख रु पये अनुदान देण्यात येईल. त्यापेक्षा कमी क्षेत्र असल्यास प्रमाणानुसार अनुदान कमी राहील. शेततळ्यास अस्तरीकरण नसल्यास अनुदान ३० टक्क्यांनी कमी राहील. (विशेष प्रतिनिधी)
विदर्भ, मराठवाड्यात सामूहिक शेततळी प्रकल्प राबवणार
By admin | Updated: October 28, 2015 02:17 IST