रत्नागिरी : झुकायचंच असेल तर शिवरायांसमोर झुकेन, शिवसेनाप्रमुखांसमोर झुकेन, तुमच्यासमोर झुकेन, पण दिल्लीतील शहेनशहा बादशहांसमोर कदापि नतमस्तक होणार नाही, असे अनेक आदिलशहा आले; पण महाराष्ट्राने त्यांना मातीत मिसळले, अशी घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केली. रत्नागिरीतील कै. प्रमोद महाजन क्रीडा संकुलात झालेल्या सभेत त्यांनी महाराष्ट्रातील विकासाच्या शिवसेनेच्या योजनांवर भाष्य करतानाच काँग्रेस, राष्ट्रवादीसह भाजपावर कडाडून टीका केली. पृथ्वीराज चव्हाण म्हणतात, उद्धव ठाकरेंना अनुभव कोठे आहे; पण सत्ता चालविण्यासाठी अनुभवाची नाही तर बुद्धी आणि कल्पनाशक्तीची गरज आहे, ती माझ्याकडे आहे, असे त्यांनी सांगितले. आपल्या भाषणात ठाकरे यांनी जैतापूर प्रकल्पावर आवर्जून मतप्रदर्शन केले. भाजपा आणू पाहत असलेल्या या प्रकल्पाला जनतेचा विरोध असेल तर आपण जनतेसोबतच राहू आणि शिवसेनेची सत्ता आल्यास हा प्रकल्प कदापि होऊ दिला जाणार नाही, असे ते म्हणाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने गेल्या १५ वर्षांत महाराष्ट्र लुटून खाल्ला आहे. एका बाजूला हे लुटारू आहेत आणि दुसऱ्या बाजूला माणसे तोडणारे बसले आहेत आणि त्यांच्यामध्ये मी आहे. महाराष्ट्राला स्वाभिमानी मुख्यमंत्र्यांची गरज आहे. दिल्लीसमोर शेपूट हलविणारा मुख्यमंत्री महाराष्ट्र जवळ करणार नाही, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
दिल्लीच्या शहेनशहासमोर झुकणार नाही - ठाकरे
By admin | Updated: October 9, 2014 04:49 IST