पुणे : सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये खूप भ्रष्टाचार झाला आहे. छगन भुजबळ, त्यांचा मुलगा व पुतण्याला लवकरच तुरुंगात भेटायला जावे लागेल, असे वक्तव्य सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी एका कार्यक्रमादरम्यानकेले. विधिमंडळाचे अधिवेशनसुरू असताना पाटील यांच्याया वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून या मुद्यावर सरकारला घेरले जाऊ शकते.बँक आॅफ महाराष्ट्र कर्मचारी क्रेडिट को-आॅपरेटिव्ह सोसायटीच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते झाले. सहकारातील भ्रष्टाचाराबाबत बोलताना त्यांनी सार्वजनिक बांधकाम क्षेत्रातील भ्रष्टाचाराचा मुद्दा काढला आणि आता तुम्हाला भुजबळ, त्यांचा मुलगा व पुतण्याला भेटायला लवकरच तरूंगात जावे लागेल, असे वक्तव्य केले. दिल्लीतील महाराष्ट्र सदनच्या बांधकाम घोटाळाप्रकरणी माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या कुटुंबियांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यामुळे चालू विधिमंडळ अधिवेशनात त्याचे पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)
भुजबळांना भेटण्यासाठी तुरुंगात जावे लागेल!
By admin | Updated: March 23, 2015 01:19 IST