ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. ३ - मिहानमधील वीज महागडी असल्याने तेथे येण्यास उद्योजक अनुत्सुक असतात असे सांगत मिहान प्रकल्पाल स्वस्तात वीज देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. नागपूरमधील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी विदर्भातील अनेक प्रश्न मार्गी लावण्याचे तसेच नागपूरचा विकास करणार असल्याचेही सांगितले.
मिहान प्रकल्पासंदर्भात केंद्राकडे पाठपुरावा करून हा प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्याचा प्रयत्न करू असेही ते म्हणाले.
मिहान प्रकल्पाच्या संदर्भात सोमवारी बैठक घेण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मिहानमधील वीज महाग असल्याने अनेक उद्योजक सेझमध्ये येण्यास अनुत्सुक आहेत. त्यामुळे स्वस्त दराने वीज देण्याचा आपला प्रयत्न राहील असेही त्यांनी सांगितले. तसेच मिहानसाठी वेगळे आयटीआय सुरू करण्यात येईल असेही ते म्हणाले.
विदर्भातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे तसेच नागपूरच्या पर्यटन विकासावरही भर देणार असल्याचे त्यांनी नमूद केले.