मुंबई : एक पॅनकार्ड असतानाही दुसरे पॅनकार्ड मिळवणाऱ्या कृपाशंकर सिंह यांच्यावर अद्याप कारवाई का करण्यात आली नाही? याचे स्पष्टीकरण उच्च न्यायालयाने सोमवारी प्राप्तिकर विभागाकडे मागितले आहे. यासाठी न्यायालयाने दोन आठवड्यांची मुदत दिली आहे.कृपाशंकर सिंह यांच्या बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी लाचलुपचत प्रतिबंधक विभागाने योग्यप्रकारे तपास केला नसल्याने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका तुलसीदास नायर यांनी न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. रणजीत मोरे व न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठापुढे होती.नायर यांनी कृपाशंकर सिंह यांच्याकडे चार पॅनकार्ड असल्याचा व शैक्षणिक पात्रतेची खोटी प्रमाणपत्रे दिल्याचा दावा याचिकेद्वारे केला आहे. परंतु, कृपाशंकर यांच्याकडे सध्या एकच पॅनकार्ड असल्याचे प्राप्तिकर विभागाने न्यायालयाला सांगितले. चारपैकी दोन पॅनकार्डांचा नंबरच अस्तित्वात नाही. तर उर्वरित दोनपैकी पहिले पॅनकार्ड बंद केले असून सध्या ते दुसऱ्या पॅनकार्डचा वापर करतात, असे प्राप्तिकर विभागाने उच्च न्यायालयाला सांगितले.कृपाशंकर यांना इतके झुकते माप का देण्यात आले? असा सवाल खंडपीठाने प्राप्तिकर विभागाला केला. मात्र याबाबत प्राप्तिकर विभागाकडे काहीच उत्तर नसल्याने त्यांनी याबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी खंडपीठाकडून दोन आठवड्यांची मुदत मागितली. याबाबत कायदेशीर कारवाई करा, असे म्हणत न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी दोन आठवड्यांनंतर ठेवली. (प्रतिनिधी)
दोन पॅनकार्डप्रकरणी कारवाई का नाही?
By admin | Updated: January 24, 2017 04:31 IST