मुंबई : मावळ गोळीबार प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांची अद्याप खातेनिहाय कारवाई का झाली नाही, असा सवाल करीत उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य शासनाचे चांगलेच कान उपटले़ही घटना होऊन चार वर्षे उलटली आहेत़ यासाठी चार पोलीस अधिकारी दोषी असल्याचे निष्पन्न झाले आहे, असे असताना या अधिकाऱ्यांवर अद्याप कारवाई न होणे ही गंभीर बाब आहे़ त्यामुळे यासाठी शासनाला दंड ठोठवायचा की नाही, हे पुढील सुनावणीला आम्ही जाहीर करू, असे न्या़ अभय ओक यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले़या प्रकरणी ईश्वर खंडेलवाल यांनी जनहित याचिका केली आहे़ २०११ मध्ये पवना धरणाच्या पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी गोळीबार केला़ यात काही शेतकऱ्यांचा बळी गेला़ या निर्घृण घटनेसाठी जबाबदार असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महानगर दंडाधिकारी न्यायालयात तक्रार करण्यात आली़ त्याची दखल घेत न्यायालयाने याच्या चौकशीचे आदेशही दिले़ तरीही कारवाई होत नसल्याने उच्च न्यायालयानेच या कारवाईचे आदेश द्यावेत, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली़ याची दखल घेत न्यायालयाने याचे प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश शासनाला दिले़ त्यानंतर या प्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायाधीश एम़ जी़ गायकवाड यांच्यामार्फत झाली़ पण यासाठी दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर अद्याप कारवाई झाली नसल्याचे खंडेलवाल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले़ त्यावर संतप्त झालेल्या न्यायालयाने शासनाला चांगलेच फटकारले़ (प्रतिनिधी)
दोषी अधिकाऱ्यांवर अद्याप कारवाई का नाही? - हायकोर्ट
By admin | Updated: February 3, 2015 01:31 IST