मुंबई : दारूबंदीचा उलटा परिणाम दिसून येत आहे. शिवाय, पोलीस यंत्रणेवरही ताण वाढत असल्यामुळे राज्यात सरसकट दारूबंदी लागू करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत स्पष्ट केले. यवतमाळ जिल्ह्यातील यावली येथे दारूबंदीसाठी आग्रह धरणाऱ्या पोलीस पाटलाची निर्घृण हत्या झाल्याबाबतची लक्षवेधी सूचना राष्ट्रवादीचे संदीप बाजोरिया यांनी मांडली होती. या वेळी झालेल्या चर्चेत सहभागी होताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्याची भूमिका ही दारूविरोधीच आहे. दारूवर नियंत्रण राहावे यासाठीच परवाना पद्धत आहे. पण चंद्रपूर, वर्धा व गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदीचा उलटा परिणाम दिसून येत आहे. आंध्र प्रदेशने संपूर्ण राज्यात दारूबंदी लागू केली. मात्र, तिथेही ती परिणामकारक ठरली नाही. पोलीस यंत्रणेवर आधीच कामाचा मोठा ताण आहे. दारूबंदी लागू केल्यानंतर पोलिसांवरचा ताणही मोठ्या प्रमाणावर वाढतो. सर्व यंत्रणा दारूबंदीसाठी राबविणेही शक्य नाही. त्यामुळे राज्यात सरसकट दारूबंदी करता येणार नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.(प्रतिनिधी)
सरसकट दारूबंदी अशक्य!
By admin | Updated: July 24, 2015 02:36 IST