प्रदेश काँग्रेसचा सवालमुंबई : जलसंपदा विभागाच्या कंत्राटदारांनी आपल्याला १०० कोटी रुपयांची लाच देऊ केली होती, या जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या विधानावर प्रदेश काँग्रेसने मंगळवारी तीव्र हरकत घेतली. लाच देऊ करणाऱ्यांची नावे जाहीर करा, असे आव्हान प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी महाजन यांना पत्राद्वारे दिले आहे. महाजन यांनी जळगावमध्ये एका कार्यक्रमात हे विधान केले होते. महाजन यांना एवढी मोठी लाच देऊ केली असेल तर त्यांनी कंत्राटदारांची नावे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे का कळविली नाहीत, असा सवालही सावंत यांनी केला आहे. लोकप्रतिनिधींना आमिष दाखविणे, लाच देऊ करणे हा लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा आहे. राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यांना अशा पद्धतीने लाच देण्याची हिंमत कंत्राटदार दाखवित असतील तर हे प्रकरण गंभीर ठरते. महाजन यांनी त्या कंत्राटदारांची नावे जाहीर करावीत, अशी मागणीही सावंत यांनी केली आहे. (विशेष प्रतिनिधी)