तासगाव : तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे, आता निवडणुकीबाबत सुरू असणाऱ्या तर्क-वितर्कांना पूर्णविराम मिळाला आहे. माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या घरातून आता उमेदवार कोण? याकडे मतदारसंघाच्या नजरा लागून राहिल्या आहेत.पोटनिवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम केव्हा जाहीर होतो, याकडे मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले होते. त्याअनुषंगाने निवडणुकीबाबत तर्क-वितर्कही लावले जात होते. आज दुपारी निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यामुळे आता उमेदवारीची आणि निवडणूक बिनविरोध होणार की नाही, याची चर्चा रंगली आहे. पोटनिवडणुकीचा कार्यक्रम लगेच सुरू होणार असल्याने राष्ट्रवादीला लवकरात लवकर निर्णय घेऊन उमेदवारी जाहीर करावी लागणार आहे. त्यामुळे पक्षीय पातळीवर हालचाली गतिमान झाल्या आहेत. आज दुपारी निवडणूक जाहीर झाल्याचे वृत्त मतदारसंघात समजले आणि राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांत निवडणुकीबाबत चर्चा सुरू झाली.आर. आर. पाटील यांनी चार वेळा तासगाव मतदारसंघाचे, तर दोन वेळा नव्याने तयार झालेल्या तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधीत्व केले होते. सलग सहावेळा ते निवडून आले होते. आता राष्ट्रवादीकडून आर. आर. आबांच्या पत्नी सुमनताई पाटील यांच्या नावाची चर्चा सध्या तरी मतदारसंघात आहे. अद्याप पक्षीय स्तरावरून अधिकृतपणे उमेदवारीबाबत काहीच जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे उमेदवार कोण? याकडे नजरा लागून राहिल्या आहेत. दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या सूचना आल्यामुळे प्रशासन सज्ज झाले आहे. पोटनिवडणुकीच्या तयारीला प्रशासनाने सुरुवातही केली आहे. (वार्ताहर)पक्षीय निर्णयांकडे लक्षआर. आर. आबांच्या निधनामुळे होणारी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. काही राजकीय नेत्यांनी तसे बोलूनही दाखवले आहे. आता प्रत्यक्षात निवडणूक जाहीर झाल्यानंतर विविध पक्षांचे काय निर्णय होतात, याकडेही मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.
आबांच्या घरातून उमेदवार कोण?
By admin | Updated: March 11, 2015 00:05 IST