शरद पवार यांनी एफआरपीवरून, राज्य सरकारला आणि सहकारमंत्र्यांना धारेवर धरले. त्यांना ज्ञानी पुरुष म्हटले. दादासाहेब एवढी वर्षे मोठ्या साहेबांनाच ज्ञानी समजत होते. आता त्यांनीच सहकारमंत्र्यांना ज्ञानी म्हटल्यामुळे दादासाहेबांना प्रश्न पडला की दोघांमध्ये नेमके ज्ञानी कोण? त्याचा खुलासा विचारणारे पत्र त्यांनी मोठ्या साहेबांना पाठवले. ते असे...आमचे बाबूराव सांगत होते, कारखान्याची रिकव्हरी १० असेल तर कारखाना तोट्यात जाऊच शकत नाही. पश्चिम महाराष्ट्रातल्या कारखान्यांची रिकव्हरी किती आहे साहेब..? कारखान्याच्या आडून आपल्या पक्षाचं राजकारण धोक्यात आणण्याचा रडीचा डाव तर नवीन सरकार खेळत नाही ना...आदरणीय मोठे साहेब,डोकं पार भणाणून गेलंय... आजवर आम्ही आपल्याला जाणता राजा, ज्ञानी नेता समजत होतो मात्र आपण तर थेट सहकारमंत्री आपल्यापेक्षा जास्त ज्ञानी पुरुष आहेत, असं म्हणालात. आमचं तर डोकच काम करेनासं झालंय बघा... आपण पश्चिम महाराष्ट्रातले. सहकारमंत्री पण तिकडचेच. सगळे ज्ञानी, जाणते लोक तिकडेच कसे काय, असं मला मराठवाड्यातून अशोकराव चव्हाण विचारत होते. ते जाऊ द्या... आपण एफआरपीपेक्षा जास्ती पैसे देत होता तेव्हा आपल्याला इन्कमटॅक्सवाल्यांनी नोटिसा पाठवल्या, असं आपण म्हणालात. मग आता तशा नोटिसा येऊ नयेत म्हणून तरी आपण एफआरपी एवढा दर का देत नाही... आणि नोटिसा येतात म्हणून कारखाने तोट्यात चालवले की काय आजपर्यंत आपल्या नेत्यांनी...? आपलं तर डोस्कच भंजाळून गेलंय साहेब... सहकारमंत्री म्हणतात, एफआरपीनुसार पैसे द्या, आपण देत नाही, आपल्याला कोणी अडवलंय का एफआरपीनुसार पैसे द्यायला...? नावं सांगा त्यांची; त्यांच्यावर गुन्हेच दाखल करायला लावू गृहराज्यमंत्र्यांना... एफआरपी दिलाच पाहिजे असा काही कायदा असतो का साहेब...? मी काही तेवढा ज्ञानी नाही, म्हणून विचारलं... कारखाना मोडला तरी चालेल पण बळीराजा मोडता कामा नये, असं आपण का म्हणत नाही साहेब...? आणि एफआरपी नाही दिला तर कारखाने जप्त करू असं सहकारमंत्री म्हणतात... आपल्या दोघांच्या या वादावादीत नेमकं कोण जास्त ज्ञानी हे काही कळेना बघा साहेब... वर्षानुवर्षे कारखान्यांच्या माध्यमातून चालणारं गावागावातलं राजकारण, अर्थकारण धोक्यात आणण्याचा तर हेतू नाही ना त्या सहकारमंत्र्यांचा...? आमचे बाबूराव सांगत होते, संचालक मंडळाच्या वारेमाप खर्चामुळं कारखाने अडचणीत आले की सरकारी तिजोरीतून कारखान्यांना वेळोवेळी निधी मिळवून देत होता... मागे तर काही संचालकांनी अंगवस्त्रंसुद्धा या खर्चातून घेतली होती म्हणे... या अशाच उधळपट्टीमुळं तर राज्य सहकारी बँक डुबली नसेल ना साहेब...? राज्य बँकेच्या संचालकांनी ज्या ज्या कारखान्यांना कर्ज दिले त्या त्या कारखान्यांच्या संचालकांनी त्या पैशांचं काय केलं तेपण शोधायचं का साहेब...? शेतकऱ्यांना अडचणीत आणणाऱ्या संचालकांच्या मालमत्ता जप्त करायला सांगायच्या का? नाहीतर ते सहकारमंत्री तसं बोलून जातील... सहज आठवलं साहेब, गोविंदराव आदिक यांनी केसांना बरेच दिवस कलर केला नाही आणि त्यांचे केस पांढरे दिसू लागले तेव्हा आपण त्यांना म्हणालात म्हणे की तुम्ही एकदम विचारवंत दिसताय पांढऱ्या केसात... तेव्हापासून त्यांनी केस काळे करणं सोडून दिलं आणि आपण मात्र आजही मस्त केस काळे करता ना साहेब... आमच्या दृष्टीनं तर आपणच ज्ञानी; पण कालच्या बोलण्यानं सगळा विस्कोट झालाय डोक्यात... राग मानू नका... पण शेवटचा एकच प्रश्न विचारतो, सहकारी कारखाने तोट्यातच आणि खाजगी कारखाने फायद्यातच चालतात; असं का होतं साहेब आपल्या राज्यात...? आपलाच दादासाहेबअतुल कुलकर्णी
आपल्या दोघांत ज्ञानी कोण साहेब?
By admin | Updated: January 18, 2015 01:12 IST