उमेश जाधव, टिटवाळा - कल्याण पंचायत समितीअंतर्गत असणार्या १३ ग्रामपंचायतींना २०१२ मध्ये देण्यात आलेले संगणक काही दिवसांत गायब झाल्याने ग्रामपंचायत सदस्यांकडून प्रशासनास जाब विचारला जातो आहे. यासंदर्भात फळेगांव ग्रामपंचायत समितीचे सदस्य चंद्रकांत भोईर यांनी सीओ व बीडीओंशी पत्रव्यवहार केला आहे. शासनाचा सर्व कारभार संगणकीय व आॅनलाइन व्हावा व नागरिकांना संगणकीकृत दाखले देता यावे, असे धोरण राज्य शासनाने सर्व राज्यात अवलंबण्यास सुरुवात केली. त्या परीने ग्रामपंचायतीचा कारभार देखील संगणकीय व आॅनलाइन व्हावा म्हणून जिल्हा परिषदेने प्रत्येक ग्रामपंचायतीला मागील दोन वर्षांपूर्वी एक असे संगणक कल्याण तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतींना देण्यात आले होते. परंतु ‘नव्याचे नऊ दिवस’ या उक्तीप्रमाणे काही दिवसांतच १३ ग्रामपंचायतींचे संगणक गायब झाले. ते कुठे नि कशासाठी नेण्यात आले याची कुणालाही काही माहीत नसल्याचे फळेगांव ग्रामपंचायतीचे सदस्य चंद्रकांत भोईर यांचे म्हणणे आहे. एका वर्षानंतर हे संगणक कल्याण पंचायत समितीत जनगणनेसाठी वापरले गेले. गेली दोन वर्षे हे संगणक पंचायत समितीत असल्याने १३ ग्रामपंचायतींचा आॅनलाइन डाटा लोड करणे व नागरिकांना संगणकीय दाखले देता आले नाही. यामुळे या ग्रामपंचायतींच्या सरपंच व सदस्यांत प्रशासनाविरुद्ध नाराजी व्यक्त करण्यात येते. हे संगणक हे सीओंच्या आदेशानुसार पंचायत समितीत जनगणनेच्या कामासाठी आणले होते. पुढील आठवड्यात त्यातील डाटा सेव्ह करून ते संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात येणार आहेत, असे कल्याणचे गटविकास अधिकारी प्रदीप घोरपडे यांनी सांगितले.
पंचायत समितीचे संगणक गेले कुठे?
By admin | Updated: June 2, 2014 05:20 IST