रस्त्यांवर खड्डेच खड्डे : दुरुस्तीचा फक्त प्रस्ताव तयार नागपूर : पावसाळा संपला की शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले जाते. यावर्षी मात्र तसे झाले नाही. रस्त्यांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव तयार करण्यात आले. प्रशासकीय मान्यता घेण्यात आली. निविदाही काढण्यात आल्या. मात्र, प्रत्यक्षात दुरुस्तीचे काम सुरू झालेले नाही. हिवाळी अधिवेशन आटोपले, नव्या वर्षाला सुरुवात झाली. मात्र, त्यानंतरही शहरातील खड्डेयुक्त रस्त्यांच्या डांबरीकरणास सुरुवात झालेली नाही. या कामासाठी तब्बल दोन महिन्यांचा विलंब झाला आहे. झोन स्तरावर नगरसेवकांच्या वॉर्ड फंडातून काही रस्त्यांवर डांबरीकरणाचा एक थर टाकण्यात आला. यात काही रस्ते असे होते की ज्यांचे आताच डांबरीकरण केले नसते तरी वर्षभर संबंधित रस्ते कामी आले असते. मात्र, नगरसेवकांनी विविध हेतूंनी या रस्त्यांचे डांबरीकरण करून घेतले. त्यामुळे जेथे आवश्यकता होते ते रस्ते तसेच राहिले.कुठे गेले जेट पॅचर?स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी खड्डे तत्काळ भरण्यासाठी जेट पॅचर मशीन खरेदी केली होती. त्यावेळी तक्रार मिळताच ४८ तासात खड्डे भरले जातील, असा दावा करण्यात आला होता. मात्र, शहरात असे बरेच खड्डे आहेत की जे महिना होऊनही भरल्या गेलेले नाहीत. त्यामुळे संबंधित जेट पॅचर नेमके कुठे गेले, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. गुणवत्तेकडे दुर्लक्ष गंगाबाई घाट चौक ते वैष्णोदेवी चौकादरम्यानच्या रस्त्याचे काही महिन्यांपूर्वीच डांबरीकरण करण्यात आले होते. त्यानंतरही या रस्त्यावर खड्डे पडले. ते काही दिवसांपूर्वी भरण्यात आले. मुंजे चौक ते झांशी राणी चौकाकडे येणाऱ्या रस्त्यांवर जेट पॅचरच्या मदतीने खड्डे भरण्यात आले होते. मात्र, या कामात गुणवत्ता न राखल्यामुळे गिट्टी उखडू लागली आहे. प्राथमिकतेच्या आधारावर मंजुरी- आयुक्त शहरातील रस्त्यांच्या दुर्दशेचा मुद्दा स्थायी समितीच्या बैठकीतही गाजला. यावर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी प्राथमिकतेच्या आधारावर रस्त्यांची यादी तयार केली जाईल आणि नंतर दुरुस्ती व डांबरीकरणाचे काम केले जाईल, असे स्पष्ट केले. रस्त्यांशी संबंधित फाईल पाच दिवसात निकाली काढल्या जातील, असेही त्यांनी सांगितले. स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर म्हणाले, रस्त्यांची दुरुस्ती करण्याला प्राधान्य दिले जाणार आहे.
रस्त्यांची दुरुस्ती कधी होणार ?
By admin | Updated: January 13, 2015 01:09 IST