तारखेबाबत उत्सुकता : आयोगाच्या घोषणेकडे लक्षनागपूर: गणेश विसर्जनानंतर लगेचच अपेक्षित असणारी निवडणुकीची घोषणा दोन दिवस झाले तरी न झाल्याने सर्वांचे लक्ष आयोगाच्या घोषणेकडे लागले आहे. विशेष म्हणजे आचारसंहिता केव्हापासून लागणार याबाबत विचारणा होत आहे.९ तारखेला आयोगाकडून निवडणुकीची घोषणा होईल आणि त्याच दिवसापासून आचारसंहिता लागू होईल, असा अंदाज होता. मात्र हा दिवस चुकल्याने बुधवारी तरी निवडणुकीची घोषणा होईल, अशी चर्चा होती. मात्र हा दिवसही चुकला. त्यामुळे आता निवडणुकीच्या घोषणेबाबत राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. निवडणुका दिवाळीपूर्वी होणार की नंतर, मतमोजणी के व्हा होणार, पितृपक्षाचा मुद्दा आणि इतरही काही मुद्दे चर्चिले जात आहेत. गत विधानसभा निवडणुकीत (२००९) १५ सप्टेबर २००९ ला अधिसूचना जारी करण्यात आली होती. १८ ते २५ सप्टेबर दररम्यान अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली होती. १३ आॅक्टोबरला मतदान झाले होते. विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ ८ नोव्हेबर २०१४ पर्यंत आहे. त्यापूर्वी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होणे गरजेचे आहे. त्या अनुषंगानेच निवडणुकीचे वेळापत्रक निश्चित करावे लागणार आहे. त्यामुळे जितके दिवस निवडणूक लांबेल तितके कमी दिवस प्रचारासाठी राजकीय पक्षांना मिळतील. पण प्रशासकीय यंत्रणेवर कामाचा दाब वाढेल.दरम्यान एकीकडे निवडणुकीची घोषणा लांबत असली तरी ती केव्हाही होण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाची निवडणूक कामाची गती कायम आहे. निवडणूक शाखेत आज याच संदर्भात बैठका झाल्या. मतदार नोंदणीचे काम सुरू आहे. ज्या गतीने या घडामोडी होत आहे, त्यावरून निवडणुकांची घोषणा लगेच होण्याचे संकेत प्राप्त होतात. मात्र नेमकी तारीख केव्हा जाहीर होते याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. (प्रतिनिधी)
आचारसंहिता लागणार केव्हा ?
By admin | Updated: September 11, 2014 00:55 IST