घोषणांचा सुकाळ : कोकणवासीयांच्या महामार्ग स्वप्नपूर्तीस विलंबरोहा : महाराष्ट्रातील प्रमुख राष्ट्रीय महामार्गांचे चौपदरीकरणाचे काम वेगाने पूर्ण होऊन त्यावरुन वाहतूक चालू झाली आहे. परंतु कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असणारा मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण आणि कोकण रेल्वे दुपदरीकरणाचे काम म्हणजे निव्वळ घोषणांचा सुकाळ आणि नियोजनाचा दुष्काळ अशी परिस्थिती दिसून येत आहे. रायगड जिल्ह्यातील पत्रकारांनी मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण व्हावे यासाठी सातत्याने पाठपुरावा करुन रस्त्यावर उतरुन देखील संघर्ष केला. अखेर पनवेल ते इंदापूर या मार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामास सुरुवात झाली. हे काम अत्यंत धिम्या गतीने होत आहे. काही महिन्यांपूर्वी युती शासनामधील मंत्रिमहोदयांनी या कामाची पाहणी करुन ३० मार्च, ३० एप्रिल व ३१ मेपर्यंत कोणकोणती कामे पूर्ण होणे गरजेचे आहे, याबाबत सूचना दिल्या होत्या. प्रत्यक्षात मात्र या पाहणी दौऱ्यानंतर कोणत्याही प्रकारे चौपदरीकरणाच्या कामास गती मिळालेली नाही. चौपदरीकरणाच्या कामामुळे अनेक ठिकाणी मुंबई-गोवा महामार्गावर डायव्हेशन देण्यात आले आहे. ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. कोकणामध्ये १५ मे पासून वळवाचा पाऊस व जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाची सुरुवात होते. हाती असलेल्या कालावधीत रस्त्याच्या दुरुस्तीची कामे होणे शक्य नाही. तरीदेखील युती शासनामधील जबाबदार मंत्र्यांकडून चौपदरीकरणाच्या कामाबाबत सवंग घोषणा करणे चालूच आहे. कोकण रेल्वेचे दुपदरीकरण याबाबत देखील केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी घोषणा केली आहे. कोकण रेल्वेची सुरुवात रोहा येथून होत असली तरी पनवेल ते रोहा या मार्गांच्या दुपदरीकरणाचे काम अत्यंत धिम्या गतीने चालू आहे. सदरचे काम पूर्ण होण्यासाठी अजून एक ते दीड वर्षाचा कालावधी निश्चित लागेल. याबाबतची वस्तुस्थिती जाणून न घेता केवळ घोषणा करणे आणि कोकणवासीयांना स्वप्न दाखविणे असा प्रकार चालू असल्याचे चित्र या मार्गावरुन प्रवास करताना दिसून येत आहे. मंत्रीमहोदय आणि आमदार यांच्या ताफ्यात उच्च बनावटीच्या गाड्या असल्याने त्यांना जनतेला कोणत्या त्रासातून सामोरे जावे लागत आहे, याची कल्पना नाही. येणाऱ्या पावसाळ्यात पुन्हा एकदा कोकणवासीयांना महामार्ग व रेल्वे या दोन्ही मार्गांवरुन जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागणार आहे. यामुळे कोकणवासीयांसाठी महामार्ग चौपदरीकरण व रेल्वे दुपदरीकरण म्हणजे घोषणांचा सुकाळ आणि नियोजनाचा दुष्काळ अशीच परिस्थिती आहे. यंदाच्या वर्षी महामार्गावरुन तसेच रेल्वेमार्गे प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांकडे संपर्क साधला असता त्यांनी जुना महामार्ग चांगला होता. आता नवाही नाही जुनाच तर नाहीच, अशी अवस्था झाल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)
महामार्ग चौपदरीकरण कधी?
By admin | Updated: May 6, 2015 01:03 IST