ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २५ - मुंबईकर प्रवाशांसाठी एसी लोकल, लोकलमधून प्रवास करणा-या महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महिला डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे, कोकण रेल्वेवर ५० हजार नोक-या अशा महत्त्वपूर्ण घोषणा रेल्वेमत्री सुरेश प्रभू यांनी महाराष्ट्रासाठी केल्या आहेत. याशिवाय मुंबईतील एमयूटीपी ३ या प्रकल्पावरही काम करणार असल्याचे प्रभूंनी म्हटले आहे.
महाराष्ट्रातून थेट दिल्लीतील रेल्वेमंत्रालयात दाखल झालेले रेल्वेमंत्री सुरेश प्रभू अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय भेट देतात याविषयी कमालीची उत्सुकता होती. सुरेश प्रभूंनी महाराष्ट्र व मुंबईतील उपनगरीय मार्गावर नवीन गाड्यांची घोषणा न केल्याने प्रवाशांचा हिरमोड झाला. मात्र मुंबईतील प्रवाशांसाठी एसी लोकल्स सुरु करण्याचे प्रयत्न सुरु असून हा प्रयोग यशस्वी ठरेल असे प्रभूंनी सांगितले. कोकण रेल्वे मार्गावर महिला व तरुण स्वयंरोजगार गटाने तयार केलेल्या उत्पादनांना प्रोत्साहन देणार असून गेल्या ३ महिन्यांपासून हा प्रयोग सुरु आहे. या माध्यमातून ५० हजार नोक-यांची निर्मिती होईल असा विश्वास सुरेश प्रभूंनी व्यक्त केला. लोकल ट्रेनमधील महिला प्रवाशांची सुरक्षा हा गेल्या काही वर्षांपासून प्रमुख मुद्दा होता. सुरेश प्रभूंनी मागणीला गांभीर्याने घेत महिला डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची घोषणा केली.
लोकल ट्रेन ही मुंबईची लाईफलाइन असल्याने यासाठी एमयूटीपी ३ प्रकल्पावर काम सुरु करु असे सुरेश प्रभूंनी अर्थसंकल्पात जाहीर केले. एमयूटीपी ३ मध्ये पनवेल - कर्जत मार्गाची दुपदरीकरण, विरार - डहाणू मार्गाचे चौपदरीकरण अशा सहा महत्त्वपूर्ण प्रकल्पांचा समावेश आहे.