नागपूर : विधीमंडळ अधिवेशनाच्या वेळीच मी विदर्भाचा मुद्दा उचलतो असा आरोप होतो. प्रत्यक्षात कुठलाही मुद्दा संग्रहित ठेवून त्यावर मी बोलत नाही. सरकारने वेळीच शहाणपणा दाखवला तर मला अधिवेशनाच्या वेळी बोलावे लागणार नाही. परंतु विशिष्टवेळी सरकारचा गाढवपणा का होतो, असा प्रश्न राज्याचे माजी महाधिवक्ता व विदर्भवादी नेते अॅड.श्रीहरी अणे यांनी उपस्थित केला. राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशांत जागांचे विभागनिहाय आरक्षण बंद व्हावे या मागणीसंदर्भात ते नागपूरात बोलत होते.वेगळ््या विदर्भाचा मुद्दा कुठेही मागे पडलेला नाही. विदर्भावर अन्याय होत असेल तर मी त्यावर अधिवेशन काळात बोलणे गैर नाहीच. राजकीय पुढाऱ्यांनी स्वतंत्र विदर्भ राज्य व्हावे यासाठी हिंमत दाखविण्याची गरज आहे. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे वेगळ्या विदर्भाबाबत सकारात्मक आहेत. परंतु ते यासाठी प्रयत्न करत नसल्याचे चित्र दुर्दैवी आहे. सत्ता टिकवून ठेवण्याची कसरत त्यांना करायची आहे व सत्तेच्या राजकारणामुळे त्यांची अडचण होत आहे, असे अॅड.अणे म्हणाले. राज्यात वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत विभागनिहाय आरक्षण ठेवण्यात आले आहे. यामुळे विदर्भ व मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत कमी जागा मिळतात. नियमांनुसार राज्य शासनाने गुणवत्ता यादीच्या आधारावरच प्रवेश दिले पाहिजेत. ही बाब न्यायप्रविष्ट असून मुख्यमंत्र्यांनादेखील निवेदन देणार असल्याचे अॅड.अणे यांनी सांगितले.
विशिष्ट वेळीच सरकारचा गाढवपणा का ? - श्रीहरी अणे
By admin | Updated: July 19, 2016 20:04 IST