ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 6 - मुंबईतील सर्वात वर्दळीच्या रस्त्यांपैकी एक असलेला वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे कामकाजासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. शनिवारी रात्री 12 वाजल्यापासून ते सकाळी पाच वाजेपर्यंत हायवे पुर्णपणे बंद असणार आहे. पठाणवाडी फ्लायओव्हरपासून ते मालाड पुर्वेकडील टाईम्स ऑफ इंडिया फ्लायओव्हरपर्यंत संपुर्ण रस्ता वाहतुकीसाठी बंद असणार आहे. मुंबई मेट्रोच्या कामकाजाच्या निमित्ताने वाहतूक पोलिसांनी रस्ता बंद केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: जाऊन कामाची पाहणी करणार आहेत. कामकाजासोबतच सुरक्षेच्या कारणास्तवही रस्ता बंद असणार आहे.
मध्यरात्रीपासून ते सकाळी पाच वाजेपर्यंत रस्ता बंद करण्यात येणार आहे. फक्त एकाच दिवसासाठी वाहतूक बंद असणार असून यावेळी या मार्गाने प्रवास करणा-यांसाठी वाहतूक पोलिसांनी पर्यायी व्यवस्था केली आहे. दुचाकीस्वारांसाठी एका बाजूने मार्ग सुरु ठेवण्यात येणार आहे. एस व्ही रोडवरुन प्रवास करणारे गोरेगाव पुर्वेकडील मृणालताई गोरे फ्लायओव्हर किंवा मालाड सबवेने वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे गाठू शकतात. वाहतूक पोलिसांनी वाहतूक कोंडी टाळण्याच्या दृष्टीकोनातून तसंच होणारा त्रास टाळावा यासाठी लवकरात लवकर आपला प्रवास सुरु करावा असं आवाहन केलं आहे.
गोरेगाव, दिंडोशीच्या दिशेने प्रवास करणा-यांना जास्त त्रासाला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. खासकरुन ओबेरॉय मॉल किंवा फिल्मसिटीकडे जाणा-यांना अडचण होऊ शकते. फ्लायओव्हरचं बांधकाम सुरु असल्याने मुंबई वाहतूक पोलिसांनी गोरेगाव - मालाड लिंक रोडला वन-वे केला आहे. ज्यामुळे गोरेगाव पुर्वेकडून पश्चिमेकडे जाणा-या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो. या फ्लायओव्हरचं काम पुढील सहा ते सात महिने सुरु राहणार आहे.