पुणो : ‘जाने कहॉँ गये वो दिन’ अशा सुरावटीने एक काळ गाजविणा:या आणि ‘है अपना दिल तो आवारा’ असे म्हणत पुण्यातील गल्लोगल्लीत आपल्या आवाजाने आणि हार्मोनियमच्या स्वरांनी रसिकांना मंत्रमुग्ध करणारे केशवलाल गुजराथी यांना ‘हमे तुमचे प्यार कितना’ची अनुभूती आली.
एके काळी ज्येष्ठ गायक महेंद्र कपूर यांची साथसंगत करणारे गुजराथी हे कुटुंबीयांसमवेत पुण्यात गल्लोगल्ली फिरून हार्मोनियमच्या साथीने जुन्या काळातील गाणी सादर करीत आहेत. यात त्यांना प}ी सोनाबाई यांची सावलीसारखी साथ आहे. राहायला घर नसल्याने त्यांनी फुटपाथवर राहून दिवस काढले आहेत. या अवलियाच्या बेसूर झालेल्या कहाणीवर ‘लोकमत’ने ‘दुख भरे दिन बिते रे भय्या’ या मथळ्याखाली 22 ऑगस्टच्या अंकात वृत्त प्रसिद्ध केले होते.
‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त वाचून माणिकबागेत राहणारे अनिल जोशी यांनी महत्प्रयासाने गुजराथी यांचा मोबाईल क्रमांक मिळवून त्यांच्याशी संपर्क साधला आणि मदतीच्या उदात्त हेतूने गणोशोत्सवानिमित्त सुंदर गार्डन सोसायटीतील सुंदर गार्डन मित्र मंडळातर्फे कार्यक्रम घडवून आणला.
याविषयी जोशी म्हणाले, ‘‘एक वयस्कर गृहस्थ पुण्यात फिरून हार्मोनियमवर गाणी सादर करीत असल्याचे पाहण्यात आले होते; पण ती व्यक्ती कोण आहे, याची माहिती नव्हती. ‘लोकमत’मधील वृत्त वाचल्यानंतर गुजराथी यांच्याविषयी समजले. त्यांच्या संपर्कात असलेले आनंद सराफ यांच्याशी कार्यक्रमाबाबत चर्चा केली आणि कार्यक्रम निश्चित केला. कार्यक्रमाच्या माध्यमातून मदत करू, असे काही गुजराथी यांना सांगितले नव्हते. ‘कार्यक्रमासाठी रिक्षाने या, जो काही खर्च होईल तो देऊ,’ असे मात्र त्यांना सांगितले.’’
गुजराथी यांनी स्वत: काही गाणी सादर केली, तर काही गाणी हार्मोनियमवर सादर केली. ‘मन डोले मेरा तन डोले रे’, ‘जादूगर सैंया छोडो मोरी बैंया’, ‘दिल तडप तडप के केह रहा है’, ‘घडी घडी मोरा दिल धडके’, ‘एक परदेसी मेरा दिल ले गया’, ‘याद किया दिल ने कहाँ हो तुम’ यासह त्या काळातील सदाबहार गीते गुजराथी यांनी सादर केली. कार्यक्रम तब्बल अडीच तास रंगला.
कार्यक्रमापूर्वी काही सदस्यांना मदतीविषयी सांगितले होते. त्यामुळे सोसायटीतील असंख्य सदस्यांनी सढळ हस्ते मदत दिली. ही मदत गुजराथी यांच्याकडे सोपविल्याचे जोशी म्हणाले. या उपक्रमात मंडळाचे कार्यकर्ते अक्षय गिते, केतन पिंगळे, आदित्य कामठे, अंकित गोडबोले, विठ्ठल डोके, प्रतीक पिंपरीकर, चिन्मय परदेशी, गौरव देशपांडे, शिवम नाईक यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)
सोसायटीतील मुलांना एकत्र करून कार्यक्रम निश्चित केला. कायक्रम कसा होईल, याची धाकधुक होतीच. सोसायटीतील लोक तरी कार्यक्रमाला येतील की नाही, अशी शंका होती. कार्यक्रमाची वेळ झाली तरी फारसे लोक नव्हते. त्यामुळे गुजराथी यांचा हार्मोनियम स्टेजवर ठेवण्यास मुलांना सांगितले. गुजराथी यांची बोटे जेव्हा हार्मोनियमवर फिरू लागली त्या वेळी त्या सुरावटींनी मात्र सोसायटीतील लोकांचे कान टवकारले गेले आणि गर्दी जमत गेली, जोशी सांगत होते.