कोल्हापूर/ औरंगाबाद : माहिती तंत्रज्ञानाचा क्रांतिकारी निर्णय राबविताना राजीव गांधींना हीणविणाऱ्या आणि आता त्याच माहिती तंत्रज्ञानाच्या बळावर चमकोगिरीचे राजकारण करणाऱ्यांना गेल्या ६० वर्षांत देशाने केलेला विकास कसा दिसणार? अशा शब्दांत अखिल भारतीय काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघात केला.काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ कोल्हापूर आणि औरंगाबाद येथे गुरुवारी दुपारी भर उन्हात झालेल्या प्रचारसभेला प्रचंड गर्दी जमली होती. काँग्रेसने ६० वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या कामांची जंत्रीच श्रीमती गांधी यांनी सादर केली. त्या म्हणाल्या, आम्ही नेहमीच गोरगरिबांच्या कल्याणासाठी योजना राबवितो. त्यामुळे आम्हाला कोणाच्या प्रशस्तिपत्राची गरज नाही. पण जे भूलथापा देऊन सत्तेवर आले त्यांना १०० दिवसांतील कामाचा जाब विचारला तर एवढा राग का येतो, असा सवालही त्यांनी केला.भारत चंद्रावर, मंगळावर पोहोचला. देशाने अणुुशक्ती प्राप्त केली. अन्नधान्यात स्वयंपूर्णता आणली. माहिती-तंत्रज्ञानात आघाडी घेतली. हे सर्व कसे मिळाले, असा प्रश्न विचारून त्या म्हणाल्या की, हे सर्व काँग्रेसचे देशप्रेम, त्याग, बलिदान आणि उच्च ध्येयनिष्ठेसह देशातील जनतेच्या गेल्या ६० वर्षांतील श्रमाचे फलित आहे. गेल्या ६० वर्षांत केलेल्या विकासकामांसाठी काँग्रेसला कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही, असा उपरोधिक टोलाही त्यांनी भाजपाला लगावला, तेव्हा उपस्थित जनसमुदायाने टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करीत ‘सोनिया गांधी जिंदाबाद’चे नारे लावले. योजना त्याच नावे बदललीदुसऱ्यांच्या योजना आपल्या नावावर खपविण्यात भाजपाचा हात कुणी धरूच शकणार नाही. काँग्रेस सरकारने ज्या योजना राबविल्या त्याच योजना नावे बदलून पंतप्रधान जोरजोराने ओरडून सांगत आहेत. वैज्ञानिकांनी रात्रीचा-दिवस करून जे यश मिळवले ते देखील आपल्या पक्षामुळेच, असे सांगायलाही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही, असे सोनियांनी सांगताच एकच हशा पिकला.यावेळी मंचावर काँग्रेसचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे औरंगाबाद पूर्वचे उमेदवार राजेंद्र दर्डा, अब्दुल सत्तार (सिल्लोड), डॉ. कल्याण काळे (फुलंब्री), डॉ. जितेंद्र देहाडे (पश्चिम), एम.एम. शेख (मध्य), रवींद्र काळे (पैठण), शोभा खोसरे (गंगापूर), नामदेव पवार (कन्नड), कैलास गोरंट्याल (जालना), डॉ. संजय लाखे पाटील (घनसावंगी) व सुभाष मगरे (बदनापूर) हर्षवर्धन पाटील, पतंगराव कदम, स्वराज्य वाल्मिकी आदी उपस्थित होते.
आम्हाला कुणाचे प्रशस्तिपत्र नको!
By admin | Updated: October 10, 2014 06:07 IST