मुंबई : जलसंपदा विभागाच्या सचिवपदी शिवाजी उपासे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते नाशिकच्या संकल्पन, प्रशिक्षण जलविज्ञान आणि संशोधनचे महासंचालक आहेत. मंगळवारी ते सचिवपदाची सूत्रे स्वीकारतील. जलसंपदा विभागात आयएएस अधिकाऱ्यांना सचिव म्हणून नेमण्याचा निर्णय झाल्यानंतर विभागाच्या अधिकाऱ्यांमधून सचिव नेमताना एक सचिवपद कमी झाले. त्यामुळे या पदासाठी विभागात स्पर्धा होती.मावळते सचिव नाशिकचे प्र. रा. भामरे यांच्या वाट्याला हे पद फक्त १० दिवस आले. त्यांच्याआधीचे सचिव एच. टी. मेंढेगिरी ३१ मे रोजी निवृत्त झाले होते. त्यांच्या जागी कोणाला नेमायचे याची चर्चा २० दिवस चालली. शेवटी सेवाजेष्ठतेनुसार प्र. रा. भामरे यांना नेमण्याचा निर्णय झाला. भामरे ३० जूनला निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी कोणाची नेमणूक करायची यावरही काही दिवस खलबते चालू होती. सेवाज्येष्ठतेनुसार शिवाजी उपासे, गोदावरी मराठवाडा महामंडळाचे कार्यकारी संचालक चन्नवीर बिराजदार, वाल्मी औरंगाबादचे महासंचालक गोसावी आणि नागपूर विदर्भ पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक र. बा. शुक्ला यांची नावे चर्चेत होती. सेवाज्येष्ठतेनुसारच हे पद भरावे, या मताचे आपण होतो. म्हणूनच उपासे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. विभागाचा कारभार पारदर्शक चालावा म्हणून हा निर्णय घेतल्याचेही ते म्हणाले. उपासे सोलापूर जिल्ह्याचे असून टेंभू, टाकारी, म्हैसाळ कामांना त्यांनी गती दिली. (प्रतिनिधी)
जलसंपदा सचिवपदी शिवाजी उपासे
By admin | Updated: July 1, 2015 01:19 IST