नांदिवली : देश स्वतंत्र झाल्यापासून शीळफाटा ते पनवेल रोडवरील दहिसर-गोठेघर परिसरातील १४ गावे नळाच्या पाण्यावाचून वंचित होती. हा पाण्याचा प्रश्न अखेर सुटला असून नळाच्या पाइपलाइनचा लोकार्पण सोहळा सोमवार, ११ मे रोजी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शीळफाटा येथे संपन्न झाला.गोठेघर-दहिसर व १४ गावांची प्रादेशिक पाणीयोजना, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नागरी व ग्रामीण योजनेतर्फे राबविण्यात येत आहे. या पाणीपुरवठा योजनेसाठी एकूण खर्च सहा कोटी ४२ लाख येणार आहे. या योजनेला तांत्रिक मान्यता सप्टेंबर २०१० मध्ये देण्यात आली होती. परंतु, कार्यादेश चार वर्षांनंतर म्हणजे जानेवारी २०१४ मध्ये देण्यात आला.नळपाणीपुरवठा वंचित गावे गोठेघर, उत्तरशिव, वालिवली, भंडार्ली, मोकाशीपाडा, दहिसर, पिंपरी, नावाली, निघू, नागाव, माणिकपाडा, वाकलन, बामार्ली, बाले व नारिवली ही असून इतकी वर्षे या गावांतील ग्रामस्थ तलाव, विहिरी, कूपनलिकेचे पाणी वापरत होते.ही गावे नवी मुंबईकडे असताना त्यांच्यासाठी १९९८ मध्ये महापालिकेतर्फे या गावांसाठी पाणीपुरवठा योजना राबवली होती. नळवाहिन्याही टाकण्यात आल्या होत्या. पण, ही गावे नवी मुंबई पालिका क्षेत्रातून वगळली. आता या गावांसाठी पाणीपुरवठा योजना म.जी.प्रा.तर्फे राबवणार आहे.
रखडलेल्या १४ गावांचा पाणीप्रश्न मार्गी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2015 02:03 IST