ठाणे : आपल्याच इमारतीत खालील मजल्यावरील सदनिकेत होणारी पाणीगळती आणि त्यामुळे होणाऱ्या नुकसानीकडे दुर्लक्ष करणाऱ्या मिलिंद मसुरकर यांना ठाणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने २ लाखांचा दंड ठोठावला आहे.नंदकुमार रेगे हे रामवाडी येथील मनाली इमारतीत तळ मजल्यावरील खोलीत राहतात. रेगे यांच्या घरात पहिल्या मजल्यावरील मिलिंद मसुरकर यांच्या खोली क्रमांक ५मधून सातत्याने पाणीगळती होत होती. याबाबत रेगे यांनी मसुरकरांना माहिती दिली होती. तसेच या गळतीमुळे झालेल्या नुकसानीबाबतही त्यांना काही उपाय करण्याचे सुचविले होते. मात्र मसुरकर यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर रेगे यांनी ही गळती थांबण्यासाठी आपण स्वखर्चाने उपाययोजना करणार असून, त्याचा खर्च वसूल केला जाईल अशी सूचना मसुरकर यांना दिली होती. तरीही मसुरकर यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्याने अखेर दुरुस्ती खर्च १ लाख २३ हजार, नुकसानभरपाई १ लाख २६ हजार, मानसिक-शारीरिक त्रासाबद्दल २ लाख आणि तक्रार खर्च ५ हजार अशी मिळून संपूर्ण रक्कम द्यावी, अशी मागणी करीत रेगे यांनी त्यांच्या विरोधात ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली. मसुरकर यांनी मात्र ही गळती आपल्या घरातून होत नसून पावसाच्या पाण्यामुळे तसेच नळाच्या पाण्यामुळे होत असल्याचे सांगितले. तसेच दुरुस्ती खर्च आणि त्या संदर्भातील कागदपत्रेही रेगे यांनी स्वत:च्या फायद्यासाठी इंटिरिअर डिझायनरकडून तयार घेतली आहेत, असेही सांगितले. कागदपत्र, पुरावे यांची पडताळणी करून मसुरकर यांनी रेगे यांच्या घरात होणारी गळती आणि त्यामुळे झालेले नुकसान याकडे दुर्लक्ष केल्याचा निर्णय मंचाने दिला. (प्रतिनिधी)
पाणीगळती पडली २ लाखांना
By admin | Updated: August 18, 2014 03:57 IST