ऑनलाइन लोकमतवाशिम, दि. 1 - शिरपूर जैन इथल्या कुकसा प्रकल्पातून शेती सिंचनासाठी कालव्याद्वारे सोडण्यात येणारे पाणी मागील काही दिवसांपासून मध्येच अडविण्यात येत होते. या संदर्भात लोकमतने २६ डिसेंबरच्या अंकात पाणी रोखल्याने रब्बी पिके संकटात या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत लघू पाटबंधारे विभागाने रविवार प्रकल्पातून पाणी सोडले.मालेगाव तालुक्यातील शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या; परंतु रिसोड तालुक्यात असलेल्या कुकसा येथे काच नदीवर काही महिन्यांपूर्वीच जलप्रकल्पाची उभारणी करण्यात आली. त्यामुळे या परिसरातील केनवड, जोगेश्वर, कुकसा, गणेशपूर, अंचल अशा काही गावांतील साडेसहाशे हेक्टर शेतीला त्याचा फायदा होऊ लागला आणि शेतकरी या प्रकल्पाच्या पाण्यावर सिंचन करू लागले. यामध्ये पेनबोरी येथील शेकडो शेतकऱ्यांचा समावेश आहे. यंदा पाऊस चांगला झाल्याने कुकसा प्रकल्पात मुबलक पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे सिंचन क्षेत्रात किंवा रब्बीच्या क्षेत्रात वाढ झाली असून, पेनबोरी येथील शेतकऱ्यांनाही या प्रकपातून पाणी देण्याचा ठराव झाला आणि यावेळी मोठ्या प्रमाणात हळद, गहू, हरभरा या पिकांची पेरणी केली. कुकसा प्रकल्पातून वेळेवर पाणी सोडण्यास सुरुवात झाल्याने ही पिके चांगली बहरू लागली. मात्र, काही दिवसांपूर्वी जोगेश्वरी येथील काही कुप्रवृत्तीच्या लोकांनी पेनबोरीकडे जाणारे प्रकल्पाचे पाणी अडविले. या संदर्भात येथील शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे तक्रार करून पाणी नियमित सोडण्याची मागणी केली. त्यानुसार सबंधित अधिकाऱ्यांनी बंद केलेले पाणी एक दोन वेळा पुन्हा सोडले; परंतु हे पाणी जोगेश्वरी येथील काही लोकांकडून पुन्हा पुन्हा अडविल्या जात होते. त्यामुळे पेनबोरी परिसरातील विविध प्रकारची आठशे एकरामधील पिके संकटात सापडली. या संदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करताच पाटबंधारे विभागाने कुकसा प्रकल्पातून रविवारपासून पेनबोरीसाठी पाणी सोडण्यास सुरुवात केली.
अखेर कुकसा प्रकल्पातून सिंचनासाठी सोडले पाणी !
By admin | Updated: January 1, 2017 18:35 IST