अकोला : कोरडवाहू शेती क्षेत्राला स्थैर्य देण्यासाठी राज्य शासनाने कोरडवाहू शेती अभियान कार्यक्रम हाती घेतला आहे. सुरुवातीला राज्यातील ४0३ गावांमध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे. दोन हजार कोटी रूपये या अभियानावर खर्च होणार आहेत; तथापि या अभियानाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला असून, शासनाने या अभियान देखरेखीसाठी स्थापन केलेली अशासकीय समितीही बरखास्त केल्याचे वृत्त असल्याने कोरडवाहू शेती अभियान थंड बस्त्यात पडले आहे.राज्यातील २२५ लाख हेक्टरपैकी ८0 टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे. पावसाच्या अनियमिततेचा फटका कोरडवाहू पिकांच्या उत्पादकतेला बसत असल्याने या क्षेत्रातील शेतकर्यांच्या सामाजिक, आर्थिक स्थितीवर परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. कोरडवाहू क्षेत्रात पडणारा पाऊस आणि उपलब्ध स्थानिक संसाधनांचे नियोजन, तसेच कृषीपूरक उपक्रमांसाठी साहाय्य केल्यास कोरडवाहू क्षेत्रातील शेतकर्यांचे उत्पन्न वाढवता येईल, उत्पन्नाचे सातत्य टिकवता येईल आणि त्यामुळे शेतकर्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होऊ शकेल, या उद्देशाने राज्य शासनाने कोरडवाहू शेती अभियानाची मागील वर्षापासून सुरुवात केली असून, याकरिता मनुष्यबळ विकास व शेतीला लागणारी विविध संसाधने, प्रक्रिया व पणन या घटकांचा वापर करण्याचे ठरवले आहे. या योजनेला अधिक कार्यक्षमतेने राबविण्यासाठी दोन हजार कोटींची तरतूद कोरडवाहू शेती अभियान योजनेस स्वतंत्ररीत्या उपलब्ध करू न देण्यात आली असून, अभियानांतर्गत राज्यासह अकोला जिल्हय़ातील पाच गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांमध्ये जलसंचय व्यवस्थापन कार्यक्रमासह एकात्मिक शेती पद्धती, मूल्यवर्धित शेती विकास, सेंद्रिय शेती कार्यक्रम, काढणीपश्चात साठवूणक, प्रक्रिया आणि शेतकर्यांना प्रशिक्षण आदी विकासात्मक बाबींवर भर दिला जाणार आहे. कोरडवाहू क्षेत्रात पाणी हा महत्त्वाचा घटक असल्याने पावसाच्या पाण्याची साठवण, नियोजन आणि वापर अर्थात मूलस्थानी जलसंवर्धन यावर भर दिला जाणार आहे. दरम्यान, हे अभियान कार्यक्षमतेने राबविण्यासाठी राज्य शासनाने शासकीय व अशासकीय समितीचे गठण केले होते. तज्ज्ञ म्हणून या शासकीय समितीच्या अध्यक्षपदी डॉ. थोरात यांची नेमणूक केली होती. तथापि डॉ. थोरात यांनी या समितीच्या अध्यपदाचा राजीनामा दिला आहे आणि शासनाने पुन्हा अध्यक्षांची नेमणूूक न करता अशासकीय समितीच बरखास्त केली आहे.राज्याच्या कोरडवाहू शेती अभियानाचे अध्यक्ष डॉ. वायपीएस थोरात यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी राज्याच्या कोरडवाहू क्षेत्र विकासासाठी कोरडवाहू शेती अभियान मैलाचा दगड ठरणार असल्याचे मत व्यक्त करून समिती नावालाच उरल्याने एक महिन्यापूर्वीच राजीनामा दिला असल्याचे स्पष्ट केले.
कोरडवाहू शेती अभियान वा-यावर!
By admin | Updated: January 26, 2015 00:34 IST