विक्रमगड/तलवाडा : विक्रमगड तालुक्यातील चिचपाडा हे गाव आजही सुविधांच्या प्रतिक्षेत आहे. ते टेकडीवर वसलेले आहे़ या गावाची लोकसंख्या ५०० ते ६०० च्या आसपास असून या गावात १०० टक्के आदिवासी समाज राहातो़ या गावाला तीनही बाजूने डोंगर-दऱ्यांनी वेढलेले आहे. एका बाजूस सजन येथील लघु पाटबंधारे प्रकल्प आहे़. हे गाव खोस्ते ग्रामपंचायत हद्दीच्या कार्यक्षेत्रात येते़ मात्र हे गाव गेल्या अनेक वर्षांपासून विकासाच्या प्रतिक्षेत असून सरकारी यंत्रणा व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे या गावातील रहिवाशांची अवस्था दयनीय झालेली आहे़ तर या गावातील लोकांना मूलभूत सुविधा मिळणेही कठीण झाले आहे़ दरम्यान येथे पिण्याची पाण्याचीही गंभीर समस्या आहे़ या गावातील विद्यार्थ्यांना प्राथमिक शाळेचे शिक्षण मिळावे म्हणुन शासनाने येथे जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी केंद्र सुरु केले आहे़ पहिली ते चौथी पर्यत शाळा असून या शाळेतील विद्यार्थ्यांकरीता पिण्याच्या पाण्याची सोय नाही़ बोअरवेल आहेत् परंतु तिला पाणीच नाही.तर अशीच परिस्थिती येथील आदिवासी रहीवाशांचीही आहे़ गावाच्या एका बाजूला सजन लघुपाटबंधारे प्रकल्पाचे स्त्रोत आहे. या जलाशयात गावातील काही लोकांच्या जमीनी बुडाल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले, असे असतांना सध्या या गावात पाणी पुरवठा योजना नाही़ या गावासाठी एक विहीर असून ती ही जानेवारी महिन्यात तळ गाठते़ त्यामुळे येथील महिलांना सध्याच्या घडीला जलाशयाच्या शेजारी खड्डे खोदून त्यातील दूषित पाण्यावर आपली तहान भागवावी लागते आहे़ या खड्डयातील माती मिश्रीत पाण्यामुळे साथींचे रोग पसरण्याची शक्यता आहे. या दूषित पाण्यामुळे गावातील एखाद्याचा बळी गेल्यानंतरच संबंधीत यंत्रणेला जाग येईल का? याचप्रमाणे गावात परिवहनाची मोठी समस्या असून कुठल्याही वाहनांची व्यवस्था नसून येथील ग्रामस्थांना ४ ते ५ किलोमीटरची पायपिट करावी लागत आहे़ गावात कोणत्याही प्रकारच्या रोजगाराची व्यवस्था नसून येथील ग्रामस्थांना स्थलांतरीत होऊन मजूरी किंवा गवंडी काम करुन गुजराण करावी लागत आहे़ (वार्ताहर)
चिंचपाडाचे आदिवासी सुविधांच्या प्रतिक्षेत
By admin | Updated: April 28, 2016 03:54 IST