पुणे : मोठा गाजावाजा करून आणलेल्या स्वस्तातल्या तूरडाळीला पालकमंत्र्यांची प्रतीक्षा लागून राहिली आहे. ही तूरडाळ मागील आठवड्यात (शुक्रवार) वितरकांकडे दाखल झाली असली तरी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतरच प्रत्यक्ष डाळीचे विक्री सुरू होऊन ती सर्वसामान्यांच्या ताटात जाणार आहे. त्यामुळे एकीकडे सर्वसामान्यांना महागाईतून दिलासा देण्याचा डांगोरा सरकारकडून पिटला जात असताना डाळीच्या श्रेयासाठी सुरू असलेल्या धडपडीची चर्चा रंगली आहे.तूरडाळीची भाववाढ रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी कमी किमतीत तूरडाळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. नाफेडकडून तूर खरेदी करून नागपूर येथे मिलमध्ये त्याची डाळ तयार करण्यात आली. वितरणासाठी प्रत्येकी एक किलोचे पाकिटे बनविण्यात आली असून, विविध जिल्ह्यांमध्ये त्याचे वितरणही करण्यात येत आहे. या तूरडाळीचा भाव प्रतिकिलो ९५ रुपये निश्चित करण्यात आला आहे.पुण्यात मागील आठवड्यात (शुक्रवारी) ४५ टन डाळ दाखल झाली. त्यापैकी १० टन डाळ मार्केट यार्डातील भुसार बाजारातील व्यापाऱ्यांना विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर उर्वरित ३५ टन डाळ शहरातील ठिकठिकाणच्या मॉल व मोठ्या दुकाने अशा एकूण ३५ केंद्रांवर वितरित करण्यात आली आहे. मात्र, अद्याप ही डाळ सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात आलेली नाही. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते बुधवारी उद्घाटन करून डाळीची विक्री करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना बुधवारपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. >शासनाची स्वस्तातली तूरडाळ दाखल झाली आहे. येत्या बुधवारी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते डाळ वाटपाचे उद्घाटन झाल्यानंतर सर्व केंद्रांवर वितरण सुरू होणार आहे. याबाबतचे नियोजन सुरू आहेत. डाळ वितरण केंद्रांना अद्याप विक्रीच्या सूचना देण्यात आलेल्या नाहीत.- ज्योती कदम, जिल्हा पुरवठा अधिकारी
स्वस्तातल्या तूरडाळीला पालकमंत्र्यांची प्रतीक्षा
By admin | Updated: August 23, 2016 01:17 IST